भरत जाधव यांचा 'सासरे बापरे' ५ फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला
प्रेम, नात्यांमधला गोंधळ आणि कुटुंबाची मजेशीर घुसमट सांगणारा 'सासरे बापरे' हा मराठी चित्रपट ५ फेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे.
'सासरे बापरे' हा आगामी मराठी चित्रपट ५ फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सोशल मीडियावर नुकतीच या चित्रपटाची घोषणा झाली. प्रेमकथा म्हटलं की सगळं सुरळीत आणि परफेक्ट असायला हवं, असं काही नाही. प्रेमासोबत येणारा गोंधळ, नात्यांमधले मतभेद, एकमेकांना समजून घेण्याची धडपड आणि त्यात कुटुंबाची होणारी मजेशीर घुसमट, अशा भन्नाट आणि हळुवार नात्यांची गोष्ट या चित्रपटात आहे.
'एक बाप... आणि एक बाप लव्हस्टोरी!' अशी कॅची ओळ घेऊन हा चित्रपट येत आहे. चित्रपटाचं शीर्षकच उत्सुकता वाढवणारं आहे. नावातला मिश्कीलपणा आणि त्यामागची कौटुंबिक गोष्ट यामुळे चित्रपटात नेमकं काय पाहायला मिळणार, याची उत्सुकता पहिल्याच घोषणेतून निर्माण झाली आहे. प्रेम आणि नात्यांच्या या गोष्टीत विनोदाची रंगत आहे. तरीही माणसांच्या भावविश्वाकडे आणि मानसिक आरोग्यासारख्या महत्त्वाच्या विषयाकडे संवेदनशील नजरेने पाहण्याचा प्रयत्न या चित्रपटातून झाला आहे.
भरत जाधव म्हणजे विनोदाचा अचूक टायमिंग. या सिनेमात मात्र विनोदासोबत त्यांच्या आतापर्यंत न पाहिलेल्या छटा अनुभवायला मिळणार आहेत. त्यांच्या अभिनयाचा हा नवा रंग प्रेक्षकांसाठी नक्कीच पर्वणी ठरेल. चित्रपटात भरत जाधव, सायली संजीव, सुव्रत जोशी, मिलिंद गवळी, विजय निकम, अश्विनी महांगडे, रेणूका दफ्तरदार, प्रफुल्ल सामंत, चंद्रशेखर सांडवे, संदीप गायकवाड आणि प्रियंका हांडे असे कलाकार आहेत. उपेंद्र लिमये एका वेगळ्या भूमिकेत दिसतील, आणि त्यांना पाहण्याची मजा कथेला आणखी रंगतदार करेल.
दिग्दर्शक विशाल विलास सुर्वे म्हणतात, प्रेमकथा म्हणजे एखादी परफेक्ट व्यक्ती शोधण्याची गोष्ट नाही. अपूर्ण, अनपेक्षित आणि तरीही खऱ्या व्यक्तीवर प्रेम करण्याचं धैर्य म्हणजे प्रेम. गोंधळाच्या परिस्थितीतही नात्यांमध्ये टिकून राहण्याची ताकद आणि माणसांमधली हळुवार बाजू मांडण्याचा प्रयत्न या चित्रपटातून केला आहे. मराठी चित्रपटांनी नेहमीच गजबजलेल्या घरातलं माणूसपण आणि त्यातला उबदारपणा सुंदरपणे मांडला आहे. त्याच उबदारपणातून मानसिक आरोग्यासारख्या विषयाकडे पाहण्याचा हा प्रयत्न आहे. हा चित्रपट प्रेक्षकांना हसवेल, भावूक करेल आणि कदाचित आपल्या जवळच्या माणसांकडे थोडं अधिक संयमाने पाहायला लावेल, असंही ते म्हणतात.
चित्रपटाची कथा, पटकथा आणि संवाद संकेत तांडेल यांचे आहेत. मुश्ताक खान प्रस्तुत या चित्रपटाचे निर्माते चेतन जगन्नाथ शिंदे, विशाल विलासिनी सुर्वे, सचिन शिंदे, प्रीत शिंदे, मुश्ताक खान, मोहसिन खान आणि सत्या अय्यर आहेत. सुनील जागेटिया, विनोद रामचंद्र गुरसळे आणि आकाश रवींद्रनाथ गुरसळे सहनिर्माते आहेत. एलएससीए क्रिएटिव्हज, सिंधिया एंटरटेनमेंट, सिनेमॅटिक किडा आणि सरवणा स्टुडिओज यांची ही निर्मिती आहे. विशाल विलास सुर्वे यांनी दिग्दर्शन केलं असून चेतन जगन्नाथ शिंदे यांनी छायाचित्रणाची बाजू सांभाळली आहे.
प्रेम, कुटुंब, नात्यांमधली गुंतागुंत आणि त्यातून निर्माण होणाऱ्या गंमतीजमतींचा हा अनोखा प्रवास ५ फेब्रुवारीला मोठ्या पडद्यावर उलगडणार आहे. 'सासरे बापरे'मध्ये नेमकी कोणाची लव्हस्टोरी आणि कोणाचा बापरे, असा अनुभव देणारा गोंधळ आहे, हे पाहण्यासाठी प्रेक्षकांना ५ फेब्रुवारीची वाट पाहावी लागणार आहे.
कमेंट
अजून कमेंट नाही. पहिली तुम्ही लिहा.