शनिवार, 10 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
03:11 IST

रशियाच्या यांडेक्सच्या दोन डेटा सेंटरवर दोन दिवसांत ड्रोन हल्ले

रियाझान प्रदेशातील सासोवो आणि कालुगा प्रदेशातील यांडेक्सच्या केंद्रांना फटका बसला असून AI विकसित करणाऱ्या सुपरकम्प्युटरवर परिणाम होण्याची शक्यता आहे.

रशियाच्या यांडेक्सच्या दोन डेटा सेंटरवर दोन दिवसांत ड्रोन हल्ले छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत

रशिया आणि युक्रेनमधील युद्ध थांबायचे नाव घेत नाही. हे युद्ध आता अनेक पातळ्यांवर सुरू झाले आहे, म्हणजेच लढाई एकाच आघाडीवर न राहता अनेक ठिकाणी आणि अनेक प्रकारे सुरू आहे. युक्रेनने याआधीच रशियाच्या तेल साठ्यावर हल्ला केल्याचा दावा केला आहे. आता दोन्ही देशांकडून एकमेकांच्या डिजिटल पायाभूत सुविधांनाही लक्ष्य केले जात आहे.

युक्रेनने रशियाची आघाडीची तंत्रज्ञान कंपनी यांडेक्स (Yandex) हिच्या डेटा सेंटरवर ड्रोन हल्ले केल्याची माहिती समोर आली आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) विकसित करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या संगणकीय यंत्रणेवर या हल्ल्यांमुळे परिणाम होण्याची शक्यता आहे.

दोन दिवसांत दोन डेटा सेंटरवर हल्ले झाले. गुरुवारी, ८ ऑक्टोबर रोजी रियाझान प्रदेशातील सासोवो येथे असलेल्या यांडेक्सच्या डेटा सेंटरला ड्रोन हल्ल्याचा फटका बसला. या हल्ल्यानंतर केंद्रात आग लागली आणि त्याचे कामकाज पूर्णपणे थांबवावे लागले.

त्यानंतर शुक्रवारी, ९ ऑक्टोबर रोजी मॉस्कोच्या नैऋत्येकडील कालुगा प्रदेशातील यांडेक्सच्या दुसऱ्या डेटा सेंटरवर ड्रोन हल्ला झाला. या हल्ल्यात केंद्रातील काही मॉड्यूल पूर्णपणे बंद पडल्याचे कंपनीने सांगितले. या दुसऱ्या हल्ल्यात डेटा सेंटरचे नुकसान झाले असून काही सेवांमध्ये व्यत्यय येण्याची शक्यता कंपनीने व्यक्त केली आहे.

सासोवो येथील डेटा सेंटरमध्ये यांडेक्सचे तीनपैकी दोन सुपरकम्प्युटर ठेवण्यात आले आहेत. या अत्याधुनिक संगणकांचा वापर कंपनीच्या AI मॉडेल्सचा विकास आणि प्रशिक्षण यासाठी केला जातो. त्यामुळे या केंद्रावरील हल्ला रशियाच्या कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रासाठी महत्त्वाचा ठरू शकतो.

हल्ल्यानंतर केंद्रातील उपकरणांचे किती नुकसान झाले आहे, याचा कंपनीकडून आढावा घेतला जात आहे. नुकसान झालेली यंत्रणा पुन्हा सुरू करता येईल की नाही, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. या हल्ल्यामुळे यांडेक्सच्या काही डिजिटल सेवांवर परिणाम झाला होता.

गेल्या काही आठवड्यांत रशियाने युक्रेनमधील डेटा सेंटर आणि दूरसंचार पायाभूत सुविधांवर हल्ले केले आहेत. त्यामुळे युक्रेनमधील इंटरनेट सेवा आणि डिजिटल व्यवस्थेला फटका बसला आहे. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी रशियाच्या या हल्ल्यांना प्रत्युत्तर देण्याची भूमिका मांडली आहे. रशियाच्या हल्ल्यांना उत्तर देणे ही युक्रेनची रणनीती असल्याचे यातून दिसते.

आता दोन्ही देशांकडून ऊर्जा प्रकल्प, तेल शुद्धीकरण कारखाने, बंदरे आणि डिजिटल केंद्रांना लक्ष्य केले जात असल्याचे चित्र आहे. यांडेक्सच्या दोन केंद्रांवरील हल्ल्यांमुळे या संघर्षात तंत्रज्ञान क्षेत्राचे महत्त्व अधोरेखित झाले आहे. मात्र AI प्रणालींना प्रत्यक्षात किती नुकसान झाले आणि त्याचा दीर्घकालीन परिणाम काय असेल, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ