सोमवार, 26 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
AQI 319 | Very Poor 09:22 IST

वडिलांच्या स्वाभिमानासाठी न्यायालयात उभी लेक; सायली संजीवच्या 'जनक'चा टीझर आला

सायली संजीव आणि अविनाश नारकर यांची प्रमुख भूमिका असलेला 'जनक' हा कोर्टरूम थ्रिलर १३ नोव्हेंबर २०२६ पासून संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

वडिलांच्या स्वाभिमानासाठी न्यायालयात उभी लेक; सायली संजीवच्या 'जनक'चा टीझर आला छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत

मराठी मनोरंजनसृष्टीत सध्या वेगवेगळ्या विषयांवरचे चित्रपट लवकरच प्रेक्षकांसमोर येणार आहेत. त्यापैकीच एक म्हणजे 'जनक'. अभिनेत्री सायली संजीव आणि अविनाश नारकर यांची प्रमुख भूमिका असलेल्या या आगामी मराठी चित्रपटाचा टीझर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या टीझरला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून चित्रपटाबद्दलची उत्सुकताही वाढली आहे.

ज्या बापाने मुलीवर आयुष्यभर आभाळाएवढं प्रेम केलं, त्याच बापाच्या सन्मानावर जेव्हा प्रश्नचिन्ह उभं राहतं, तेव्हा त्याच्यासाठी न्यायालयात लढणारी लेक, अशी या चित्रपटाची मांडणी आहे. नात्यांची भावनिक गुंफण, स्वाभिमानाची लढाई आणि न्यायालयातील उत्कंठावर्धक संघर्ष यांची झलक टीझरमध्ये दिसते.

अभिषेक कंवर यांनी दिग्दर्शित केलेला आणि आर टी बी फिल्म्स प्रस्तुत करत असलेला 'जनक' हा सत्यघटनेवर आधारित कोर्टरूम थ्रिलर आहे. बाप-लेकीच्या नात्याची ताकद अधोरेखित करतानाच, आरोपांच्या सावटाखाली सापडलेल्या वडिलांचा सन्मान वाचवण्यासाठी मुलगी कशी उभी राहते, हे टीझरमध्ये पाहायला मिळते. एका बाजूला आरोपांचं वादळ आणि दुसऱ्या बाजूला सत्यासाठी व वडिलांच्या स्वाभिमानासाठी सर्वस्व पणाला लावणारी मुलगी, अशा संघर्षातून कथा उलगडत जाणार आहे.

या चित्रपटात सायली संजीव एका गर्भवती महिलेच्या भूमिकेत दिसत आहे. तिच्या व्यक्तिरेखेचा वेगळा पैलू टीझरमधून समोर आला आहे. वडिलांच्या सन्मानासाठी लढणाऱ्या मुलीची भावनिक घालमेल आणि तिची जिद्द लक्ष वेधून घेते. वैयक्तिक आयुष्यातील महत्त्वाच्या टप्प्यासोबतच वडिलांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी पेलणाऱ्या या व्यक्तिरेखेमुळे कथेला वेगळी भावनिक खोली मिळण्याची अपेक्षा आहे.

अविनाश नारकर यांची भूमिका आणि अभिनयही टीझरमधील लक्षवेधी बाब ठरते. सायली संजीव आणि सुरेश विश्वकर्मा यांच्यात रंगणारा कोर्टरूम ड्रामा चित्रपटातील न्यायालयीन संघर्षाला महत्त्वाचं वळण देणार असल्याची झलकही दिसते. त्यामुळे न्यायालयात नेमकं काय घडणार आणि या संघर्षाचा शेवट कोणत्या दिशेने जाणार, याबद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे.

चित्रपटाच्या टीमबद्दल सांगायचं तर, दिग्दर्शनाची जबाबदारी अभिषेक कंवर यांनी सांभाळली आहे. कथा, पटकथा आणि संवाद ओंकार भसमे यांचे आहेत. त्रिलोक सिंग राजपूत यांनी असोसिएट प्रोड्युसर म्हणून, तर सुजीत मुकाटे यांनी कार्यकारी निर्माते म्हणून योगदान दिलं आहे. चित्रपटाला संगीत आदित्य कडताने यांनी दिलं आहे.

वडिलांवरील आरोप, त्यांच्या सन्मानासाठी लढणारी मुलगी आणि सत्याच्या शोधातला न्यायालयीन संघर्ष यामुळे टीझरने चित्रपटाबद्दलची उत्सुकता वाढवली आहे. न्यायाचा विजय होणार की आरोपांच्या सावटाखाली एका बापाचा स्वाभिमान हरवणार, याचं उत्तर चित्रपट पाहिल्यानंतरच मिळणार आहे. 'जनक' हा कोर्टरूम थ्रिलर १३ नोव्हेंबर २०२६ पासून संपूर्ण महाराष्ट्रात चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार आहे.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ