गोंदियातील दुष्काळात पालकमंत्री इंद्रनील नाईक यांनी शेतांत जाऊन पिकांची स्थिती पाहिली
तिरोडा तालुक्यातील पांजरा, विहीरगाव आणि गोंदिया तालुक्यातील डोंगरगाव येथे पालकमंत्र्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला.
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
गोंदिया, दि. 21 : जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन पालकमंत्री इंद्रनील नाईक यांनी आज तिरोडा तालुक्यातील पांजरा आणि विहीरगाव, तसेच गोंदिया तालुक्यातील डोंगरगाव परिसरातील शेतांना भेट दिली. प्रत्यक्ष शेतात जाऊन त्यांनी पिकांची स्थिती पाहिली.
पावसात पडलेल्या खंडाचा पिकांच्या वाढीवर काय परिणाम झाला, पाणी किती उपलब्ध आहे, पिकांचे किती नुकसान होऊ शकते आणि शेतकऱ्यांना कोणत्या अडचणी येत आहेत, हे त्यांनी शेतकऱ्यांशी बोलून जाणून घेतले. खरीप हंगामातील पिकांवर दुष्काळाचा काय परिणाम झाला हे समजून घेण्यासाठी पाऊस, पावसातील खंड, सिंचनासाठी उपलब्ध पाणी आणि संभाव्य उत्पादनावरील परिणाम याबद्दल संबंधित शेतकऱ्यांकडून सविस्तर माहिती घेण्यात आली.
ट्रिगर-1 मध्ये जिल्ह्यातून सर्वात आधी तिरोडा तालुक्याचे नाव जाहीर झाले होते. ट्रिगर-2 मध्ये गोंदिया जिल्ह्यातील उर्वरित सर्व तालुक्यांची नावे आली आहेत. इतर तालुक्यांच्या तुलनेत तिरोडा तालुक्यात दुष्काळाची परिस्थिती जास्त तीव्र असल्यामुळे हा दौरा महत्त्वाचा आहे.
पांजरा येथे पालकमंत्री नाईक यांनी शेतकरी बळीराम चामट यांच्या शेतातील नुकसान झालेल्या पिकांची पाहणी केली. त्यानंतर विहीरगाव येथे शेतकरी अशोक रहांगडाले यांच्या शेतातील पिकांची माहिती घेतली. गोंदिया तालुक्यातील डोंगरगाव येथे शेतकरी घनश्याम पटले यांच्या शेतातील नुकसानग्रस्त पिकांची पाहणी करून पावसाअभावी शेतीवर काय परिणाम झाला, याचा आढावा घेतला.
यावेळी शेतकऱ्यांनी पिकांच्या वाढीवर झालेला वाईट परिणाम, वाढता उत्पादन खर्च, सिंचनासाठी पाण्याची कमतरता आणि प्रतिकूल हवामानामुळे आलेल्या अडचणी पालकमंत्र्यांसमोर मांडल्या. पावसाच्या अनिश्चिततेमुळे खरीप हंगामातील उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता असल्याचेही शेतकऱ्यांनी सांगितले.
दुष्काळामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना शासनाकडून नुकसानभरपाईच्या स्वरूपात मदत मिळावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. पीक नुकसानीचे वस्तुनिष्ठ मूल्यांकन करून नियमानुसार नुकसानभरपाई आणि आवश्यक आर्थिक मदत द्यावी, तसेच सिंचनासाठी पाणी जास्त उपलब्ध व्हावे म्हणून प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणीही शेतकऱ्यांनी केली. शेतकऱ्यांच्या अडचणी प्रत्यक्ष जाणून घेऊन दुष्काळाची वस्तुस्थिती समजून घेण्याच्या दृष्टीने या पाहणी दौऱ्याला महत्त्व प्राप्त झाले आहे.
तिरोडा तालुक्यातील पांजरा आणि विहीरगाव येथील पाहणीच्या वेळी आमदार विजय रहांगडाले, तहसीलदार नारायण ठाकरे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी निलेश कानवडे, गटविकास अधिकारी संघमित्रा कोल्हे आणि तालुका कृषी अधिकारी आकाश गेडाम उपस्थित होते.
गोंदिया तालुक्यातील डोंगरगाव परिसरातील पाहणीच्या वेळी आमदार विनोद अग्रवाल आणि विजय रहांगडाले, तहसीलदार समशेर पठाण, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी निलेश कानवडे, डोंगरगावच्या सरपंच कोमेश्वरी टेंभरे आणि तालुका कृषी अधिकारी नेहा आढाव उपस्थित होते.
कमेंट
अजून कमेंट नाही. पहिली तुम्ही लिहा.