फ्रान्समध्ये शिक्षणावरून आंदोलन पेटले, जमाव एलिसी पॅलेसपासून ३०० मीटरवर पोहोचला
रविवारी १८ ऑक्टोबरला हजारो आंदोलक एलिसी पॅलेसजवळ पोहोचले; सुरक्षा दलांनी अश्रुधुराचा वापर केला.
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
फ्रान्समध्ये सध्या अशांततेचे वातावरण आहे. राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यासमोर मोठे राजकीय संकट उभे राहिले आहे. शिक्षणविषयक सुधारणांच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरलेले हजारो संतप्त आंदोलक रविवारी (१८ ऑक्टोबर) राष्ट्रपतींचे अधिकृत निवासस्थान असलेल्या एलिसी पॅलेसजवळ येऊन पोहोचले. ते पॅलेसपासून अवघ्या ३०० मीटर अंतरावर होते, त्यामुळे फ्रान्सच्या सुरक्षा यंत्रणांची दाणादाण उडाली.
परिस्थिती इतकी गंभीर झाली होती की आंदोलकांची संख्या पोलीसांच्या नियंत्रणाबाहेर गेली होती. फ्रान्सच्या गृहमंत्र्यांनी स्वतः मान्य केले की एवढ्या मोठ्या जमावासमोर पोलीस हतबल झाले होते आणि कायदा व सुव्यवस्थेवरचे नियंत्रण पूर्णपणे सुटले होते. या घटनेमुळे फ्रान्सच्या राजकारणात खळबळ उडाली असून मॅक्रॉन यांचे सरकार आणि त्यांची सत्ता धोक्यात आल्याची चर्चा सुरू होती.
ले माँद (Le Monde) या वृत्तपत्राच्या वृत्तानुसार, डाव्या विचारसरणीचे विद्यार्थी आणि नागरिक यांच्या मोर्च्याने सुरक्षेसाठी लावलेले सर्व अडथळे (बॅरिकेड्स) तोडले आणि ते एलिसी पॅलेसमध्ये घुसण्याच्या तयारीत होते. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे दिसल्यावर सुरक्षा दलांना अश्रुधुराचा वापर करावा लागला.
अश्रुधुराच्या नळकांड्या सोडल्यानंतर जमाव पांगू लागला. त्याच संधीचा फायदा घेत उजव्या विचारसरणीच्या विशेष दंगल नियंत्रण पथकाला (RIOT Police) तातडीने घटनास्थळी तैनात करण्यात आले. राष्ट्रपतींच्या निवासस्थानाभोवतीची सुरक्षा अनेक पटींनी कडक केली गेली आणि त्यामुळे मोठा अनर्थ थोडक्यात टळला. या गोंधळानंतर गृहमंत्र्यांनी राजीनामा देण्याची तयारी दाखवली होती, पण मॅक्रॉन यांनी तो फेटाळला आणि देशात कठोर पोलीस सुधारणांची गरज असल्याचे स्पष्ट केले.
आंदोलन फक्त शांततापूर्ण मोर्च्यापुरते राहिले नाही, तर काही ठिकाणी त्याला हिंसक वळण लागले. फ्रान्स २४ (France 24) च्या अहवालानुसार, आंदोलकांनी देशाच्या वेगवेगळ्या भागांत १,५०० हून अधिक दुकानांवर हल्ले केले आणि मोठ्या प्रमाणावर लुटालूट केली. सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. त्यात आंदोलक मोठ्या मॉल्स आणि दुकानांच्या काचा फोडून सामान लुटताना दिसत आहेत.
या हिंसाचारानंतर मॅक्रॉन यांनी कडक संदेश देणारा व्हिडिओ जारी केला. त्यात त्यांनी आंदोलकांचा निषेध करत त्यांना 'लुटारू' (Plunderers) म्हटले. फ्रान्सच्या प्रजासत्ताकाला लुटण्याचा आणि देशात अराजकता माजवण्याचा प्रयत्न करणाऱ्या कोणालाही माफ केले जाणार नाही, असा इशारा त्यांनी स्पष्ट शब्दांत दिला. फ्रेंच पोलिसांच्या आकडेवारीनुसार आतापर्यंत जवळपास २,५०० हून अधिक आंदोलकांना अटक झाली असून सरकार नुकसानीचे मूल्यांकन करत आहे.
या संतापामागे फ्रान्समधील शिक्षण प्रणालीची खालावती स्थिती हे मुख्य कारण सांगितले जाते. डाव्या विचारसरणीच्या विद्यार्थी संघटना आणि राजकीय पक्षांनी उघडपणे सांगितले की फ्रान्सच्या शाळांमध्ये सध्या शिक्षकांची तीव्र कमतरता आहे आणि विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळण्यात अनंत अडचणी येत आहेत.
फ्रेंच सरकारच्या आकडेवारीनुसार देशात प्रत्येक २४ मुलांमागे एक शिक्षक असल्याचे सांगितले जाते, पण प्रत्यक्षात परिस्थिती वेगळी आहे, असे आंदोलक म्हणतात. जीर्ण झालेल्या शाळांच्या इमारती, विद्यार्थ्यांनी खचाखच भरलेले वर्ग आणि शिक्षणाच्या वाढत्या समस्या यामुळे विद्यार्थ्यांमध्ये तीव्र संताप उसळला आहे. त्याचाच स्फोट या आंदोलनातून दिसला, ज्याने थेट राष्ट्राध्यक्षांच्या खुर्चीला हादरे दिले आहेत.