गुरुवार, 5 नोव्हेंबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट

दिवाळीत मिठाई घेताना परवाना, लेबल आणि मुदत तपासा, एफडीए आयुक्त मुंढे यांचे आवाहन

दिवाळीत मिठाई घेताना परवाना, लेबल आणि मुदत तपासा, एफडीए आयुक्त मुंढे यांचे आवाहन छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
कल्चर PT24 संस्कृती डेस्क

भेसळखोरांवर राज्यभर कारवाई सुरू असून दूध, खवा, तेल, चांदीचा वरक आणि गिफ्ट बॉक्स खरेदी करताना काय पाहावे, याच्या सूचना आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिल्या आहेत.

मुंबई : दिवाळीच्या काळात बाजारात खरेदीला मोठा जोर आलेला असतानाच अन्न व औषध प्रशासनाने (FDA) लोकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या भेसळखोरांविरुद्ध कडक कारवाई सुरू केली आहे. एफडीएचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पत्रकार परिषद घेऊन दूध, खाद्यतेल, मिठाई, खवा, नमकीन आणि दुग्धजन्य पदार्थांवर राज्यभरात करण्यात आलेल्या कारवाईची माहिती दिली.

एफडीए हे जनतेच्या आरोग्याचे संरक्षण करणारे कवच आहे, असे मुंढे यांनी सांगितले. बाजारात कुठेही खाद्यपदार्थांमध्ये चुकीचे प्रकार किंवा भेसळ आढळली, तर नागरिकांनी थेट आमच्याकडे तक्रार करावी, असे आवाहन त्यांनी केले आहे.

सणांच्या काळात मिठाई आणि खव्याला मोठी मागणी असते. त्यामुळे ग्राहक आणि व्यापारी या दोघांसाठीही मुंढे यांनी महत्त्वाच्या सूचना जारी केल्या आहेत. सर्वात आधी दुकानाकडे एफडीएचा वैध परवाना आहे का, ते तपासावे आणि तो असलेल्या दुकानातूनच खरेदी करावी, असे त्यांनी सांगितले.

खरेदी मर्यादेतच ठेवावी, असेही त्यांनी म्हटले आहे. गरज असेल तेवढीच मिठाई घ्यावी. 02 दिवसांत संपेल एवढाच साठा आणावा; 08 दिवस पुरेल एवढी मिठाई आणून फ्रिजमध्ये ठेवू नये. ज्या खव्यावर लेबल नाही किंवा ज्याची मुदत उलटून गेली आहे, तो खवा तसेच स्वस्त आणि भडक रंगाचा माल घेऊ नये, असेही त्यांनी स्पष्ट केले.

दूध आणि तुपाबाबत सुटे किंवा कच्चे दूध घेण्याऐवजी पॅक केलेले दूध घ्यावे, अशी सूचना आहे. तूप किंवा तेलात कोणत्याही प्रकारची प्राण्यांची चरबी (Animal Fat) किंवा रासायनिक भेसळ खपवून घेतली जाणार नाही, असे एफडीएने स्पष्ट केले आहे. तळणीचे खाद्यतेल पुन्हापुन्हा वापरू नये, असेही सांगण्यात आले आहे.

लाडू किंवा इतर मिठाईत रासायनिक रंगांचा जादा वापर करू नये. नैसर्गिक रंग वापरायचे असतील, तर तेही मर्यादेतच वापरावेत. नियम मोडणारे भडक रंगांचे अन्नपदार्थ एफडीएने नष्ट केले आहेत.

मिठाईवर लावला जाणारा चांदीचा वरक (Silver Foil) शुद्धच असला पाहिजे. चांदीऐवजी ॲल्युमिनियमचा (Aluminium) वापर केला, तर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा देण्यात आला आहे.

दिवाळीनिमित्त दिले जाणारे गिफ्ट बॉक्स, चॉकलेट्स, केक आणि मोदक घेताना त्यावरील लेबलिंग (Labeling) आणि मुदत संपण्याची तारीख (Expiry Date) तपासणे अत्यंत गरजेचे आहे. गिफ्ट व्हाउचर किंवा हॅम्परमध्ये अनेकदा मुदत संपलेल्या वस्तू दिल्या जाण्याची शक्यता असते. म्हणूनच सगळी माहिती घेऊनच खरेदी करावी, असे सांगत एफडीएने भेसळमुक्त सण साजरा करण्याचे आवाहन केले आहे.

#मुंबई#कल्चर#PT24#Culture#Mumbai

जाहिरात

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही 'तुम्ही' वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ