दुष्काळावर सरकारचा आणखी एक मोठा निर्णय, केंद्राकडे 40 हजार कोटींच्या मदतीचा प्रस्ताव
राज्यातील 305 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर झाला असून शेतकऱ्यांना प्रत्येकी 5 हजार रुपये अग्रीम याच आठवड्यात मिळणार आहेत. केंद्राकडे 31 ऑक्टोबर रोजी प्रस्ताव जाणार आहे.
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
राज्य सरकारने राज्यातील 305 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केला आहे. शेतकऱ्यांना प्रत्येकी 5 हजार रुपये अग्रीम रक्कम म्हणून द्यायचा निर्णयही सरकारने घेतला आहे. विशेष म्हणजे केंद्राच्या मदतीची वाट न पाहता ही रक्कम याच आठवड्यात दिली जाणार आहे. आजच्या कॅबिनेटच्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिकाऱ्यांना तसे आदेश दिले आहेत.
दुष्काळाचा सामना करण्यासाठी राज्य सरकारने अनेक उपाययोजना केल्या आहेत. त्याचबरोबर सरकारने आज आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे. तो निर्णय म्हणजे शेतकऱ्यांना मदत मिळावी यासाठी केंद्र सरकारकडे परिपूर्ण प्रस्ताव पाठवण्याचा.
राज्य सरकार हा प्रस्ताव 31 ऑक्टोबर रोजी केंद्र सरकारकडे पाठवणार आहे. खात्रीलायक सूत्रांच्या माहितीनुसार हा प्रस्ताव तब्बल 40 हजार कोटी रुपयांच्या मदतीचा असेल. म्हणजेच राज्य सरकार केंद्राकडे 40 हजार कोटींचे पॅकेज मागणार आहे.
याआधी राज्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन दुष्काळाची पाहणी केली होती. त्यावेळी त्यांनी शेतकऱ्यांची गाऱ्हाणी ऐकून घेतली आणि त्यांची निवेदने स्वीकारली. शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, असे आश्वासनही त्यांनी दिले होते. त्याच काळात सरकारमधील अनेक मंत्री आणि आमदारांनीही शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली होती.
त्यानंतर फडणवीस यांनी शेतकऱ्यांसाठी प्रत्येकी 5 हजार रुपये अग्रीम मदत दिली जाणार असल्याची घोषणा केली होती. आता ही मदत याच आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे.
पंचनामे पूर्ण होण्याआधीच मुख्यमंत्र्यांनी ही मदत देण्याची घोषणा केली होती. केंद्र सरकारची मदत येण्याआधीच ही मदत जाहीर झाली होती. केंद्राच्या पथकाने राज्यात येऊन दुष्काळी परिस्थितीची पाहणी केली होती. अधिकाऱ्यांनीही शेतात जाऊन पंचनामे केले होते.
त्यानंतर आता हा प्रस्ताव तयार झाला असून, येत्या 31 ऑक्टोबर रोजी तो केंद्र सरकारला पाठवला जाणार आहे. केंद्राकडून महाराष्ट्राला किती आर्थिक मदत मिळते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
कमेंट
अजून कमेंट नाही. पहिली तुम्ही लिहा.