दिवाळीआधी ५ हजारांची घोषणा; धाराशिवच्या शेतकऱ्याने मुख्यमंत्र्यांना पाठवला आहेर
पवारवाडीतील प्रेमचंद मुंढे यांनी एक एकर सोयाबीनमधून मिळालेले २७२० रुपये मुख्यमंत्र्यांना पोस्टाने पाठवले आहेत.
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
राज्यात दुष्काळाची परिस्थिती आहे आणि दिवाळी तोंडावर आली आहे. अशा वेळी मुख्यमंत्र्यांनी प्रत्येक शेतकऱ्याला ५ हजार रुपये देण्याची घोषणा केली. त्यानंतर धाराशिव जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने याला 'बळीराजाची चेष्टा' म्हणत तीव्र प्रतिक्रिया दिली आहे.
पवारवाडी (जिल्हा धाराशिव) येथील शेतकरी प्रेमचंद बजरंग मुंढे यांनी आपल्या एक एकर सोयाबीनमधून मिळालेले २७२० रुपये मुख्यमंत्र्यांना 'आहेर' म्हणून पाठवले आहेत. यासाठी त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय, धाराशिव येथे अर्ज दिला आणि मुख्यमंत्र्यांना आहेर पाठवल्याची माहिती दिली.
मुंढे यांनी अर्जात म्हटले आहे की, "महाराष्ट्र दुष्काळग्रस्त असताना पिण्याच्या पाण्याची व जनावरांना चान्याची टंचाई भासत असतानाही दिवाळीच्या तोंडावर मुख्यमंत्री साहेबांनी प्रती शेतकऱ्याला ५००० रुपये घोषणा करून राज्यातील बळीराजाची चेष्टा केली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री साहेबांना शेतकऱ्याकडून भर पेरावा आहेर करण्यात आला आहे."
मुंढे यांनी सांगितले की, त्यांच्या शेतात एक एकरात फक्त ४० किलो सोयाबीन निघाले. १९ ऑक्टोबर २०२६ रोजी माजुली ट्रेडर्स येथे ते विकले. एक किलो कडता आणि १० रुपये हमाली धरून एकूण बिल २८०० रुपये झाले. त्यातून ८० रुपये वजा करता २७२० रुपये उरले. हीच रक्कम त्यांनी मुख्यमंत्र्यांना आहेर म्हणून पाठवली. "या पैशांत स्वतःच्या उपजीविकेसाठी किराणा तर उर्वरित राहिलेल्या पैशाच्या मुख्यमंत्री साहेबांना आहेर," असे ते म्हणाले.
अर्जात पुढे म्हटले आहे की, निवडणुकीच्या तोंडावर 'बळीराजाचे सरकार' अशी घोषणा केली गेली, पण त्याच शेतकऱ्यांच्या पाठीत खंजीर खुपसला. "लाडक्या बहिणीच्या भाच्याला त्या पाच हजार रुपयांत कपडे येतात काय? दिवाळीचा सण तोंडावर आला असल्याने बहिणीला-भाच्याला दिवाळीला कधी घेऊन येणार आणि त्यांचा सन्मान आम्ही कसा करणार?" असा सवाल मुंढे यांनी केला आहे.
मुंढे यांनी हेक्टरी किमान ५० हजार रुपये मदत देण्याची मागणी केली आहे. "आई तुळजाभवानीने नवरात्रीच्या व दशर्याच्या शुभ मुहूर्तावर मुख्यमंत्री साहेबांना सदबुद्धी देवून किमान शेतकऱ्याला ५०,००० रुपये हेक्टरी देण्यात यावे," अशी प्रार्थना त्यांनी केली आहे.
हा अर्ज आणि सोबतची कागदपत्रे, म्हणजे सोयाबीन विक्रीची पावती व स्पीड पोस्टची पावती, मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी (वर्शा बंगला, मालाबार हिल, मुंबई) पोस्टाने पाठवली आहेत. पोस्टाच्या पावतीनुसार २१ ऑक्टोबर रोजी ही रक्कम पाठवण्यात आली. धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयात अर्जाची नोंद झाली आहे, आणि शेतकऱ्याच्या या कृतीमुळे स्थानिक पातळीवर चर्चा सुरू झाली आहे.
ही बातमी प्रकाशित झाली आहे पण थेट मालिका सुरू झालेली नाही. डेस्कने अपडेट दाखल करताच तो इथे दिसेल.
कमेंट
अजून कमेंट नाही. पहिली तुम्ही लिहा.