'खग्रास' मराठी चित्रपटाचे मोशन पोस्टर आले, ५ फेब्रुवारी २०२७ ला येणार चित्रपटगृहांत
सिद्धार्थ मेनन, सुबोध भावे यांच्यासह मोठी कलाकार फळी असलेल्या 'खग्रास' या रहस्यप्रधान मराठी चित्रपटाचे मोशन पोस्टर प्रदर्शित झाले आहे.
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
'खग्रास' या आगामी मराठी चित्रपटाचे मोशन पोस्टर आता प्रदर्शित झाले आहे. आकाशात चंद्र सूर्याला झाकोळतो आहे, असे दृश्य आणि त्यातून जाणवणारी अस्वस्थता या पोस्टरमध्ये दिसते. सोबत 'जेव्हा चंद्र सूर्याला झाकतो, तेव्हा सावली रक्ताने भरते' ही ओळ दिली आहे, आणि ती वाचून गूढपणा आणखीच वाढतो.
चित्रपटाच्या नावापासूनच उत्सुकता निर्माण झाली होती. आता पोस्टर समोर आल्यावर रहस्य आणि उत्कंठा यांनी भरलेल्या या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये आतापासूनच चर्चा सुरू झाली आहे. हा चित्रपट ५ फेब्रुवारी २०२७ रोजी चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार आहे.
या चित्रपटात मराठी मनोरंजनविश्वातील अनेक नामांकित कलाकार एकत्र आले आहेत. सिद्धार्थ मेनन, संस्कृती बालगुडे, क्षितीश दाते, स्वानंदी टिकेकर, राहुल पेठे, सायली पाठक, अनन्या जावळे आणि सुबोध भावे हे सगळे यात दिसणार आहेत. प्रत्येकाची ओळख वेगळी आणि अभिनयाची शैलीही वेगळी असल्याने त्यांच्या व्यक्तिरेखा कशा असतील आणि त्यांचे एकमेकांशी काय नाते असेल, हे जाणून घ्यायची उत्सुकता वाढली आहे.
आकाश पेंढारकर आणि पराग मेहता यांनी हा चित्रपट सादर केला आहे. त्याचे लेखन आणि दिग्दर्शन देवेश व्ही. कामत यांनी केले आहे. राकेश जावळे, किरण जावळे, कीर्ती जावळे आणि आशुतोष शर्मा हे या चित्रपटाचे निर्माते आहेत. स्वप्नेश सावंत, फ्लाइंग बुलेट पिक्चर्स आणि शोटॅड मोशन पिक्चर्स हे सहनिर्माते आहेत.
दिग्दर्शक देवेश व्ही. कामत म्हणाले, "रहस्यपटाची खरी ताकद ही प्रेक्षकांना प्रत्येक टप्प्यावर विचार करायला लावण्यात असते. 'खग्रास'मध्ये कथा, व्यक्तिरेखा आणि त्यांच्याभोवती निर्माण होणारे गूढ यांचा असा मेळ साधण्याचा प्रयत्न केला आहे की, प्रेक्षकांना प्रत्येक क्षणी पुढे काय घडणार, याची उत्सुकता वाटत राहील. या कथेसाठी इतके उत्तम कलाकार एकत्र येणे ही आमच्यासाठी मोठी गोष्ट आहे. पोस्टरमधून निर्माण झालेली उत्सुकता चित्रपट पाहताना नक्कीच अधिक वाढेल, अशी आशा आहे."
निर्माते राकेश जावळे यांनीही आपले मत मांडले. ते म्हणाले, "'खग्रास'सारखी गूढ आणि वेगळ्या धाटणीची कथा प्रेक्षकांसमोर आणताना आम्हाला विशेष आनंद होत आहे. या चित्रपटासाठी एकत्र आलेली कलाकारांची फळी ही त्याची मोठी ताकद आहे. प्रत्येक कलाकाराने आपल्या भूमिकेतून कथेला वेगळे परिमाण दिले आहे. लवकरच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहोत."
रहस्याची चाहूल देणाऱ्या या टायटल पोस्टरनंतर 'खग्रास'च्या कथेत नेमके काय दडले आहे, हे पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर झाले आहेत.
कमेंट
अजून कमेंट नाही. पहिली तुम्ही लिहा.