मणिपूरमध्ये ४ जणांचा मृत्यू; संतप्त नागरिकांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाबाहेर मृतदेह ठेवले
लाकूड गोळा करायला गेलेल्या नागरिकांच्या गटावर गोळीबार झाल्याचा आरोप असून, इंफाळमध्ये मुख्यमंत्री वाय. खेमचंद सिंह यांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलकांनी मृतदेह ठेवले.
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
मणिपूरमध्ये पुन्हा एकदा हिंसाचाराचा भडका उडाला असून तिथली परिस्थिती तणावपूर्ण बनली आहे. रविवारी रात्री आणि सोमवारी सकाळी घडलेल्या दोन स्वतंत्र घटनांमध्ये किमान ४ जणांचा मृत्यू झाल्याचे समोर येत आहे. या घटनांनंतर संतप्त नागरिकांनी राज्याचे मुख्यमंत्री वाय. खेमचंद सिंह यांच्या इंफाळ येथील निवासस्थानाबाहेर मृतदेह ठेवून निषेध नोंदवला. त्यावेळी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सुरक्षा दलांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या.
इंफाळ पूर्व आणि कांगपोकपी जिल्ह्यांच्या सीमेजवळ झालेल्या गोळीबारानंतर हा प्रकार घडला. घरगुती वापरासाठी लाकूड गोळा करायला डोंगराळ भागात गेलेल्या नागरिकांच्या गटावर संशयित सशस्त्र हल्लेखोरांनी गोळीबार केल्याचा आरोप आहे.
या गोळीबारात मरण पावलेल्या दोघांची ओळख अरुबम रोनिल (३५) आणि लैरेनलाकपम इनओबी (५१) अशी पटली आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी सकाळी सुमारे ७ वाजता जवळपास १६ जणांचा एक गट गावाजवळच्या डोंगराळ भागात घरगुती वापरासाठी लाकूड गोळा करायला गेला होता. तेव्हा त्यांच्यावर बेछूट गोळीबार करण्यात आला.
ही घटना इंफाळ पूर्व जिल्ह्यातील नोंगशुम गावाजवळ घडली, पण ते ठिकाण कांगपोकपी जिल्ह्याच्या हद्दीत येते. गोळीबारात जखमी झालेल्यांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनेनंतर ३ जणांचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू होते.
गोळीबार आणि नागरिकांच्या मृत्यूची बातमी पसरताच इंफाळमध्ये संतापाची लाट उसळली. संतप्त आंदोलक मृतदेह घेऊन मुख्यमंत्री वाय. खेमचंद सिंह यांच्या निवासस्थानाबाहेर पोहोचले. त्यांनी प्रवेशद्वाराजवळ मृतदेह ठेवून आपला निषेध व्यक्त केला.
तिथे जमाव वाढल्यामुळे परिस्थिती तणावपूर्ण बनली. आंदोलकांना तिथून हटवण्यासाठी सुरक्षा दलांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. त्यानंतर मृतदेह जवाहरलाल नेहरू इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (JNIMS) येथे नेण्यात आले. या घटनेच्या वेळी मुख्यमंत्री निवासस्थानी हजर होते की नाही, याची तातडीने पुष्टी होऊ शकली नाही.
मणिपूरच्या डोंगराळ भागांत अलीकडच्या काळात हिंसाचाराच्या घटना घडत असल्यामुळे राज्यातील सुरक्षा व्यवस्थेबाबत चिंता वाढली आहे. याआधी कामजोंग जिल्ह्यातील चस्साद गावात कुकी आणि नागा समुदायांशी संबंधित सशस्त्र गटांमध्ये गोळीबार झाल्याचे वृत्त आले होते. त्या घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला, तर अनेक जण जखमी झाले होते.
या नव्या घटनांमुळे इंफाळमध्ये तणाव वाढला असून, परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे आव्हान प्रशासनासमोर उभे राहिले आहे.