कंटाळवाण्या नाश्त्याला बदला: झटपट बनवा चविष्ट पालक-पनीर पराठे
रोजचे पोहे, उपमा, ब्रेड खाऊन कंटाळा आला असेल, तर प्रोटीनयुक्त पालक पराठे घरी सहज करता येतात. जाणून घ्या सोपी कृती.
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
सकाळच्या नाश्त्याला रोज तेच पोहे, उपमा किंवा ब्रेड खाऊन अनेकांना कंटाळा येतो. मग रोज काहीतरी चविष्ट आणि हेल्दी काय करायचं, हा प्रश्न घराघरात पडतो. नवीन आणि हेल्दी काहीतरी हवं असेल, तर प्रोटीनयुक्त पालक पराठे नक्की करून पाहा. रोजच्या नाश्त्याला हेल्दी ट्विस्ट द्यायचा असेल, तर हा पदार्थ चांगला आहे. प्रोटीन, चव आणि आरोग्य, हे तिन्ही एकाच पदार्थात मिळतं.
या पराठ्यांमध्ये आयरनने भरपूर असलेला पालक, गव्हाचे पीठ आणि पनीर असतं. त्यामुळे हे पराठे चवीसोबत आरोग्यासाठीही फायदेशीर आहेत. सकाळच्या धावपळीतही ते घरी सहज तयार करता येतात. लहान मुलांच्या डब्यासाठी किंवा ऑफिसला जाणाऱ्यांसाठीही हा चांगला पर्याय ठरू शकतो.
साहित्य असं लागेल: गव्हाचे पीठ २ कप, ताजा पालक १ जुडी, किसून घेतलेले पनीर १०० ग्रॅम, १ ते २ हिरव्या मिरच्या, आल्याचा १ छोटा तुकडा, अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचा ओवा, अर्धा चमचा लाल तिखट, हळद, मीठ, तेल किंवा तूप आणि पाणी. हे सगळं घरात सहज मिळणारं साहित्य आहे, त्यामुळे वेगळी तयारी करावी लागत नाही.
कृती अशी: सर्वात आधी पालकाची पाने स्वच्छ धुऊन घ्या. नंतर ती गरम पाण्यात एक ते दोन मिनिटे उकळा आणि लगेच थंड पाण्यात ठेवा. पाने थंड झाली की बाहेर काढा. त्यानंतर पालक, १ ते २ हिरव्या मिरच्या आणि आलं मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या आणि त्याची पेस्ट करा.
आता एका मोठ्या भांड्यात गव्हाचे पीठ घ्या. त्यात पालकाची पेस्ट, किसलेले पनीर, जिरे, ओवा, हळद, लाल तिखट आणि मीठ घाला. गरजेनुसार थोडं पाणी घालून पीठ मऊसर मळा. हे पीठ झाकून १० ते १५ मिनिटे बाजूला ठेवा.
नंतर तयार पिठाचे समान आकाराचे गोळे करा. प्रत्येक गोळ्याला कोरडं पीठ लावून पोळीप्रमाणे गोल लाटा. तवा गरम झाला की त्यावर पराठा ठेवा आणि दोन्ही बाजूंनी चांगला भाजा. थोडं तूप किंवा तेल लावून सोनेरी आणि खरपूस होईपर्यंत भाजा. गरमागरम पराठे दही, पुदिन्याची चटणी किंवा लोणच्यासोबत वाढा.
पराठे आणखी चविष्ट होण्यासाठी काही टिप्स आहेत. पालकची पेस्ट करताना पाणी घालू नका आणि ती जास्त पातळ करू नका, नाहीतर पीठ चिकट होऊ शकतं. पराठे भाजताना मध्यम आच ठेवा, म्हणजे ते आतूनही नीट शिजतील. कमी तेलात भाजल्यास तेलाचं प्रमाणही नियंत्रणात ठेवता येतं. अशा प्रकारे हेल्दी आणि टेस्टी पालक पराठे घरच्या घरी सोप्या पद्धतीने बनवता येतात.