हिवाळ्यात गीझर पहिल्यांदा लावताय? या चुका टाळा, नाहीतर मोठा धोका
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
महाराष्ट्रात थंडी जाणवू लागल्याने बाथरूममधले गीझर पुन्हा सुरू होत आहेत. घाईत केलेल्या काही चुकांमुळे स्फोट, शॉक किंवा गुदमरण्याचा धोका असतो.
महाराष्ट्रात आता थंडी जाणवू लागली आहे, त्यामुळे बाथरूममधला गीझर पुन्हा एकदा सुरू करण्याची वेळ आली आहे. थंडीत बाथरूममध्ये गेल्यागेल्या लोक घाईघाईत गीझर लावतात. पण अति घाई संकटात नेई, हे सगळ्यांनाच माहिती आहे. दरवर्षी हिवाळ्यात गीझरचा स्फोट होणे, शॉर्ट सर्किट होणे किंवा गॅस गीझरमुळे गुदमरणे अशा घटना घडतात.
उन्हाळ्यात सहसा गीझर वापरला जात नाही. तो अनेक महिने बंद राहतो आणि त्यात कचरा व धूळ साचते. अनेक जण याकडे दुर्लक्ष करतात आणि त्यामुळे काही दुर्घटना घडू शकतात. म्हणूनच स्वतःची आणि कुटुंबाची सुरक्षा राखण्यासाठी काही गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहे.
पहिली गोष्ट म्हणजे अंघोळ करताना गीझर चालू ठेवू नये. अनेकांची सवय असते की ते बाथरूममध्ये जाण्यापूर्वीच गीझर लावतात आणि अंघोळ करतानाही स्विच चालूच ठेवतात. ही सवय अतिशय धोकादायक ठरू शकते. गीझरच्या हीटिंग एलिमेंटमध्ये काही बिघाड झाला किंवा आतल्या वायरिंगमध्ये लीकेज झाले, तर पाण्यातून थेट करंट लागण्याची भीती असते. म्हणून पाणी गरम झाल्यानंतर अंघोळीला जाण्यापूर्वी गीझरचा मुख्य स्विच पूर्णपणे बंद करा.
काही घरांमध्ये सकाळपासून दुपारपर्यंत गीझर सतत चालू असतो, म्हणजे घरातल्या प्रत्येकाला आपापल्या सोयीने अंघोळ करता यावी. पण असे सतत चालू राहिल्याने गीझरचा थर्मोस्टेट खराब होऊ शकतो. आत गरजेपेक्षा जास्त प्रेशर निर्माण झाले तर टँकचा स्फोट होऊ शकतो. त्यामुळे गरज असेल तेव्हाच 15 ते 20 मिनिटे गीझर चालू ठेवा आणि लगेच बंद करा.
दुसरी गोष्ट गॅस गीझरची. वीजबिलाची बचत करण्यासाठी हल्ली अनेक घरांमध्ये एलपीजीवर चालणारा गॅस गीझर वापरला जातो. तो वापरताना सावध राहणे अतिशय गरजेचे आहे. गॅस गीझर सुरू केल्यावर तो आपली ज्योत टिकवण्यासाठी बाथरूममधला ऑक्सिजन वेगाने खेचून घेतो आणि त्याच वेळी कार्बन मोनोऑक्साइडसारखा विषारी वायू बाहेर सोडला जातो.
या वायूला कोणताही वास नसतो आणि तो डोळ्यांनाही दिसत नाही. तुमचे बाथरूम छोटे असेल आणि हवा बाहेर जाण्यासाठी खिडकी किंवा एक्झॉस्ट फॅन नसेल, तर अंघोळ करताना काही मिनिटांतच माणूस गुदमरू शकतो आणि कधीकधी बेशुद्धही पडू शकतो. त्यामुळे गॅस गीझर वापरायचा असेल तर बाथरूममध्ये खिडकी किंवा एक्झॉस्ट फॅन असणे गरजेचे आहे, किंवा बाथरूममध्ये फक्त पाण्याची पाइपलाइन घ्या. बाथरूम छोटे असेल तर गॅस गीझरचे मुख्य युनिट बाथरूमच्या बाहेर एखाद्या मोकळ्या जागेत बसवण्याचा प्रयत्न करा.
तिसरी गोष्ट म्हणजे हिवाळ्यात पहिल्यांदाच गीझर चालू करण्यापूर्वी एखाद्या टेक्निशियनला बोलावून त्याची सर्विसिंग करून घेणे योग्य ठरू शकते. त्या वेळी गीझरचा प्रेशर रिलीज व्हॉल्व्ह आणि ऑटो-कट फीचर तपासून घ्या. पाणी ठरावीक तापमानावर गरम झाल्यावर हे फीचर गीझर आपोआप बंद करते.
शेवटी, गीझरसाठी हलका किंवा नॉर्मल स्विच वापरू नका. जास्त लोड पेलणारा पॉवर प्लग आणि एमसीबी वापरा.
कमेंट
अजून कमेंट नाही. पहिली तुम्ही लिहा.