आंध्र प्रदेशातील मत्स्य प्रयोग महाराष्ट्रात राबवणार, मंत्री नितेश राणे यांचा अभ्यास दौरा
मच्छीमार व मत्स्य शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी आंध्र प्रदेशातील उपयुक्त प्रयोग महाराष्ट्रात राबवले जाणार असल्याचे मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी सांगितले.
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
मत्स्य उत्पादनापासून प्रक्रिया, बाजारपेठ आणि निर्यातीपर्यंत प्रत्येक टप्प्याला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देण्यासाठी आंध्र प्रदेशातील उपयुक्त प्रयोग महाराष्ट्रात प्रभावीपणे राबवले जाणार आहेत, असे मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी सांगितले. त्यातून मच्छीमार आणि मत्स्य शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवून राज्यात सक्षम, शाश्वत आणि जागतिक स्तरावर स्पर्धा करू शकणारी मत्स्य परिसंस्था उभी करण्यावर भर दिला जाईल, असेही त्यांनी म्हटले आहे.
आंध्र प्रदेशच्या दोन दिवसांच्या अभ्यास दौऱ्यात मंत्री राणे यांनी तेथील मत्स्य आयुक्तालयाच्या मुख्यालयाला भेट दिली. मत्स्यव्यवसाय आणि ॲक्वाकल्चर क्षेत्राच्या विकास मॉडेलची त्यांनी सविस्तर पाहणी केली. आधुनिक तंत्रज्ञान, उत्पादकतेत वाढ, मच्छीमारांचे कल्याण आणि एकात्मिक मत्स्य मूल्यसाखळी यांचाही त्यांनी आढावा घेतला.
मत्स्य आयुक्तालयातील बैठकीत राणे यांनी सागरी आणि अंतर्देशीय मत्स्यव्यवसायासह ॲक्वाकल्चर क्षेत्राची उत्पादकता वाढवण्यासाठी राबवल्या जाणाऱ्या उपाययोजना जाणून घेतल्या. यात एआय-आधारित 'Aquaculture 4.0', मत्स्य आरोग्य व रोग निरीक्षण, पाण्याच्या गुणवत्तेचे रिअल-टाइम परीक्षण, स्मार्ट फीडिंग, माशांच्या वर्तनाचे विश्लेषण, आरएएस व बायोफ्लॉक, आयओटी आधारित ॲक्वाकल्चर, डिजिटल ट्रेसेबिलिटी, तलाव नोंदणी, प्रजाती विविधीकरण, बोटींचे ट्रॅकिंग आणि मासेमारीतील पकड निरीक्षण यांचा समावेश होता.
दौऱ्यादरम्यान राणे यांनी कोव्वाडा (आंध्र प्रदेश) येथील आनंदा ॲडव्हान्स ॲक्वा लॅबमधील प्रादेशिक संशोधन व विश्लेषण प्रयोगशाळेलाही भेट दिली. तिथे मत्स्यपालनातील रोगनिदान, पाणी व मातीच्या गुणवत्तेचे परीक्षण, कोळंबीच्या आरोग्याचे निरीक्षण आणि शास्त्रीय पद्धतीने मत्स्यपालन व्यवस्थापन याबद्दल त्यांनी माहिती घेतली आणि प्रयोगशाळेतील तज्ज्ञांशी सविस्तर चर्चा केली.
या चर्चेत रोगांचे निदान, सूक्ष्मजीवशास्त्रीय विश्लेषण, पाण्याच्या गुणवत्तेचे विविध निकष, जैवसुरक्षा आणि संभाव्य धोक्यांची वेळीच ओळख या महत्त्वाच्या बाबींवर विचारविनिमय झाला. वेळेवर प्रयोगशाळा चाचण्या आणि वैज्ञानिक माहितीवर आधारित मार्गदर्शनामुळे मत्स्यपालकांना कोळंबी व माशांचे जगण्याचे प्रमाण वाढवणे, उत्पादनाचे नुकसान टाळणे आणि उत्पादकता सुधारणे यात कशी मदत होऊ शकते, हेही समजून घेता आले.
समुद्री शेवाळ लागवड, कृत्रिम प्रवाळ भित्तिका, खुल्या समुद्रातील केज कल्चर, हवामान बदलाला तोंड देऊ शकणारी किनारी मच्छीमार गावे आणि अंतर्देशीय जलस्रोतांचा शास्त्रीय पद्धतीने वापर या विषयांचीही त्यांनी पाहणी केली. हॅचरी, मत्स्य खाद्य, प्रयोगशाळा, मत्स्यपालन, प्रक्रिया उद्योग, शीतगृहे, देशांतर्गत बाजारपेठ आणि निर्यात यांना एकमेकांशी जोडणाऱ्या एकात्मिक मत्स्य मूल्यसाखळीच्या विकास मॉडेलची माहितीही या दौऱ्यात घेण्यात आली. आंध्र प्रदेशने तंत्रज्ञान आणि डेटा-आधारित व्यवस्थापनाच्या माध्यमातून मत्स्य उत्पादन, प्रक्रिया, विपणन व निर्यात या सर्व टप्प्यांत उत्पादकता आणि उत्पन्नवाढीवर भर दिला आहे.
या अभ्यासातून मिळालेले अनुभव महाराष्ट्रातील मत्स्यपालनासाठी तांत्रिक मार्गदर्शन सेवा अधिक सक्षम करण्यासाठी, रोगनिदान व परीक्षण सुविधांचा विस्तार करण्यासाठी आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून मत्स्यव्यवसायाचे व्यवस्थापन अधिक प्रभावी करण्यासाठी उपयुक्त ठरतील. महाराष्ट्राच्या किनारी भागासह अंतर्देशीय जलस्रोतांचा अधिक शास्त्रीय आणि उत्पादक वापर करून मच्छीमार, मत्स्य शेतकरी व किनारी समुदायांसाठी अधिक मूल्यनिर्मिती करण्याच्या दृष्टीने या अभ्यासातील उपयुक्त बाबींच्या अंमलबजावणीसाठी पुढील कार्यवाही केली जाईल.
या भेटीत आनंदा समूहाचे अध्यक्ष यू. के. विश्वनाथ राजू, महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यव्यवसाय विभागाचे सचिव एन. रामास्वामी, महाराष्ट्राचे मत्स्यव्यवसाय आयुक्त भानुदास पालवे, महाराष्ट्र मत्स्यव्यवसाय विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश खापले, मत्स्यव्यवसाय तज्ज्ञ मनोज शर्मा, अतिरिक्त आयुक्त महेश देवरे आणि नागनाथ भादुले यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. आंध्र प्रदेशचे मत्स्य आयुक्त रामा नाईक आणि अतिरिक्त संचालक डॉ. शंकर राव हेही यावेळी हजर होते.