इडलीत विष मिसळूनही नवरा वाचला, मग प्रियकराला बोलावून पत्नीने गळा आवळला; म्हैसूरमध्ये दोघांना अटक
म्हैसूर जिल्ह्यातील हुनसूर परिसरात अनैतिक संबंधांत अडथळा ठरणाऱ्या पतीचा पत्नीने प्रियकराच्या मदतीने खून केला. पोलिसांनी पवित्रा आणि सुनील यांना अटक केली आहे.
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
कर्नाटकातील म्हैसूर जिल्ह्यातल्या हुनसूर परिसरात एक अत्यंत धक्कादायक आणि सुन्न करणारी घटना उघडकीस आली आहे. अनैतिक संबंधांत पती अडथळा ठरत होता, म्हणून पत्नीने प्रियकराच्या मदतीने त्याचा खून केल्याचा प्रकार समोर आला आहे. कट रचून खून करणारी आरोपी महिला पवित्रा आणि तिचा प्रियकर सुनील या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पवित्राचे लग्न रामप्रसाद यांच्याशी झाले होते आणि या जोडप्याला दोन मुले आहेत. सुखाचा संसार सुरू असतानाच गावातल्या सुनील नावाच्या तरुणाशी पवित्राचे सूत जुळले. या संबंधांची माहिती रामप्रसाद यांना कळली आणि त्यानंतर नवरा-बायकोत रोज वाद होऊ लागले. रोजच्या भांडणांना कंटाळलेल्या पवित्राला प्रियकरासोबत राहायचे होते. त्या हव्यासापोटी तिने पतीचा काटा काढण्याचा भयंकर कट रचला.
पतीला संपवण्यासाठी पवित्राने सोशल मीडिया आणि युट्यूबची मदत घेतली. धोतऱ्याच्या विषारी बिया कशा वापरायच्या आणि त्याचा शरीरावर काय परिणाम होतो, याची माहिती तिने युट्यूबवरून गोळा केली. १६ ऑक्टोबरच्या रात्री रामप्रसाद दारू पिऊन घरी आले. तीच संधी साधून पवित्राने ठरवल्याप्रमाणे इडली बनवली, त्यात धोतऱ्याच्या बियांची पावडर मिसळली आणि ती नवऱ्याला खायला दिली.
पण तिला वाटले होते तसा विषाचा तात्काळ परिणाम झाला नाही. इडली खाऊनही रामप्रसाद जिवंत राहिले. विषाचा प्रयोग फसल्याने पवित्रा घाबरली आणि तिने तातडीने प्रियकर सुनीलला घरी बोलावून घेतले. त्यानंतर रात्रीच्या अंधारात दोघांनी मिळून रामप्रसाद यांच्यावर हल्ला केला आणि त्यांचा गळा आवळून जागीच जीव घेतला.
खून केल्यानंतर कुणालाही संशय येऊ नये म्हणून पवित्राने बनाव रचला. तिने रामप्रसाद यांच्या भावाला फोन करून, "दही खाल्ल्यापासून ते उठतच नाहीत," असे खोटे सांगितले. घाबरलेल्या कुटुंबीयांनी त्यांना रुग्णालयात नेले, तेव्हा डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. हृदयविकाराने किंवा आजारपणाने मृत्यू झाला असावा, असे मानून सुरुवातीला अंत्यसंस्कारही उरकण्यात आले.
मात्र पोलिसांना गुप्त माहिती मिळाली आणि काही संशयास्पद हालचालीही दिसल्या, त्यामुळे त्यांना शंका आली. त्यांनी या प्रकरणाचा कसून तपास सुरू केला. तपासादरम्यान संपूर्ण थरारक घटनाक्रम आणि कॉल डिटेल्स समोर आले. अखेर पोलिसांनी खाक्या दाखवताच पवित्रा आणि सुनील यांनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी दोघांनाही अटक केली आहे.
कमेंट
अजून कमेंट नाही. पहिली तुम्ही लिहा.