सोमवार, 26 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
AQI 319 | Very Poor 09:26 IST

SBI च्या 3,897 ग्राहकांची माहिती डार्क वेबवर उघड, बँकेने नेमली स्वतंत्र सायबर सुरक्षा संस्था

स्टेट बँक ऑफ इंडियावर सायबर हल्ला झाल्याचा दावा करण्यात आला आहे. 3,897 ग्राहकांच्या नोंदी डार्क वेबवर उघड झाल्याचे बँकेने स्पष्ट केले आहे.

SBI च्या 3,897 ग्राहकांची माहिती डार्क वेबवर उघड, बँकेने नेमली स्वतंत्र सायबर सुरक्षा संस्था छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत

देशातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियावर (SBI) सायबर हल्ला झाल्याचा दावा करण्यात आला आहे. या हल्ल्यात 3,897 ग्राहकांच्या नोंदी डार्क वेबवर उघड झाल्याचे SBI ने स्पष्ट केले आहे. प्राथमिक तपासात या डेटामध्ये ग्राहकांची वैयक्तिक माहिती आणि कर्जाशी संबंधित तपशील असल्याचे समोर आले आहे.

बँकेने या प्रकरणाच्या चौकशीसाठी स्वतंत्र सायबर सुरक्षा संस्था नेमली आहे. या घटनेचा बँकेच्या मुख्य व्यवसायावर, आर्थिक कामकाजावर किंवा बँकिंग सेवा सुरू ठेवण्याच्या क्षमतेवर मोठा परिणाम होण्याची अपेक्षा नाही, असे बँकेने म्हटले आहे. मात्र, लीक झालेल्या माहितीचा वापर करून ग्राहकांना सायबर फसवणुकीचे लक्ष्य केले जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

प्राथमिक विश्लेषणानुसार, डार्क वेबवर उघड झालेल्या डेटामध्ये ग्राहकांची नावे, मोबाइल क्रमांक, जन्मतारखा, ई-मेल आयडी आणि राहत्या घरचे पत्ते यांचा समावेश असल्याचे सांगण्यात आले आहे. त्याशिवाय ग्राहकांची ओळख पटवणारे काही क्रमांक, कर्जाच्या नोंदी आणि अर्जाशी संबंधित तपशीलही समोर आल्याचा दावा आहे.

सायबर सुरक्षा घडामोडींवर लक्ष ठेवणाऱ्या 'CyberPulse' या ट्विटर अकाउंटनुसार, या हल्ल्याचा संबंध 'Siriusim' नावाच्या समूहाशी असल्याचा दावा करण्यात आला आहे. हा प्रकार 16 ऑक्टोबर रोजी प्रथम समोर आल्याचेही या अकाउंटने म्हटले आहे. या डेटामध्ये 3.75 लाख CSV रकाने आणि 2,722 PDF दस्तऐवज असल्याचा दावा करण्यात आला आहे. पण या आकड्यांचा नेमका अर्थ काय आणि त्यांचा 3,897 ग्राहकांच्या नोंदींशी संबंध कसा, हे स्वतंत्रपणे स्पष्ट होणे आवश्यक आहे.

लीक झालेल्या वैयक्तिक माहितीच्या आधारे सायबर गुन्हेगार SBI चे अधिकारी असल्याचे भासवून ग्राहकांना फोन करू शकतात. KYC अपडेट, कर्ज मंजुरी, खात्यातील अडचण किंवा व्यवहाराची पडताळणी अशी कारणे सांगून OTP, पासवर्ड किंवा इतर गोपनीय माहिती मिळवण्याचा प्रयत्न होऊ शकतो. तसेच या तपशीलांचा वापर करून बनावट SMS, ई-मेल किंवा लिंक पाठवूनही ग्राहकांना फसवण्याचा प्रयत्न होऊ शकतो. मुंबईतील सायबर, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि डेटा संरक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ वकील प्रशांत माळी यांनी ग्राहकांना विशेष सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे.

ग्राहकांनी अनोळखी लिंकवर क्लिक करू नये. कोणालाही OTP, ATM PIN, पासवर्ड किंवा CVV देऊ नये. कर्ज, KYC किंवा बँक खात्याशी संबंधित संशयास्पद फोन आला, तर फोन करणाऱ्यावर विश्वास न ठेवता SBI च्या अधिकृत माध्यमातून माहितीची खात्री करावी. अनोळखी ई-मेलमधील अटॅचमेंट उघडणेही टाळावे.

खात्यात संशयास्पद व्यवहार दिसले किंवा फसवणुकीचा प्रयत्न झाला, तर SBI च्या अधिकृत ग्राहकसेवा माध्यमांशी तातडीने संपर्क साधावा. आर्थिक सायबर फसवणूक झाल्यास 1930 या राष्ट्रीय हेल्पलाइनवर तक्रार नोंदवता येते. डेटा लीक झाल्याचा दावा समोर आला असला, तरी प्रत्येक संबंधित ग्राहकाच्या खात्यातून पैसे चोरीला गेले आहेत, असा त्याचा अर्थ होत नाही. तरीही वैयक्तिक माहितीचा गैरवापर होऊ नये यासाठी SBI ग्राहकांनी सतर्क राहणे आवश्यक आहे.

अजून अपडेट नाहीत

ही बातमी प्रकाशित झाली आहे पण थेट मालिका सुरू झालेली नाही. डेस्कने अपडेट दाखल करताच तो इथे दिसेल.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ