युरिक ॲसिड वाढल्यावर दिसतात ही गंभीर लक्षणे; सांधेदुखी कमी करण्यासाठी घरगुती उपाय
वयाच्या ४० ते ५० वर्षांनंतर शरीरातील युरिक ॲसिड झपाट्याने वाढू लागते. त्याची लक्षणे कोणती आणि ते कमी करण्यासाठी आहारात काय करावे, ते जाणून घ्या.
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
धावपळीची जीवनशैली, खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी, पोषक घटकांची कमतरता आणि अपुरी झोप, अशा अनेक गोष्टींचा परिणाम शरीरावर लगेच दिसतो. म्हणूनच शरीरात होणाऱ्या बदलांकडे अजिबात दुर्लक्ष करणे धोक्याचे ठरू शकते.
वयाच्या ४० ते ५० वर्षांनंतर शरीरातील युरिक ॲसिड झपाट्याने वाढू लागते. हे ॲसिड शरीराला निरुपयोगी असते आणि हळूहळू त्रासदायक ठरते. ते वाढले की पायाच्या अंगठ्याजवळ जास्त वेदना होतात. सकाळी उठल्यावर पाय जमिनीवर टेकवणेसुद्धा नकोसे वाटते. सांध्यांमध्ये युरिक ॲसिडची पातळी वाढली, तरी सुरुवातीच्या दिवसांत फारशी लक्षणे दिसत नाहीत. पण काही काळाने अतिशय तीव्र वेदना सुरू होतात.
आता युरिक ॲसिडची पातळी वाढल्यावर कोणती लक्षणे दिसू शकतात आणि ते कमी करण्यासाठी आहारात कोणत्या पदार्थांचा समावेश करावा, हे सविस्तर पाहू या.
पातळी वाढल्यावर दिसणारी लक्षणे अशी आहेत. पायाच्या मोठ्या अंगठ्यात अचानक आणि तीव्र वेदना होतात. घोटा, गुडघा, कोपर किंवा मनगटाच्या सांध्यांमध्येही वेदना होऊ शकतात. लघवी करताना जळजळ होते. सतत मळमळते आणि उलट्या होतील असे वाटते. थकवा आणि अशक्तपणा जाणवतो. लघवीचा रंग गढूळ होणे किंवा लघवीतून रक्त पडणे ही लक्षणे दिसू लागली, तर त्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नये आणि वेळीच उपचार करावेत.
आता वाढलेले युरिक ॲसिड कमी करण्यासाठीचे उपाय. रोज २ ते ३ लिटर पाणी पिणे यासाठी फार आवश्यक आहे. पाणी प्यायल्याने शरीरातील विषारी घटक बाहेर पडायला मदत होते. जास्तीचे युरिक ॲसिड शरीराबाहेर गेले की सांध्यांना आलेली सूज कमी होईल.
आहारात प्रक्रिया केलेले खाद्यपदार्थ, प्रिझर्व्हेटिव्हस, यीस्ट असलेले पदार्थ, बाजारात मिळणारी डबाबंद शितपेये आणि फ्रुक्टोज यांचा अजिबात समावेश करू नये. या पदार्थांमुळे शरीराला हानी पोहोचण्याची शक्यता जास्त असते.
रोजच्या जेवणात वेगवेगळ्या भाज्या असतात. पण भेंडी, कोबी आणि वांगी यांसारख्या भाज्या जास्त खाणे टाळावे. त्याऐवजी पालेभाज्या आणि विटामिन सी जास्त असलेल्या भाज्या व फळे आहारात घ्यावीत. आंबट फळे खाल्ल्याने युरिक ॲसिड कमी होण्यास मदत होते. दूध, तूप आणि इतर दुग्धजन्य पदार्थ योग्य प्रमाणात खाणे शरीरासाठी फायदेशीर ठरते. आहारात फायबर असलेले पदार्थ जास्तीत जास्त खाल्ले, तर पचनक्रिया चांगली राहण्यास मदत होते.
हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी आहे. कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यात केलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
कमेंट
अजून कमेंट नाही. पहिली तुम्ही लिहा.