क्रांती रेडकरचा पहिला रॅप: 'मैत्रेया' चित्रपटाचे टायटल साँग प्रदर्शित
मैत्री, मस्ती आणि प्रेमाचे रंग असलेले 'मैत्रेया'चे टायटल साँग प्रेक्षकांसमोर आले आहे. यात क्रांती रेडकर यांनी पहिल्यांदाच रॅप लिहिला आणि गायला आहे.
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
'मैत्रेया' या आगामी मराठी चित्रपटाचे टायटल साँग नुकतेच प्रेक्षकांसमोर आले आहे. मराठी अभिनेत्री क्रांती रेडकर यांचा हा चित्रपट मैत्रीच्या वेगळ्या दुनियेची सफर घडवणार आहे. मस्ती, मैत्री आणि प्रेम अशा अनेक रंगांनी नटलेल्या या गाण्याला सिद्धांत भोसले आणि क्रांती रेडकर यांचा आवाज लाभला आहे.
या गाण्याचे खास वैशिष्ट्य म्हणजे क्रांती रेडकर यांनी पहिल्यांदाच रॅप लिहिला आहे आणि तो गायलाही आहे. गाण्याचे बोल ओंकार मंगेश दत्त यांचे आहेत, तर संगीत पंकज पडघण यांनी दिले आहे. शब्द, संगीत आणि आवाज यांचा सुरेख मेळ या गाण्यात साधला गेला आहे.
मित्रमैत्रिणींसोबतच्या बेधुंद क्षणांपासून प्रेमाच्या हळुवार भावनांपर्यंतचा प्रवास गाण्यातून अनुभवायला मिळतो. मैत्रीतला मोकळेपणा, एकत्र असण्याचा आनंद आणि नात्यांतून फुलणारा जिव्हाळा गाण्यात दिसतो. मित्रांसोबतची मजा, एकमेकांची चेष्टामस्करी आणि प्रत्येक प्रसंगात एकमेकांच्या पाठीशी उभे राहण्याची भावना यातून व्यक्त होते. मैत्रीत नकळत फुलणारे प्रेम आणि एकत्र घालवलेल्या क्षणांच्या आठवणी गाण्याला वेगळीच रंगत आणतात.
संगीतकार पंकज पडघण यांनी गाण्याच्या निर्मितीविषयी सांगितले, "मैत्रीच्या नात्यात एक वेगळीच ऊर्जा आणि सहजता असते. मित्रांसोबतची धमाल, मस्ती, एकमेकांची चेष्टा आणि या सगळ्यातून निर्माण होणारा जिव्हाळा हे अनुभव प्रत्येकाच्या आयुष्याचा भाग असतात. 'मैत्रेया'च्या टायटल साँगमधून मैत्रीचा हाच उत्साह आणि तरुणाईचा आनंद संगीताच्या माध्यमातून व्यक्त करण्याचा प्रयत्न केला आहे. गाण्याचे शब्द आणि त्यातील भावना यांना साजेसे संगीत देताना त्यातला खेळकरपणा आणि भावनिक ओलावा जपण्यावर भर दिला. हे गाणे ऐकताना प्रेक्षकांना आपल्या मित्रांसोबतच्या आठवणी पुन्हा अनुभवता येतील, अशी आशा आहे."
लेखिका-दिग्दर्शिका क्रांती रेडकर वानखेडे म्हणाल्या, "मैत्री आणि प्रेम ही आयुष्यातील अशी नाती आहेत, जी आपल्या जगण्यात आनंदाचे अनेक रंग भरतात. मित्रांसोबत केलेली धमाल, एकमेकांना चिडवणे, एकत्र घालवलेले क्षण आणि नकळत निर्माण होणारी भावनिक जवळीक या सगळ्याच गोष्टी खास असतात. 'मैत्रेया'च्या टायटल साँगमधून मैत्रीची ही अनोखी दुनिया आणि त्यातील निरागस आनंद प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे."
चित्रपटाचे निर्माते मनोज खळतकर यांनीही गाण्यातून मैत्रीच्या आठवणींना उजाळा देण्याचा प्रयत्न केल्याचे सांगितले. ते म्हणतात, "मित्रांसोबतच्या आठवणी या प्रत्येकाच्या आयुष्यातील अनमोल ठेवा असतात. कधी हसवणारे, कधी भावूक करणारे, तर कधी आयुष्यभर चेहऱ्यावर हसू आणणारे हे क्षण आपल्या नात्यांना अधिक घट्ट करतात. 'मैत्रेया'च्या टायटल साँगमधून मैत्री, प्रेम आणि तरुणाईच्या उत्साही जगण्याचे प्रतिबिंब दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. हे गाणे पाहताना प्रेक्षकांना आपल्या मित्रांची आणि त्यांच्यासोबतच्या अविस्मरणीय क्षणांची नक्कीच आठवण होईल."
समर टाईम्स प्रॉडक्शन निर्मित 'मैत्रेया' या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन क्रांती रेडकर वानखेडे यांनी केले आहे. मनोज खळतकर चित्रपटाचे निर्माते असून अमन खळतकर सहनिर्माते आहेत. चित्रपटात समर, आयुषी, स्काय आणि रुची यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट २० नोव्हेंबरला चित्रपटगृहांत येणार आहे.
कमेंट
अजून कमेंट नाही. पहिली तुम्ही लिहा.