सोमवार, 26 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
AQI 319 | Very Poor 08:35 IST

गोंदियात पुढील आठ महिन्यांचे पाणी नियोजन करा, पालकमंत्री इंद्रनील नाईक यांचे निर्देश

सुपर अल निनो आणि संभाव्य दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर गोंदिया जिल्ह्यात पिण्याचे आणि रब्बीसाठीचे पाणी पुरेसे मिळावे, यासाठी आढावा बैठकीत सूचना देण्यात आल्या.

गोंदियात पुढील आठ महिन्यांचे पाणी नियोजन करा, पालकमंत्री इंद्रनील नाईक यांचे निर्देश छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत

गोंदिया, दि. 22 : सुपर अल निनो आणि संभाव्य दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन जिल्ह्यातील नागरिकांना पिण्यासाठी तसेच रब्बी हंगामातील शेतीसाठी पुरेसे पाणी मिळावे, म्हणून पुढील आठ महिन्यांचे काटेकोर नियोजन करा, असे निर्देश पालकमंत्री इंद्रनील नाईक यांनी दिले.

टंचाई निवारणाच्या उपाययोजना आणि त्यांची प्रभावी अंमलबजावणी यावर चर्चा करण्यासाठी आज जिल्हा नियोजन भवन येथे पालकमंत्री नाईक यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक झाली. बैठकीला जिल्हा परिषद अध्यक्ष लायकराम भेंडारकर, खासदार राजेंद्र जैन, आमदार राजकुमार बडोले, विनोद अग्रवाल, विजय रहांगडाले, जिल्हाधिकारी मंदार पत्की, मुख्य कार्यकारी अधिकारी जेनित चंद्रा दोंतुला, पोलीस अधीक्षक गोरख भामरे, उपवनसंरक्षक पवनकुमार जोंग आणि संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

भूजल पातळीचा विचार करता नवीन बोअरवेलला परवानगी देऊ नये, अशा स्पष्ट सूचना नाईक यांनी दिल्या. उपलब्ध पाण्याचा योग्य वापर आवश्यक असून नागरिकांनीही पाणी काटकसरीने वापरावे, असे आवाहन त्यांनी केले. पाणीटंचाईवर मात करण्यासाठी नाले आणि तलावांचे खोलीकरण तसेच जलसंधारणाची कामे हाती घेण्यास सांगण्यात आले. ही कामे सुरू करण्यापूर्वी संबंधित लोकप्रतिनिधींशी चर्चा करून त्यांचे सहकार्य घ्यावे, असेही त्यांनी सांगितले.

ग्रामीण, शहरी आणि नगरपंचायत क्षेत्रातील पाणीटंचाईच्या उपाययोजनांचा बैठकीत सविस्तर आढावा घेण्यात आला. पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य देऊन पुढील आठ महिने पाणी उपलब्ध राहील असे नियोजन करावे, असे सांगण्यात आले. जिल्ह्यातील सर्व मोठे आणि मध्यम प्रकल्प, त्यातील सध्याचा पाणीसाठा तसेच आरक्षित पाण्याची माहिती पालकमंत्र्यांनी जाणून घेतली. रब्बी हंगामासाठी लागणारे पाणी मिळेल याचेही नियोजन करण्याचे निर्देश दिले गेले. इटियाडोह प्रकल्प, धापेवाडा उपसा सिंचन प्रकल्प, गोंदिया पाटबंधारे विभागांतर्गत येणारे प्रकल्प आणि कटंगी मध्यम प्रकल्प यातील पाणीसाठा व आरक्षित पाण्यावर सविस्तर चर्चा झाली. पुढील आठ महिन्यांसाठी आवश्यक पाणी राखून ठेवण्याच्या सूचनाही पालकमंत्र्यांनी दिल्या.

बोदलकसा धरणाचा पाळ तुटल्याने पाणी वाहून गेले आणि धरणातील पातळी कमी झाली आहे. यात कोणतीही जीवित अथवा वित्तीय हानी झालेली नाही. तरीही येणारी दुष्काळी परिस्थिती पाहता उपलब्ध पाण्याचे नीट नियोजन करावे आणि धरणाचे आवश्यक काम पूर्ण करण्यासाठी तातडीने कार्यवाही करावी, असे पालकमंत्र्यांनी सांगितले.

पाणीटंचाई आणि कीडरोगामुळे पिकांचे नुकसान झाले असेल, तर त्याचे योग्य पद्धतीने पंचनामे करण्याचे निर्देश संबंधित यंत्रणांना देण्यात आले. लोकप्रतिनिधींनी आपापल्या मतदारसंघातील संभाव्य पाणीटंचाईची स्थिती बैठकीत मांडली. पुढील काळात तीव्र टंचाई निर्माण झाली तर शेतकरी आणि नागरिकांवर परिणाम होऊ शकतो, म्हणून आतापासूनच प्रभावी नियोजन आवश्यक असल्याचे त्यांनी निदर्शनास आणले.

चाऱ्याबाबत जिल्हाधिकारी मंदार पत्की यांनी सांगितले की, जिल्ह्यात सध्या चारा टंचाई नाही आणि चारा छावणी सुरू करण्याची गरज नाही. जिल्ह्याबाहेर चारा नेण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी लागते, अशा सूचना संबंधित यंत्रणांना दिल्याचेही त्यांनी सांगितले. रब्बी हंगामात चारा उत्पादन वाढावे म्हणून शेतकऱ्यांना वैरण बियाणे देण्यासाठी 30 लाख रुपयांच्या अतिरिक्त निधीची मागणी करण्यात आली आहे. जिल्हा वार्षिक योजनेतून 50 लाख रुपयांचे वैरण बियाणे वाटप प्रस्तावित आहे. विदर्भ-मराठवाडा दुग्ध विकास प्रकल्पांतर्गत 6.51 लाख रुपयांचे वैरण बियाणे वाटले गेले असून आणखी 2.63 लाख रुपयांचे वाटप होणार आहे. वनक्षेत्रातील उपलब्ध चारा नागरिकांना देण्यासाठीही उपाययोजना केल्या जाणार आहेत. परिस्थितीनुसार ज्वारी, बाजरी, मका यांसारख्या कमी पाण्यात आणि लवकर वाढणाऱ्या वैरण पिकांचे बियाणे वाटण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.

भूजल पातळी तपासताना ज्या भागात उपसा झाला आहे तेथील विहिरीही तपासाव्यात, अशी सूचना लोकप्रतिनिधींनी केली. सध्या ठराविक विहिरींतून पातळी तपासली जाते, पण त्यांचा वापर शेतीसाठी किंवा इतर कामांसाठी होत नाही. त्यामुळे खरे चित्र समजण्यासाठी वापरातील विहिरींचीही तपासणी करावी, असे सांगण्यात आले.

जल जीवन मिशनअंतर्गत जिल्ह्यात 172 कामे झाल्याची माहिती बैठकीत देण्यात आली. या कामांची प्रत्यक्ष पडताळणी करून किती पूर्ण झाली, किती प्रलंबित आहेत आणि त्यांची सध्याची स्थिती काय, याचा अहवाल तयार करावा. तो मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी सादर करावा, असे निर्देश देण्यात आले.

धान खरेदी केंद्रांबाबत बैठकीत विचारणा झाली. आजपासून ही केंद्रे सुरू झाली असल्याचे जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी सांगितले. शेवटी, संभाव्य दुष्काळी परिस्थिती पाहता पाणी, चारा, शेती आणि नागरिकांच्या मूलभूत गरजांसाठी आवश्यक उपाययोजना वेळेत पूर्ण कराव्यात आणि टंचाई निर्माण होणार नाही यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे, असे निर्देश पालकमंत्री इंद्रनील नाईक यांनी दिले.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ