सौदीच्या मदतीला इजिप्त पुढे, हुथींच्या हल्ल्यांमुळे सौदीसमोर आव्हान
हुथींच्या हल्ल्यांमुळे अडचणीत आलेल्या सौदी अरेबियाला मदत करण्याची तयारी इजिप्तने दाखवली आहे, मात्र लष्करी मदतीसाठी संसदेची मंजुरी लागणार आहे.
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
मध्यपूर्वेतील संघर्ष आता आणखी तीव्र झाला आहे. हुथींनी यात उडी घेतल्यापासून परिस्थिती जास्तच चिघळली आहे. इजिप्तच्या राष्ट्रीय संरक्षण परिषदेने सौदी अरेबियाला सुरक्षा आणि शांतता राखण्यासाठी शक्य ती सर्व मदत देण्याची भूमिका मांडली आहे.
सौदीचे सार्वभौमत्व, भौगोलिक अखंडता आणि महत्त्वाच्या ठिकाणांच्या संरक्षणासाठी इजिप्त सहकार्य करणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र प्रत्यक्ष लष्करी मदतीचा निर्णय सौदीकडून विनंती आली तरच आणि आवश्यक संसदीय मंजुरीनंतरच घेतला जाणार आहे. त्यामुळे इजिप्त या संघर्षात कितवा खेळाडू ठरणार, हे अजून गुलदस्त्यातच आहे.
येमेनमधील हुथी बंडखोरांनी अलीकडच्या काळात सौदी अरेबियातील रियाध विमानतळावर आणि सरकारी तेल कंपनी सौदी अरामकोच्या सुविधांवर हल्ले केले. यावरून हुथींची ताकद किती वाढली आहे, याचा अंदाज जगाला आला आहे. सौदीसमर्थित येमेन सरकारच्या सैन्याशी पुन्हा संघर्ष सुरू झाल्यानंतर परिस्थिती अधिक बिघडली आहे. या हल्ल्यांमुळे सौदीच्या सुरक्षा व्यवस्थेसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.
इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष अल-सिसी यांनी संभाव्य लष्करी मदतीसाठी संसदेची विशेष बैठक बोलावण्याची मागणी केली आहे. सौदीच्या संरक्षणासाठी इजिप्त तयार असला तरी कोणावरही आक्रमण करण्याचा आपला हेतू नाही, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
इजिप्त आणि सौदी अरेबिया यांच्यात आधीपासूनच मजबूत राजनैतिक आणि आर्थिक संबंध आहेत. २०१५ मध्येही इजिप्त सौदीच्या नेतृत्वाखालील येमेनमधील लष्करी आघाडीत सहभागी झाला होता. मात्र त्यावेळी त्याची लढाऊ भूमिका मर्यादित होती, असे समजते.
या संघर्षाला सौदी सरकार म्हणजेच मोहम्मद बिन सलमान जबाबदार आहेत, असे म्हटले जाते. इराणमध्ये खमेनेई यांच्या अंत्यसंस्काराला हुथींचे काही प्रमुख लोक गेले होते. त्यानंतर येमेनची राजधानी सना येथे विमानतळावर उतरताना सौदी समर्थक लोकांनी त्यांच्यावर हल्ला चढवला, त्यामुळे विमानाने सनामध्ये न उतरता दुसऱ्या ठिकाणी लँडिंग केले. तेव्हापासून हुथींनी सौदीवर हल्ले सुरू केले, असे सांगितले जाते.
आपल्या प्रमुखांना मारण्याच्या कटामुळे हुथी चिडले आणि त्यांनी सौदीची नाकेबंदी सुरू केली. सौदीसमर्थक येमेन सरकार आणि अमेरिका सोबत असूनही हुथींचा बंदोबस्त झाला नाही. अमेरिकेतील मध्यावधी निवडणुकांमुळे अमेरिकेला हुथींवर हल्ला करणे शक्य नसल्याने सुरुवातीला पाकिस्तानला पुढे करण्यात आले, असे म्हटले जाते.
पाकिस्तानची मात्र पंचाईत झाली आहे. मक्का पॅक्ट केला असला तरी हुथींशी थेट लढाई करणे शक्य नाही, कारण हुथी शिया समुदायाचे मुस्लिम आहेत आणि पाकिस्तानात शियांची संख्या जवळपास ३५ टक्के आहे. त्यामुळे घरातील जनतेचा विरोध सहन होणार नाही. इस्रायलचेही नाव यात आले की सौदीच्या मदतीला इस्रायल तयार आहे. पण सौदीने इस्रायलची मदत घेतली तर सर्व मुस्लिम देशांकडून सौदीवर टीका होईल आणि नामुष्की ओढवेल, म्हणून इस्रायलची मदत घेणे सौदीला योग्य नाही. त्यामुळे आता इजिप्तने यात उडी घेतली आहे. पुढे काय घडते, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.