बुधवार, 4 नोव्हेंबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट

दिवाळीआधी शेतकऱ्यांच्या खात्यात आज आणि उद्या प्रत्येकी 5 हजार रुपये जमा होणार

दिवाळीआधी शेतकऱ्यांच्या खात्यात आज आणि उद्या प्रत्येकी 5 हजार रुपये जमा होणार छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
राजकारण PT24 राजकारण डेस्क

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उरलेली रक्कम आज आणि उद्या शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याचे आदेश दिले आहेत. आतापर्यंत 73 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात 5000 रुपये जमा झाले आहेत.

दिवाळीच्या आधीच शेतकऱ्यांसाठी चांगली बातमी आहे. दुष्काळ निवारण्यासाठी राज्य सरकारने प्रत्येक शेतकऱ्याला 5 हजार रुपये देण्याची घोषणा आधी केली होती. ही रक्कम दिवाळीपूर्वीच दिली जाईल, असेही सरकारने स्पष्ट केले होते. त्यानुसार आज आणि उद्या शेतकऱ्यांच्या खात्यात प्रत्येकी 5 हजार रुपये जमा करण्यात येणार आहेत. तसे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे आणि त्यांची दिवाळी गोड होणार आहे.

राज्यात भीषण दुष्काळ पडला आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने केंद्राच्या मदतीची वाट न पाहता शेतकऱ्यांना अग्रिम रक्कम म्हणून 5 हजार रुपये देण्याची घोषणा केली होती. दिवाळीपूर्वीच ही रक्कम देणार, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी जाहीर केले होते. या रकमेचे वाटप करायला सुरुवातही झाली होती. उरलेले पैसे जमा करण्यासाठी मुख्यमंत्री आजच्या कॅबिनेट बैठकीत आदेश देणार, असे सांगितले जात होते. पण त्याआधीच मुख्यमंत्र्यांनी उरलेली रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याचे आदेश दिले आहेत.

आतापर्यंत 73 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात 5000 रुपये जमा झाले आहेत. ज्या खात्यांमध्ये अजून पैसे आलेले नाहीत, त्यांच्यात उरलेली रक्कम आज आणि उद्या जमा होणार आहे, असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. उद्यापासून दिवाळी सुरू होत आहे. त्याआधीच खात्यात पैसे येणार असल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. तसेच सर्व मंत्र्यांनी शेतकऱ्यांसोबत दिवाळी साजरी करावी, असे आदेशही फडणवीस यांनी दिले आहेत.

दरम्यान, राज्य सरकारने राज्यातील 305 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केला आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी याबाबतची घोषणा केली होती. शेतकऱ्यांचे सर्व पंचनामे करण्यात आले आहेत. त्यामुळे राज्य सरकारने केंद्राकडे 40 हजार कोटी रुपयांचा प्रस्ताव पाठवला आहे. केंद्र सरकार राज्याला किती कोटी रुपयांचे पॅकेज देते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

शेतकऱ्यांच्या जनावरांसाठी चारा आणि पाण्याची व्यवस्थाही राज्य सरकारने केली आहे. सिंधुदुर्गातून चारा खरेदी केला जाणार आहे. ज्या ठिकाणी पाणी आहे, तिथे शेतकऱ्यांनी चाऱ्याची लागवड करावी आणि हा चारा सरकार विकत घेईल, असे सरकारने स्पष्ट केले आहे. अशा प्रकारे शेतकऱ्यांना थेट पैसे देण्यासोबतच जनावरांच्या चाऱ्याची आणि पाण्याची व्यवस्था करण्यावरही राज्य सरकारने भर दिला आहे.

#मुंबई#सियासत#PT24#Politics#Mumbai

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही 'तुम्ही' वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ