हर्ष गोयंका यांच्याकडून तुकाराम मुंढे यांचे तोंडभरून कौतुक, मुंढे म्हणाले, 'मी तर एका मोठ्या टीमचा छोटासा भाग'
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
उद्योगपती हर्ष गोयंका यांनी एक्सवर सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांचे कौतुक केले. त्यावर मुंढे यांनी दिलेल्या नम्र उत्तराने नेटकऱ्यांची मने जिंकली.
सनदी अधिकारी तुकाराम मुंढे हे धडाकेबाज कारवाया, प्रामाणिकपणा आणि सडेतोड स्वभावासाठी ओळखले जातात. अन्न आणि औषध प्रशासनाची (FDA) सूत्रे हाती आल्यापासून त्यांचे नाव देशातच नव्हे, तर परदेशातही गाजत आहे. सर्वसामान्य लोकच नाही, तर उद्योगपतीही त्यांच्यावर फिदा आहेत.
प्रसिद्ध उद्योगपती हर्ष गोयंका यांनी एक्स या समाज माध्यमावर मुंढे यांचे तोंडभरून कौतुक केले. देशाला अशा अधिकाऱ्यांची गरज आहे, असे त्यांनी स्पष्ट सांगितले. अशा कर्तव्यकठोर अधिकाऱ्याला भेटण्याची उत्सुकता प्रत्येक नागरिकाला असते, असेही त्यांनी म्हटले.
सर्वसामान्य नागरिकांना सरकारी अधिकाऱ्यांकडून ज्या अपेक्षा असतात, तेच काम मुंढे प्रत्यक्षात करून दाखवतात, असे गोयंका यांचे म्हणणे आहे. अन्नातील भेसळ, अस्वच्छ हॉटेल्स आणि बड्या आस्थापनांवर धडक कारवाई करून ते जनतेचे रक्षण करत आहेत, असे कौतुक गोयंका यांनी केले.
गोयंका यांनी ही पोस्ट एक्सवर टाकताच त्यावर कमेंट्सचा पाऊस पडला. अनेक नेटकऱ्यांनी आणि दिग्गजांनी मुंढे यांच्या प्रामाणिक कामाचे जोरदार कौतुक केले. या कौतुकाच्या पोस्टला मुंढे यांनी स्वतः उत्तर दिले आणि त्या उत्तराने नेटकऱ्यांची मने जिंकली.
मुंढे हे कर्तव्यदक्ष आणि तत्त्वनिष्ठ अधिकारी म्हणून ओळखले जातात. इतक्या मोठ्या पदावर असूनही त्यांचा तोल ढळत नाही आणि ते तितकेच नम्रही आहेत. गोयंका यांच्या कौतुकाला त्यांनी तेवढ्याच नम्रतेने उत्तर दिले. हे उत्तर त्यांनी ३० ऑक्टोबर २०२६ रोजी आपल्या एक्स खात्यावर लिहिले.
मुंढे यांनी म्हटले की, लोकसेवा ही कोणत्याही एका व्यक्तीभोवती फिरत नाही. प्रामाणिकपणा, धैर्य आणि ठाम निष्ठेने नागरिकांची सेवा करण्याची ती सामूहिक बांधिलकी आहे. देशात असे अनेक सनदी अधिकारी आहेत, जे उत्कृष्ट काम करत आहेत. कदाचित ते माझ्यापेक्षाही चांगले काम करत असतील, पण त्यांच्या प्रयत्नांना हवी तशी ओळख मिळत नाही.
मुंढे पुढे म्हणाले की, मी तर याच उद्दिष्टासाठी काम करणाऱ्या एका मोठ्या टीमचा फक्त छोटासा भाग आहे. आम्ही जे काही साध्य करतो, ते नेहमी सामूहिक प्रयत्नांतूनच होते. नागरिकांचा विश्वास आणि त्यांच्या अपेक्षा ही आमची सर्वात मोठी जबाबदारी आहे. प्रामाणिक, उत्तरदायी आणि नागरिककेंद्री लोकसेवा हा अपवाद असता कामा नये, तो नियमच असला पाहिजे.
मुंढे यांच्या या नम्र उत्तराबद्दलही नेटकऱ्यांनी त्यांचे कौतुक केले आहे. या उत्तराने नेटकऱ्यांची मने जिंकली. त्यांनी देशातील इतर प्रामाणिक सनदी अधिकाऱ्यांचे मनोबलही उंचावले, अशी प्रतिक्रिया उमटत आहे.
कमेंट
अजून कमेंट नाही. पहिली तुम्ही लिहा.