इलिनॉयमध्ये हिंदू मंदिरावरील गोळीबाराचा कट उधळला, १९ वर्षांचा तरुण पोलिसांच्या ताब्यात
पॅलाटाईन भागातील हिंदू मंदिरावर सामूहिक गोळीबार करण्याचा कट पोलिसांनी उधळला. या घटनेवर सद्गुरू यांनी X वर प्रतिक्रिया दिली आहे.
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
अमेरिकेतील इलिनॉय राज्यात पॅलाटाईन भागात असलेल्या एका हिंदू मंदिराला लक्ष्य करून सामूहिक गोळीबार (Mass Shooting) करण्याचा मोठा कट उधळला गेला आहे. अमेरिकन सुरक्षा यंत्रणांनी वेळेवर हालचाल केल्यामुळे हे शक्य झाले. हा कट उघडकीस आल्यावर जगभरात संतापाची लाट उसळली आहे.
या घटनेवर ईशा फाऊंडेशनचे संस्थापक सद्गुरू (Sadhguru) यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' वर आपले मत मांडले. त्यांनी लिहिले, "जेव्हा एखाद्या तरुणाचे आयुष्य द्वेषाने इतके विषारी होते की, तो स्वतःला वेगळे समजणाऱ्या निरपराध लोकांना मारण्याचा कट रचतो, तेव्हा हे स्पष्टपणे पुढच्या पिढीचे योग्य संगोपन करण्यात आपण समाज म्हणून अपयशी ठरल्याचे दर्शवते." सर्वांना सामावून घेण्याची भावना जोपासणे आणि मानवी जाणीव उंचावण्यासाठी काम करणे सर्वात महत्त्वाचे आहे, असेही त्यांनी म्हटले. अरोरा येथील हल्ला रोखण्यासाठी ज्यांनी तातडीने पावले उचलली, त्यांचे त्यांनी मनापासून आभार मानले.
ही गोष्ट ११ ऑक्टोबर रोजी समोर आली. माउंट प्रॉस्पेक्ट पोलीस विभागाला एका सजग नागरिकाकडून महत्त्वाची माहिती मिळाली. अलेक्झांड्रोस पापोराकिस नावाच्या १९ वर्षांच्या तरुणाकडून काही अतिशय आक्षेपार्ह आणि त्रासदायक इलेक्ट्रॉनिक संदेश आल्याची तक्रार नोंदवली गेली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पापोराकिसने एका हिंदू मंदिरात सामूहिक गोळीबार करण्याच्या कटाचा संपूर्ण दस्तऐवज आणि प्लॅन शेअर केला होता.
एवढेच नव्हे, तर या तरुणाने अत्याधुनिक रायफल, भरलेली मॅगझिन, बॉडी आर्मर आणि इतर सामरिक उपकरणांचे फोटोही पाठवले होते. ही माहिती मिळताच पॅलाटाईन पोलिसांनी माउंट प्रॉस्पेक्ट पोलिसांच्या मदतीने लगेच सूत्रे हलवली. पापोराकिस घरातून बाहेर पडण्याच्या तयारीत असतानाच पोलिसांनी त्याला घेराव घालून ताब्यात घेतले.
ताब्यात घेतल्यानंतर पॅलाटाईन पोलिसांच्या गुप्तहेरांनी त्याच्या घरावर शोध वॉरंट बजावले. झाडाझडतीत पोलिसांना मोठा साठा सापडला. त्यात एक अत्याधुनिक रायफल, शेकडो जिवंत काडतुसे, अनेक भरलेली मॅगझिन, टॅक्टिकल वेस्ट आणि बॉडी आर्मर जप्त करण्यात आले.
सर्वात गंभीर बाब म्हणजे, झाडाझडतीत श्वेतवर्णीय वर्चस्ववादी (White Supremacist) अतिरेकी विचारसरणीशी संबंधित काही वस्तू आणि पॅचेस पोलिसांना मिळाले. या साहित्यात दक्षिण आशियाई वंशाच्या आणि भारतीय वंशाच्या लोकांविरुद्ध द्वेष पसरवणारी आणि हिंसेला प्रोत्साहन देणारी विधाने लिहिलेली होती. आरोपीची ही मानसिकता धार्मिक द्वेषाने प्रेरित असल्याचे तपासात उघड झाल्याचे सांगण्यात आले आहे.
अमेरिकन गुप्तचर यंत्रणांच्या मते, आरोपी पापोराकिस ११ ऑक्टोबर रोजीच अरोरा परिसरातील एका हिंदू मंदिरावर हल्ला करण्याच्या तयारीत होता. पोलिसांनी त्याच्यावर दहशतवादी धमक्या देण्याचा (Class X Felony) आणि बेकायदेशीरपणे घातक शस्त्रे बाळगल्याचा गुन्हा दाखल केला आहे. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन न्यायाधीशांनी त्याला जामीन नाकारला आणि पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.
पॅलाटाईनचे पोलीस प्रमुख विल्यम नॉर्ड यांनी सांगितले की, या घटनेचे गांभीर्य खूप मोठे होते. पोलिसांनी एफबीआय (FBI) आणि इतर स्थानिक यंत्रणांच्या सहकार्याने झपाट्याने पावले उचलल्यामुळे मोठा रक्तपात टळला. प्रार्थनास्थळांची सुरक्षा हीच आपली प्राथमिकता असल्याचेही त्यांनी आवर्जून सांगितले.