सोमवार, 26 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
AQI 319 | Very Poor 07:47 IST

लातूरमध्ये सणासुदीत महागाईचे सावट; डाळी, खाद्यतेल, भाजीपाल्याच्या दरवाढीने घरखर्चाचे गणित बिघडले

लातूर जिल्ह्यात दुष्काळसदृश परिस्थिती असतानाच महागाईचा दर ४.६३ टक्क्यांवरून ५.४८ टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. डाळी, खाद्यतेल आणि भाजीपाल्याच्या किमती वाढल्याने सामान्य कुटुंबांवर ताण आला आहे.

लातूरमध्ये सणासुदीत महागाईचे सावट; डाळी, खाद्यतेल, भाजीपाल्याच्या दरवाढीने घरखर्चाचे गणित बिघडले छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत

लातूर जिल्ह्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झालेली असतानाच महागाईने सर्वसामान्य नागरिकांचे कंबरडे मोडले आहे. अन्नधान्य, डाळी, खाद्यतेल आणि भाजीपाल्याच्या किमती वाढत असल्याने घरखर्चाचे गणित पूर्णपणे बिघडले आहे. एकीकडे पावसाची कमतरता आणि शेतीसमोरचे संकट, तर दुसरीकडे वाढत्या महागाईचा भार, अशा दुहेरी कात्रीत सामान्य कुटुंबे सापडली असून त्यांना आर्थिक ताण सहन करावा लागत आहे.

महागाईचा दर ४.६३ टक्क्यांवरून ५.४८ टक्क्यांपर्यंत पोहोचल्याची आकडेवारी समोर आली आहे. भाज्या आणि अन्नधान्याच्या किमतीतील वाढ हे या महागाईमागील प्रमुख कारण मानले जात आहे. सणासुदीच्या काळात हे चित्र आणखी चिंता वाढवणारे ठरत आहे.

सरकारच्या देखरेखीखाली असलेल्या ४२ जीवनावश्यक वस्तूंपैकी ४१ वस्तूंच्या किमतीत गेल्या वर्षभरात वाढ झाल्याचे चित्र आहे. बाजारात डाळींचे दर वाढल्याने ग्राहकांना मोठा आर्थिक फटका बसत आहे. चणाडाळ १०० रुपये, मूगडाळ १३० रुपये, तूरडाळ १५० रुपये, चवळी डाळ १४० रुपये, तर मसूर डाळ १०० रुपये प्रतिकिलोपर्यंत पोहोचल्याचे चित्र आहे.

डाळींसोबतच ज्वारी, बाजरी, तांदूळ आणि गहू यांच्याही दरात वाढ झाल्याने रोजच्या जेवणाचा खर्च वाढला आहे. गहू आणि लोकवन गव्हाचे दर प्रतिकिलो ३५ रुपयांच्या आसपास आहेत. त्यामुळे कुटुंबांच्या महिन्याच्या किराणा खर्चात भर पडत आहे.

कांद्याबरोबरच सूर्यफूल तेल, मोहरीचे तेल, पाम तेल आणि सोयाबीन तेल यांच्याही किमती वाढल्या आहेत. त्यामुळे स्वयंपाकघरातला खर्च आणखी चढला आहे. दिवाळीच्या तोंडावर साखरेचे दरही वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

सध्या नवरात्रोत्सव सुरू असल्याने फळे आणि उपवासासाठी लागणाऱ्या पदार्थांना मागणी वाढली आहे. साबुदाणा, शेंगदाणे, भगर यांसारख्या पदार्थांचे दर वाढल्याने उपवास करणाऱ्या नागरिकांनाही जास्त पैसे मोजावे लागत आहेत. फळांच्या किमती वाढल्याने सणासुदीच्या काळातील खर्चाचे नियोजन करणे कठीण झाले आहे.

जिल्ह्यातील दुष्काळसदृश परिस्थितीचा शेती उत्पादनावर परिणाम झाला आहे. पिकांचे उत्पादन घटल्यास त्यांच्या किमती आणखी वाढू शकतात, अशी भीती व्यक्त होत आहे. महागाईचा सर्वाधिक फटका कमी आणि मध्यम उत्पन्न गटातील कुटुंबांना बसत आहे. घरखर्च, किराणा, भाजीपाला, शिक्षण, आरोग्य आणि इतर गरजांसाठी जास्त रक्कम खर्च करावी लागत असल्याने बचतीवर परिणाम होत आहे.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ