मानसात फेसबुक लाईव्ह सुरू असताना नशेविरोधी कार्यकर्ते परविंदर झोटा यांची गोळ्या झाडून हत्या
पंजाबमधील मानसा येथे अंमली पदार्थांविरोधात लढणारे कार्यकर्ते परविंदर सिंह झोटा यांची सोमवारी सकाळी गोळ्या झाडून हत्या झाली. गोळीबाराचा संपूर्ण प्रकार फेसबुक लाईव्हमध्ये कैद झाला.
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
पंजाबमधील मानसा शहरात सोमवारी सकाळी अंमली पदार्थांविरोधात आवाज उठवणारे कार्यकर्ते परविंदर सिंह झोटा यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. ते त्या वेळी फेसबुक लाईव्ह करत होते, त्यामुळे हा सगळा प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आहे. 'उडता पंजाब' या सिनेमातून पंजाबमधील नशेच्या गंभीर समस्येचे चित्र लोकांसमोर आले होते, आणि आजही तिथे नशेविरोधातला लढा सुरूच आहे, हेच या घटनेतून पुन्हा दिसले.
परविंदर सिंह झोटा हे अंमली पदार्थांविरोधात सक्रियपणे काम करणारे सामाजिक कार्यकर्ते होते. ते अँटी ड्रग टास्क फोर्सचे प्रमुख होते. प्रसिद्ध समाजसेवक आणि माजी कबड्डीपटू म्हणूनही त्यांची ओळख होती.
मानसा शहरात रेल्वे क्रॉसिंगजवळ एक मेडिकल स्टोअर आहे. नशेविरोधात आवाज उठवण्यासाठी झोटा तिथे गेले होते. स्टोअरचे मालक अश्विनी हे अंमली पदार्थांची विक्री करतात, असा आरोप करत झोटा यांनी त्यांना जाब विचारला. त्या वेळी ते फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून स्टिंग ऑपरेशन करत होते. बोलता बोलता दोघांमधला वाद वाढत गेला.
सोमवारी सकाळी सुमारे नऊच्या सुमारास वाद विकोपाला गेल्यानंतर मेडिकल स्टोअरच्या मालकाने पिस्तूल काढून झोटा यांच्यावर गोळी झाडली, अशी माहिती समोर आली आहे. गोळी लागल्यानंतर झोटा जीव वाचवण्यासाठी रस्त्याच्या पलीकडे धावले. पण थोड्या अंतरावर असलेल्या एका दुकानात ते कोसळले. त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, मात्र उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला. गोळीबाराचा हा थरार फेसबुक लाईव्हमध्ये कैद झाल्याने त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
भाजपने सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, परविंदर यांच्या वडिलांनी आम आदमी पक्षाचे सरकार आणि मानसाचे आमदार विजय सिंघल यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. परविंदर यांच्या आईचा दावा आहे की, कुटुंबाला जिवे मारण्याच्या धमक्या मिळत होत्या.
शिरोमणी अकाली दलाचे नेते दलजित सिंग चीमा यांनी सांगितले की, झोटा हे नशेविरोधात चळवळ चालवत होते आणि अंमली पदार्थांच्या धंद्यात असलेल्यांचे बिंग फोडत होते. ते हे काम पाच-सहा वर्षे करत होते. तक्रार आली की ते तिथे जाऊन आंदोलन करायचे. पोलिसांनी त्यांना अनेकदा तुरुंगातही पाठवले, असे चीमा यांनी म्हटले आहे. आज अंमली पदार्थांच्या तस्करीत गुंतलेल्या एका केमिस्टने त्यांची लाईव्ह मुलाखत सुरू असताना पिस्तूल काढून गोळी झाडली, हे पंजाबमधल्या कायदा-सुव्यवस्थेचे जिवंत उदाहरण आहे, असेही ते म्हणाले. पोलीस स्वतः सुरक्षित नाहीत आणि नशेविरोधी कार्यकर्तेही सुरक्षित नाहीत, तर भगवंत मान यांचे सरकार नशेविरोधातले युद्ध कसे लढणार, असा सवाल त्यांनी केला. सरकारने याची जबाबदारी स्वीकारली पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली.
अंमली पदार्थांच्या व्यापाराविरोधात कारवाईसाठी आणि मदतीसाठी पोलिसांना फोन करण्यात आला होता, पण पोलिसांकडून वेळेत मदत मिळाली नाही, असा आरोप केला जात आहे. या घटनेवरून पंजाबमधील कायदा-सुव्यवस्थेवर आणि नशेविरोधातील सरकारी कारवाईवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. काँग्रेसनेही या घटनेवरून आम आदमी पक्षाच्या सरकारवर निशाणा साधला आहे.