आंध्रा स्टाईलने बनवा चटपटीत आवळ्याचं लोणचं, जेवणाला येईल साउथ इंडियन तडका
बाजारात आवळे मोठ्या प्रमाणात विकायला आले आहेत. आंध्रा स्टाईलचं आंबट तिखट आवळ्याचं लोणचं एक वर्षापर्यंत व्यवस्थित टिकतं.
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
बाजारात सध्या आवळे मोठ्या प्रमाणात विकायला आले आहेत. आवळा शरीरासाठी वरदान मानला जातो. आवळ्यात असलेलं विटामिन सी शरीराला खूप फायदेशीर ठरतं. तसंच अँटीऑक्सिडंट्समुळे त्वचेच्या समस्या कमी होण्यास मदत होईल.
जेवणाच्या ताटात लोणचं असलं की अनेकांना बरं वाटतं. लोणच्याशिवाय जेवणाला चव लागतच नाही, असंही अनेक जण म्हणतात. कैरीचं लोणचं, मिरचीचं लोणचं, गोड लोणचं असं खाऊन कंटाळा आला असेल तर आंध्रा स्टाईलने आवळ्याचं आंबट तिखट लोणचं करून बघता येईल. या पद्धतीने केलेलं लोणचं एक वर्षापर्यंत व्यवस्थित टिकतं.
कच्चा आवळा खायला अनेकांना आवडत नाही. अशावेळी त्याचं चटकदार लोणचं करून खाता येईल. हे लोणचं गरमागरम भात, तांदळाची भाकरी, चपाती अशा पदार्थांसोबत खाता येतं. चला तर मग, हे लोणचं कसं करायचं ते पाहूया.
साहित्य: आवळा, लसूण, मीठ, तेल, लाल तिखट, मेथी दाणे, बडीशेप, चिंच आणि गूळ.
कृती: आंध्रा स्टाईलचं चटपटीत आवळ्याचं लोणचं करण्यासाठी सर्वात आधी आवळे स्वच्छ पाण्याने धुवून घ्या. लसूण पाकळ्यांची साल काढा. आवळ्याच्या मध्यम आकाराच्या फोडी करा. गॅसवर कढई गरम करून त्यात मेथी दाणे, बडीशेप आणि मोहरी मंद आचेवर लालसर होईपर्यंत भाजा. नंतर ते थंड होण्यासाठी बाजूला ठेवा.
थंड झालेले हे पदार्थ मिक्सरच्या भांड्यात घालून बारीक पावडर करा. एका वाटीभर पाण्यात चिंच भिजत घाला आणि हाताने कुस्करून तिचा गर काढून घ्या. कढई गरम करून त्यात चिंचेचा गर घाला आणि मंद आचेवर चमच्याने सतत हलवत राहा. चिंचेतलं पाणी पूर्णपणे आटवून टाका.
आता कढईत तेल गरम करा. त्यात लसूण पाकळ्या आणि आवळे घालून मंद आचेवर परतून घ्या. त्यानंतर एका मोठ्या भांड्यात आवळे, लसूण, चिंचेचा कोळ, तयार केलेला मसाला, लाल तिखट आणि मीठ घालून सगळं नीट मिसळा.
शेवटी आवळे परतलेलं तेल या लोणच्यात घाला आणि सर्व साहित्य पुन्हा व्यवस्थित मिक्स करा. आंध्रा स्टाईलचं चटपटीत आवळ्याचं लोणचं तयार आहे. हे लोणचं वर्षभर व्यवस्थित टिकून राहतं.
कमेंट
अजून कमेंट नाही. पहिली तुम्ही लिहा.