महागाईची झळ असूनही दसऱ्याला खरेदीचा उत्साह, इलेक्ट्रॉनिक्स बाजारात ग्राहकांची गर्दी
दसऱ्याच्या मुहूर्तावर शहरात आणि उपनगरात इलेक्ट्रॉनिक्स बाजारात ग्राहकांची मोठी गर्दी दिसत आहे. इलेक्ट्रिकल वस्तूंच्या दरात वाढ झाली असली तरी खरेदीकडे ग्राहकांचा कल वाढला आहे.
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
घरगुती इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीसाठी दसरा हा साडेतीन मुहूर्तांपैकी अत्यंत शुभ दिवस मानला जातो. त्यामुळे शहरात आणि उपनगरात इलेक्ट्रॉनिक्स बाजारात ग्राहकांची मोठी गर्दी दिसत आहे. बाजाराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून स्मार्ट टीव्ही, फ्रिज, वॉशिंग मशीन, मायक्रोवेव्ह ओव्हन अशा वस्तू घ्यायला ग्राहकांचा कल वाढला आहे.
नवीन वस्तू घरात आणल्या की सुख-समृद्धी येते, अशी भारतीय संस्कृतीत मोठी श्रद्धा आहे. या काळात इलेक्ट्रॉनिक्स ब्रँड्स आणि विक्रेते मोठ्या सवलती, कॅशबॅक आणि 'बाय वन गेट वन' सारख्या ऑफर्स देतात. स्मार्ट टीव्ही किंवा फ्रिजसारख्या महागड्या वस्तू घेण्यासाठी नो-कॉस्ट ईएमआयमुळे सुलभ हप्त्यांची सोय उपलब्ध असते. नोकरदार वर्गाला या काळात दिवाळी बोनस किंवा सणांचे भत्ते मिळतात, त्यामुळे खरेदीसाठी बजेट उपलब्ध होते.
अनेक नागरिकांनी खरेदीसाठी आधीच बुकिंग करून ठेवलेले असते. त्यामुळे दसऱ्याच्या दिवशी वस्तू घरी घेऊन जाण्यासाठी दुकानांत मोठी गर्दी असते. इलेक्ट्रिकल मार्केटमध्ये यंदाही उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. गेल्या काही महिन्यांत इलेक्ट्रिकल वस्तूंच्या दरात सुमारे 7 ते 8 टक्के वाढ झाली आहे. तरीही दसऱ्याच्या मुहूर्तावर वस्तू घेण्याकडे ग्राहकांचा कल वाढला आहे.
येत्या काळात दर आणखी वाढणार असल्याने खरेदीसाठी अधिक रक्कम मोजावी लागणार आहे. म्हणून अनेक कुटुंबे आधीच खरेदी करून दसऱ्याच्या मुहूर्तावर नवीन वस्तू घरात आणण्याला प्राधान्य देत आहेत. त्यामुळे घरातील जुनी उपकरणे बदलून नवीन घेण्याकडे कल दिसतो. कॉपर आणि प्लास्टिकच्या दरात वाढ झाल्याने इलेक्ट्रिकल वस्तूंच्या दरात 8 ते 10 टक्क्यांनी वाढ झाली असून घरगुती वस्तू महागल्या आहेत. तरीही दसऱ्याच्या मुहूर्तावर नागरिकांचा नवीन वस्तू खरेदीकडे कल वाढला आहे आणि ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.
इलेक्ट्रॉनिक्स बाजारात ग्राहकांची प्रचंड गर्दी दिसत असून नागरिक नवीन वस्तू घेण्याला प्राधान्य देत आहेत. आकर्षक डिस्काउंट्स, नो-कॉस्ट ईएमआय आणि कॅशबॅक ऑफर्समुळे स्मार्ट टीव्ही, रेफ्रिजरेटर, 5 जी स्मार्टफोन्स आणि वॉशिंग मशीन यांना सर्वाधिक मागणी आहे.