राजुरात रेल्वे साईटिंगवरील दोन ट्रकचे १७ टायर गायब; दोन चालकांवर गुन्हा दाखल
लॉयड्स मेटलच्या रेल्वे साईटिंग परिसरातून सुमारे अडीच लाख रुपयांचे टायर आणि डिस्क चोरीला गेले असून, दोन्ही चालकांचे मोबाईल बंद असल्याने कंपनीने त्यांच्यावर संशय व्यक्त केला आहे.
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा येथे लॉयड्स मेटलच्या रेल्वे साईटिंग परिसरात उभ्या असलेल्या दोन ट्रकचे मिळून १७ टायर डिस्कसह चोरीला गेले. या साहित्याची किंमत सुमारे अडीच लाख रुपये असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. दोन्ही ट्रकचे चालक जागेवर नव्हते आणि त्यांचे मोबाईल बंद लागत असल्याने कंपनीने त्यांच्यावर संशय व्यक्त केला आहे. राजुरा पोलिसांनी पुष्पेंद्र कुसवाहा आणि दिपक कुसवाहा यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
तक्रारदार राकेशकुमार देवीलाल रांगडाले (वय ४७) हे छत्तीसगडमधील रायपूर येथील रींग रोड नं. २, श्रेया कॉम्प्लेक्सजवळ राहतात. गेल्या १२ वर्षांपासून ते 'SVA ट्रान्सपोर्टिंग' कंपनीत सुपरवायझर म्हणून काम करतात. कंपनीकडे एकूण १९ गाड्या असून त्यांपैकी १० गाड्या चंद्रपूर-रायपूर मार्गावर चालतात.
८ ऑक्टोबर २०२६ रोजी कंपनीच्या दोन गाड्या (क्रमांक CG 22 AK 7982 आणि CG 22 AK 9200) कोळसा भरून रायपूरहून निघाल्या. राजुरा तालुक्यातील पांढरपौनी येथील भाटीया कोल वासरी येथे कोळसा खाली केल्यानंतर त्या लॉयड्स मेटलच्या राजुरा रेल्वे साईटिंगवर माल भरण्यासाठी रवाना झाल्या. या दोन्ही ट्रकवर अनुक्रमे पुष्पेंद्र कुसवाहा (वय २४, रा. सीधी, मध्य प्रदेश) आणि दिपक कुसवाहा हे चालक म्हणून काम करत होते.
९ ऑक्टोबर रोजी रात्री ११ वाजल्यापासून दोन्ही चालकांचे मोबाईल फोन बंद लागू लागले. त्याच सुमारास लॉयड्स मेटल रेल्वे साईटिंगचे सुरक्षा सुपरवायझर इम्रान पठान यांनी राकेशकुमार यांच्याशी संपर्क साधून, तुमच्या गाड्या माल भरण्यासाठी अजून हजर झालेल्या नाहीत, अशी माहिती दिली. राकेशकुमार यांनी जीपीएसवर दोन्ही गाड्यांचा मागोवा घेतला असता, त्या लॉयड्स मेटलच्या कार्यालयाच्या साईटवर उभ्या असल्याचे दिसून आले.
त्यानंतर कंपनीच्या सांगण्यावरून सुरक्षारक्षकाने घटनास्थळी जाऊन पाहणी केली. तेव्हा दोन्ही ट्रकचे चालक जागेवर नव्हते आणि दोन्ही गाड्यांचे डिस्कसह एकूण १७ टायर गायब असल्याचे उघडकीस आले.
ही माहिती मिळताच राकेशकुमार रांगडाले यांनी कंपनीचे मालक विनीतकुमार जैन यांच्याशी चर्चा केली आणि १० ऑक्टोबर २०२६ रोजी थेट राजुरा रेल्वे साईटिंग गाठली. प्रत्यक्ष पाहणीत ट्रक क्रमांक CG 22 AK 9200 चे डिस्कसह ८ टायर आणि ट्रक क्रमांक CG 22 AK 7982 चे डिस्कसह ९ टायर, असे एकूण २ लाख ५० हजार रुपये किमतीचे १७ टायर व डिस्क चोरीला गेल्याचे स्पष्ट झाले. दोन्ही चालकांचे मोबाईल नंबर अजूनही बंदच लागत असल्याने, त्यांनीच संगनमत करून हा माल चोरल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.
या प्रकरणी राकेशकुमार रांगडाले यांनी मालक विनीतकुमार जैन यांच्यासह राजुरा पोलीस स्टेशनमध्ये येऊन तोंडी फिर्याद दिली. त्या तक्रारीवरून राजुरा पोलिसांनी ट्रक चालक पुष्पेंद्र कुसवाहा आणि दिपक कुसवाहा यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या (BNS) २०२३ मधील कलम ३०३(२) आणि ३(५) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक लक्ष्मण सुभाष लोकरे करत आहेत.