शनिवार, 31 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट

नागपाड्यातील पोलीस कँटिनला एफडीएचा दणका, चालकाला 75 हजार रुपये दंड

नागपाड्यातील पोलीस कँटिनला एफडीएचा दणका, चालकाला 75 हजार रुपये दंड छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
नागरी PT24 शहर डेस्क

मुंबई पोलिसांच्या नागपाडा येथील मोटार ट्रान्सपोर्ट विभागाच्या कँटिनमधील अस्वच्छतेबद्दल एफडीएने कारवाई केली. पोलीस कर्मचारी वर्षभर तक्रारी करत होते.

अन्न व औषध प्रशासन म्हणजेच एफडीए विभागाचे प्रमुख तुकाराम मुंढे यांनी मुंबईतील पोलीस कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. मुंबई पोलिसांच्या नागपाडा येथील मोटार ट्रान्सपोर्ट विभागाच्या कँटिनवर एफडीएने कारवाई केली असून कँटिन चालकाला 75 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. कँटिनमध्ये असलेल्या अस्वच्छतेवरून ही कारवाई झाली. गेल्या काही महिन्यांपासून मुंढे यांचा विभाग भेसळखोरांविरोधात सातत्याने कारवाई करत आहे.

नागपाड्याच्या या कँटिनमधील खाद्यपदार्थांचा दर्जा आणि अस्वच्छता याबद्दल मुंबई पोलीस दलातील कर्मचारी गेल्या वर्षभरापासून वरिष्ठांकडे तक्रारी करत होते. वरिष्ठांनी त्याची दखल घेतली नाही, म्हणून अखेर या कर्मचाऱ्यांनी थेट तुकाराम मुंढे यांच्या एफडीएकडे धाव घेतली. त्यानंतर मुंढे यांनी अवघ्या आठवडाभरात ही तक्रार मार्गी लावली आणि कँटिनवर कारवाई केली. पोलीस दलातील वरिष्ठांना जे जमले नाही ते मुंढे यांनी आठवडाभरात करून दाखवले, अशी चर्चा सर्वत्र रंगली आहे.

तुकाराम मुंढे यांनी शुक्रवारी मुंबईत पत्रकार परिषद घेतली होती. दिवाळीतही भेसळखोरांवरील कारवाई सुरू ठेवणार असल्याचे त्यांनी तेव्हा स्पष्ट केले. दिवाळी आली आहे आणि आपली खाद्य संस्कृती आहे, त्यामुळे खाद्य तयार करताना योग्य तेलाचा वापर करणे गरजेचे आहे, असे ते म्हणाले. भेसळयुक्त तेलाविरोधातील मोहीम सुरू आहे आणि ती यापुढेही सुरू राहील, असा इशारा त्यांनी दिला.

खाद्यतेलाच्या आतापर्यंत 1089 तपासण्या करण्यात आल्या आहेत, असे मुंढे यांनी सांगितले. यात 80 लायसन रद्द करण्यात आली, तर 28753 क्विंटल माल जप्त करण्यात आला. अन्न व्यावसायिकांनी खबरदारी घ्यायला हवी, ही फक्त विक्रेत्याची जबाबदारी नाही, असेही त्यांनी सांगितले. कंपनी छोटी असो किंवा मोठी, कालबाह्य अन्नाची एकही पिशवी बाहेर येणार नाही याची काळजी घ्यावी, असा इशारा मुंढे यांनी दिला.

फक्त कारवाई करणे हे आमचे उद्दिष्ट नाही आणि आम्ही केवळ आमचे काम करत आहोत, असे मुंढे म्हणाले. त्यांच्या म्हणण्यानुसार सर्वात मोठी गोष्ट म्हणजे कम्प्लायन्स ऑर्डर आणल्या आहेत. हॉटेल, दूध आणि दुधाचे पदार्थ, तेल, स्कूल फूड किंवा इतर बाबींमध्ये कोणते नियम असावेत, याची ऑर्डर काढण्यात आली आहे. आतापर्यंत असे 22 नियम आले आहेत. फूड बिझनेस, लायसन्स होल्डर आणि अधिकारी यांची जबाबदारी काय आहे, तेही सांगणार असल्याचे त्यांनी नमूद केले.

आजची ऑर्डर एक्स्पायर रिटर्न अँड डॅमेज फूड याबद्दल आहे, असे मुंढे यांनी सांगितले. अशी ऑर्डर कोणत्याही राज्यात नाही, असेही ते म्हणाले. कालबाह्य झालेले आणि खराब झालेले अन्न पुन्हा वापरात आणले जाते, त्याबाबत ही ऑर्डर आहे. अन्न पूर्णपणे नष्ट केल्याचा पुरावा कंपनीला द्यावा लागेल, असे तुकाराम मुंढे यांनी सांगितले.

#मुंबई#शहर#PT24#Civic#Mumbai

जाहिरात

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही 'तुम्ही' वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ