शनिवार, 10 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
14:20 IST

चंद्रपूर जिल्ह्यातील ५० ग्रामपंचायतींमध्ये केशर आंब्याची लागवड; भेंडवीत जिल्हाधिकारी वसुमना पंत यांच्या हस्ते

चंद्रपूर जिल्ह्यातील ५० ग्रामपंचायतींमध्ये केशर आंब्याची लागवड; भेंडवीत जिल्हाधिकारी वसुमना पंत यांच्या हस्ते छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत

चंद्रपूर जिल्ह्यातील ५० ग्रामपंचायतींमध्ये केशर आंब्याची लागवड करण्याच्या उपक्रमाला एकाच वेळी सुरुवात झाली आहे. जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी राजुरा तालुक्यातील भेंडवी येथे आंब्याचे कलम लावून या उपक्रमाचा जिल्हास्तरीय शुभारंभ केला. जिल्ह्यातील ५० ग्रामपंचायतींमध्ये हा उपक्रम सुरू झाला असून, त्याचा मुख्य शुभारंभ भेंडवी या गावात झाला.

ग्रामपंचायती आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हाव्यात आणि हरित आच्छादन वाढावे, हा या उपक्रमाचा उद्देश आहे. त्यासाठी व्हीबीजी-राम-जी योजना आणि जिल्हा खनिकर्म प्रतिष्ठान निधी या दोन्हींचा अभिसरणातून वापर केला जात आहे.

जिल्हाधिकारी वसुमना पंत आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यातील ५० ग्रामपंचायतींमध्ये हा उपक्रम राबवला जात आहे. सर्व विभागप्रमुखांनी वेगवेगळ्या ठिकाणी प्रत्यक्ष उपस्थित राहून केशर आंब्याची लागवड केली.

या मोहिमेसाठी दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठातून ३५ हजार उच्च दर्जाची केशर आंब्याची कलमे खास मागवण्यात आली आहेत. आंब्याची लागवड शास्त्रीय पद्धतीने व्हावी, यासाठी कोकण कृषी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ डॉ. अमोल दडमल स्वतः चंद्रपुरात आले होते. त्यांनी ग्रामपंचायतींच्या प्रतिनिधींना आणि कर्मचाऱ्यांना आंबा लागवडीचे तंत्रज्ञान, खत व्यवस्थापन आणि संगोपन याबाबत सविस्तर प्रशिक्षण दिले.

केवळ वृक्षारोपणावर न थांबता त्याला जलसंधारणाची जोड देण्यात आली. राजुरा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी भागवत रजेवाड यांनी केलेल्या आवाहनावरून पंचायत समितीच्या सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्तपणे श्रमदान केले. दुष्काळ निवारणाच्या उपाययोजनेचा भाग म्हणून या श्रमदानातून कार्यक्रमस्थळी वनराई बंधारा उभारण्यात आला. त्यामुळे भूजल पातळी वाढेल आणि लावलेल्या कलमांनाही त्याचा लाभ होणार आहे.

यावेळी व्हीबीजी-राम-जी प्रकल्पाचे उपजिल्हा समन्वयक गिरीश धायगुडे, राजुऱ्याचे तहसीलदार ओमप्रकाश गोंड, गटविकास अधिकारी भागवत रजेवाड, कोकण कृषी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ डॉ. अमोल दडमल, कृषी अधिकारी महेश वट्टी आणि सहायक प्रकल्प अधिकारी हेमंत येरमे उपस्थित होते. त्यांच्यासह भेंडवीचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत अधिकारी तसेच पंचायत समितीचे सर्व अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने हजर होते.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ