फक्त १ कप तांदळापासून बनवा मऊ, दाणेदार मिठाई; मावा आणि मिल्क पावडरची गरज नाही
जेवणानंतर गोड खावंसं वाटतं का? कमी साहित्यात आणि कमी वेळात तयार होणारी ही सोपी तांदळाची मिठाई एकदा नक्की करून पाहा.
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
जेवणानंतर काहीतरी गोड खावंसं वाटतं का? मग ही रेसिपी तुमच्यासाठी खास आहे. गोड मिठाई बनवायची म्हटलं की त्यात अनेक साहित्य लागणार, असं आपल्याला वाटतं. पण ही मिठाई थोडी वेगळी आहे. ती बनवण्यासाठी फार साहित्याची गरज भासत नाही, शिवाय कमी वेळात ती बनून तयार होते. ही रेसिपी फार सोपी असून सहज बनते.
फक्त १ कप तांदळापासून तुम्ही हा स्वादिष्ट आणि रुचकर गोड पदार्थ बनवू शकता. अनेकांना जेवणानंतर गोड पदार्थ खाण्याची सवय असते, तर काहींना रात्री उशिरा गोड पदार्थ खाण्याची क्रेव्हिंग होत असते. अशा वेळी हा पदार्थ बनवणं तुमच्यासाठी चांगला पर्याय ठरेल. चला तर मग, या रेसिपीसाठी लागणारं साहित्य आणि कृती जाणून घेऊया.
साहित्य असं लागेल: १ कप तांदूळ, २ मोठे चमचे देशी तूप, १/४ कप पांढरे तीळ, १/४ कप सुका खोवलेला किंवा किसलेला नारळ, १/२ कप साखर, १ कप दूध, तसंच बारीक कापलेले काजू आणि पिस्ता.
ही मिठाई तयार करण्यासाठी सर्वात आधी १ कप तांदूळ घ्या. तुम्ही कोणत्याही प्रकारचे तांदूळ घेऊ शकता. हे तांदूळ पाण्याने दोन ते तीन वेळा चांगले धुवून घ्या. त्यानंतर तांदळातलं सगळं पाणी काढून टाका आणि तांदूळ एका कापडावर पसरून ठेवा, म्हणजे त्यातलं सगळं पाणी निघून जाईल. मग हे तांदूळ १० ते १५ मिनिटे पंख्याखाली किंवा उन्हात ठेवून सुकवून घ्या.
आता कढईत २ मोठे चमचे तूप घाला. त्यात तांदूळ टाकून मंद आचेवर ब्राउन रंग येईपर्यंत शिजवत ठेवा. तांदूळ चांगले शिजले की त्यात पांढरे तीळ घालून ते हलकेसे परता. त्यानंतर त्यात सुक्या नारळाचा किस घाला आणि पुन्हा सगळं साहित्य मंद आचेवर परतून घ्या.
सगळं साहित्य नीट शिजलं आणि खमंग वास येऊ लागला की गॅस बंद करा आणि हे सगळं साहित्य मिक्सरमध्ये वाटून घ्या.
यानंतर एक दुसरी कढई गॅसवर ठेवा आणि त्यात अर्धा कप साखर आणि घट्ट दूध घाला. साखर दुधात विरघळली की मिक्सरमध्ये वाटलेलं तांदळाचं साहित्य त्यात घाला. हे मिश्रण सतत ढवळत मंद आचेवर शिजत ठेवा.
जेव्हा साहित्य कढईला चिकटणं बंद होईल, तेव्हा तुमची मिठाई तयार झाली आहे असं समजा. तुम्हाला हवं असल्यास शेवटी आणखी थोडं तूप घालता येईल. शेवटी बारीक तुकडे केलेले काजू आणि पिस्त्याचे काप मिठाईवर घाला आणि तयार मिठाई खाण्यासाठी सर्व्ह करा.