सोमवार, 26 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
AQI 319 | Very Poor 07:47 IST

भारतात मास्टर्स विश्वचषकासाठी संघ पाठवण्यास पाकिस्तानचा नकार, हॉकी संघालाही मंजुरी नाही

जानेवारी २०२७ मध्ये भारतात होणाऱ्या मास्टर्स क्रिकेट विश्वचषकात (५०+ वयोगट) संघ पाठवण्यास पाकिस्तान क्रिकेट बोर्ड आणि गृह मंत्रालयाने नकार दिला आहे.

भारतात मास्टर्स विश्वचषकासाठी संघ पाठवण्यास पाकिस्तानचा नकार, हॉकी संघालाही मंजुरी नाही छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत

पुढील वर्षी जानेवारी २०२७ मध्ये भारताच्या यजमानपदाखाली मास्टर्स क्रिकेट विश्वचषक (५०+ वयोगट) स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेसाठी आपला संघ भारतात पाठवण्यास पाकिस्तान क्रिकेट बोर्ड आणि पाकिस्तानच्या गृह मंत्रालयाने स्पष्ट नकार दिला आहे. पाकिस्तानने ऐनवेळी माघार घेतल्यामुळे आता स्पर्धेच्या आयोजकांना दुसऱ्या पर्यायी संघाचा शोध घ्यावा लागणार आहे.

पाकिस्तान वेटरन्स क्रिकेट असोसिएशनचे प्रमुख फवाद एजाज यांनी याबाबत माहिती दिल्याचे समोर आले आहे. पाकिस्तानचा संघ स्पर्धेतून नाव मागे घेत आहे, हे स्पर्धेच्या आयोजकांना अधिकृतपणे कळवण्यात आले आहे.

भारतीय आयोजकांनी आणि यजमान देशाने पाकिस्तानच्या वेटरन्स टीमला व्हिसा आणि उच्चस्तरीय सुरक्षा देण्याचे पूर्ण आश्वासन दिले होते. त्या आश्वासनानंतर पाकिस्तान वेटरन्स क्रिकेट असोसिएशनने पीसीबी, परराष्ट्र मंत्रालय आणि गृह मंत्रालय यांच्याकडे NOC ची मागणी केली होती.

पाकिस्तानचे गृहमंत्री आणि पीसीबी प्रमुख मोहसिन नकवी यांनी दोन्ही देशांमधील तणावाचे कारण पुढे करून संघाला भारतात जाण्याची परवानगी द्यायला स्पष्ट नकार दिला. गेल्या वर्षी श्रीलंकेत झालेला वेटरन्स वर्ल्ड कप पाकिस्तानने जिंकला होता. मात्र यंदा त्यांना ते विजेतेपद राखता येणार नाही.

२००८ मध्ये मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रीडा संबंधांवर वाईट परिणाम झाला आहे. पाकिस्तानच्या नापाक कृतींमुळे दोन्ही देशांमधले संबंध ताणले गेले आहेत. भारतीय पुरुष क्रिकेट संघ जुलै २००८ मध्ये शेवटचा पाकिस्तानमध्ये गेला होता. द्विपक्षीय मालिका खेळण्यासाठी भारतीय संघाने पाकिस्तानचा शेवटचा दौरा २००५-०६ मध्ये केला होता.

हा दुरावा फक्त क्रिकेटपुरता मर्यादित नाही, तो इतर खेळांमध्येही दिसतो. २००८ नंतर दोन्ही देशांत एकही द्विपक्षीय हॉकी मालिका खेळवली गेलेली नाही. पाकिस्तानचा हॉकी संघ शेवटचा २०२३ च्या आशियाई चॅम्पियनशिप ट्रॉफीसाठी भारतात आला होता. भारतीय पुरुष हॉकी संघाने द्विपक्षीय मालिका खेळण्यासाठी शेवटचा पाकिस्तान दौरा २००६ मध्ये केला होता. राजकीय आणि सुरक्षेच्या कारणांमुळे क्रिकेटप्रमाणेच हॉकीतील द्विपक्षीय संबंधही बराच काळ दुरावलेले आहेत.

पाकिस्तान सरकार आणि गृह मंत्रालयाची मंजुरी मिळालेली नसल्याने पाकिस्तानच्या हॉकी संघालाही भारतात येण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ