शनिवार, 10 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
03:28 IST

कुलदेवता, ग्रामदेवता, इष्टदेवता, स्थलदेवता: चौघांमधला फरक आणि शुभकार्यातील स्थान

लग्न, मुंज, गृहप्रवेश किंवा नव्या व्यवसायाच्या सुरुवातीला पूजल्या जाणाऱ्या चार देवतांचा अर्थ आणि त्यांचे महत्त्व.

कुलदेवता, ग्रामदेवता, इष्टदेवता, स्थलदेवता: चौघांमधला फरक आणि शुभकार्यातील स्थान छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत

भारतीय संस्कृतीत कोणतेही शुभकार्य सुरू करण्यापूर्वी देवाचे स्मरण करण्याची अतिशय प्राचीन परंपरा आहे. लग्न, गृहप्रवेश, वास्तुशांती, मुंज किंवा नवीन व्यवसायाची सुरुवात करताना अनेक कुटुंबांमध्ये कुलदेवता, ग्रामदेवता, इष्टदेवता आणि स्थलदेवता यांचे पूजन केले जाते. पूजेत या चार देवतांचे आवाहन होताना अनेकांनी ऐकले असेल. मग या चौघांमधला नेमका फरक काय आणि धार्मिक जीवनात त्यांना इतके महत्त्व का, हे समजून घेऊ.

कुलदेवता ही एखाद्या कुटुंबाची किंवा वंशाची परंपरागत आराध्य देवता मानली जाते. कुटुंबातील सदस्य पिढ्यान्‌पिढ्या ज्या देवतेची श्रद्धेने पूजा करतात, तिला कुलदेवता किंवा कुलदैवत म्हणतात. अनेक कुटुंबांमध्ये कुलदेवतेचे मूळ मंदिर त्यांच्या पूर्वजांच्या गावात असते. लग्न, मुंज यांसारख्या महत्त्वाच्या संस्कारांपूर्वी कुलदेवतेचे दर्शन घेणे किंवा तिची पूजा करणे ही परंपरा अनेक ठिकाणी पाळली जाते. त्यामुळे कुटुंबाची परंपरा आणि पूर्वजांशी असलेले नाते जपले जाते. महाराष्ट्रातील तुळजा भवानी, जेजुरीचा खंडोबा आणि माहूरगडची रेणुका माता यांसारख्या देवतांची मंदिरे बऱ्याच कुटुंबांची कुलदैवते आहेत.

ग्रामदेवतेची संकल्पना गावाचे संरक्षण, सुख-समृद्धी आणि सामूहिक कल्याण यांच्याशी जोडलेली आहे. ग्रामदेवता ही एखाद्या गावाची किंवा वस्तीची आराध्य देवता असते. महाराष्ट्रात अनेक गावांमध्ये ग्रामदैवताची यात्रा, जत्रा आणि वार्षिक उत्सव मोठ्या श्रद्धेने साजरे केले जातात. गावातली संकटे दूर व्हावीत, शेती चांगली व्हावी आणि गावात शांतता नांदावी, अशी प्रार्थना ग्रामदेवतेकडे केली जाते. घरातल्या शुभकार्यांसाठी, विशेषतः लग्नकार्य आणि मुंजकार्यासाठी, ग्रामदैवताचे आशीर्वाद आवर्जून घेतले जातात. महाराष्ट्रीयन कुटुंबांमध्ये लग्नाआधी गावदेवाची प्रथा पाळली जाते. त्यात ग्रामदेवतांचे आशीर्वाद घेऊन त्यांना लग्नकार्याचे आमंत्रण दिले जाते.

ज्या देवतेवर एखाद्या व्यक्तीची विशेष श्रद्धा असते आणि जिची ती नियमित उपासना करते, तिला इष्टदेवता म्हणतात. कुणाची इष्टदेवता गणपती, शिवमहादेव, विष्णू, देवी, विठ्ठल किंवा आणखी एखादी आराध्य देवता असू शकते. इष्टदेवतेची निवड वैयक्तिक श्रद्धा, कौटुंबिक संस्कार किंवा आध्यात्मिक परंपरेनुसार केली जाते. तिचे स्मरण केल्याने मनाला आधार, शांतता आणि सकारात्मकतेची अनुभूती मिळू शकते.

विशिष्ट ठिकाणाशी संबंधित असलेल्या देवतेला स्थलदेवता म्हणतात. एखादे मंदिर, तीर्थक्षेत्र, घर, शेत किंवा विशिष्ट परिसर यांच्याशी या देवतेची धार्मिक परंपरा जोडलेली असू शकते. नवीन घरात प्रवेश करताना, एखाद्या पवित्र स्थळी धार्मिक विधी करताना किंवा नवीन जागेवर काम सुरू करताना त्या ठिकाणाशी संबंधित देवतेचे पूजन केले जाते. महाराष्ट्रीयन कुटुंबांमध्ये नरसोबा, म्हसोबा इत्यादी देवता त्या त्या भावकी आणि गावकीच्या स्थलदेवता असू शकतात. शेतात, रानात, विहिरीच्या शेजारी, माळावर, घाटावरून जाताना किंवा डोंगराशेजारी असणाऱ्या देवतांनाही स्थलदेवता म्हणता येते.

या देवतांचे पूजन श्रद्धा, परंपरा आणि कृतज्ञतेचे प्रतीक मानले जाते. कुलदेवता कुटुंबाच्या परंपरेशी, ग्रामदेवता गावाच्या सामूहिक श्रद्धेशी, इष्टदेवता वैयक्तिक भक्तीशी आणि स्थलदेवता विशिष्ट जागेशी संबंधित असते. प्रत्येक कुटुंबाची पूजा करण्याची पद्धत वेगळी असू शकते. या परंपरांमुळे कुटुंबातील नाती, सांस्कृतिक वारसा आणि समाजातला एकोपा जपण्यास मदत होते.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ