शनिवार, 10 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
21:40 IST

पनवेल वाहतूक शाखेच्या पोलीस निरीक्षकांनी नाकाबंदीत पकडला तिहेरी हत्येतील पसार आरोपी

नवरात्रीच्या विशेष मोहिमेतील नाकाबंदीत पनवेल वाहतूक शाखेच्या पथकाने बुलढाण्यातील तिहेरी हत्येच्या गुन्ह्यातील पसार आरोपीला गजाआड केले.

पनवेल वाहतूक शाखेच्या पोलीस निरीक्षकांनी नाकाबंदीत पकडला तिहेरी हत्येतील पसार आरोपी छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत

१० ऑक्टोबर २०२६ रोजी नवरात्रीनिमित्त राबवल्या जाणाऱ्या विशेष मोहिमेदरम्यान पनवेल वाहतूक शाखेचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक सुभाष पुजारी आणि त्यांचे पथक आंबेडकर पुतळा परिसरात नाकाबंदी करत होते. ही मोहीम नवी मुंबईचे पोलीस आयुक्त मिलींद भारंबे, सह आयुक्त दीपक साकोरे, उपायुक्त डॉ. राहुल खाडे आणि सह आयुक्त योगेश गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू होती.

नाकाबंदी सुरू असताना एक संशयित इसम तिथे घुटमळत असल्याचे पथकाच्या नजरेस आले. पुजारी यांनी त्याची कसून चौकशी केली, तेव्हा तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. त्याच्या हातावर जखम दिसल्यामुळे संशय आणखी बळावला.

त्यानंतर पुजारी यांनी त्याला विश्वासात घेऊन सखोल चौकशी केली. तेव्हा त्याने आपले नाव दीपक फतेहसिंग सुराडकर (वय ४४, रा. बुलढाणा) असे सांगितले. कौटुंबिक आणि जमिनीच्या वादातून आई सरस्वती (७५), भाऊ संजय (४८) आणि पुतण्या रणजित (२१) अशा तिघांची निर्घृण हत्या करून आपण पळून आलो आहोत, अशी धक्कादायक कबुली त्याने दिली.

या कबुलीनंतर पुजारी यांनी तात्काळ चिखली पोलीस ठाणे (बुलढाणा) येथे संपर्क साधून खात्री केली. तेव्हा या आरोपीविरोधात तिहेरी हत्येचा गुन्हा दाखल असल्याचे स्पष्ट झाले. वाहतूक शाखेच्या सतर्कतेमुळे अत्यंत धोकादायक आणि पसार झालेला हा आरोपी अवघ्या काही तासांत गजाआड झाला.

या कामगिरीत पुजारी यांच्यासोबत अंमलदार पोना/४४१५ विश्वनाथ पाटील, पोना/३१०१ केशव निकम, पोहवा/२३३५ ढेंबरे, पोशि/१२०६५ संजय घाटगे आणि पोशि/४६९७ महेंद्र गळवे यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.

या घटनेनंतर पोलीस वर्तुळात एक मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. पोलीस दलात काम करताना अनेकदा अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना त्यांच्या आवडीनुसार किंवा कौशल्यानुसार पदस्थापना मिळत नाही. वाहतूक विभागात असे अनेक अधिकारी आणि अंमलदार आहेत, ज्यांना फील्ड वर्क किंवा ट्रॅफिक नियंत्रणात रुची नसतानाही तिथे काम करावे लागते. दुसरीकडे, गुन्हे उघडकीस आणण्याचे विशेष कौशल्य असलेले अनेक तल्लख अधिकारी ट्रॅफिक शाखेत कर्तव्य बजावत आहेत.

अशा अधिकाऱ्यांना गुन्हे शाखा, डिटेक्शन शाखा किंवा पोलीस ठाण्यांमधील तपासी पथकांमध्ये योग्य संधी मिळाली, तर गुन्हेगारीवर मोठा वचक बसू शकतो, असा सूर आता पोलीस वर्तुळातून व्यक्त होत आहे. नवी मुंबई पोलीस दलात पुजारी यांच्यासारखे क्राईम डिटेक्शनची उत्तम आवड आणि कौशल्य असलेले अनेक अधिकारी व कर्मचारी वाहतूक विभागात आहेत. त्यांच्या क्षमतेचा पूर्ण वापर करण्यासाठी त्यांना गुन्हे शाखा किंवा पोलीस ठाण्यांच्या डिटेक्शन टीममध्ये संधी देणे गरजेचे आहे, असेही म्हटले जात आहे. पनवेल वाहतूक शाखेची ही कामगिरी त्याचेच ताजे आणि बोलके उदाहरण मानली जात आहे.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ