शनिवार, 10 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
02:55 IST

यात्रा-उत्सव म्हणजे गावांच्या संस्कृतीचा आधार; सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांचे मत

राज्य गॅझेटिअरमधील यात्रा-उत्सवांवरील आणि वैदिक जलविज्ञानावरील ग्रंथांचे प्रकाशन आशिष शेलार यांच्या हस्ते झाले.

यात्रा-उत्सव म्हणजे गावांच्या संस्कृतीचा आधार; सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांचे मत छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत

गावोगावी साजऱ्या होणाऱ्या यात्रा आणि उत्सव हे केवळ धार्मिक किंवा मनोरंजनाचे कार्यक्रम नाहीत. महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरेचे, सामाजिक एकतेचे आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेचे ते महत्त्वाचे आधारस्तंभ आहेत, असे राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी सांगितले.

महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या दर्शनिका विभागाने 'राज्य गॅझेटिअर'मधील तीन ग्रंथ प्रकाशित केले आहेत. 'यात्रा व उत्सव कोकण विभाग', 'यात्रा व उत्सव : पश्चिम महाराष्ट्र' आणि 'वैदिक जलविज्ञान' अशी या ग्रंथांची नावे आहेत. त्यांच्या प्रकाशन सोहळ्यात शेलार बोलत होते. ग्रंथांचे प्रकाशनही त्यांच्याच हस्ते झाले.

गावातील देवदेवता, लोककला, नृत्य, संगीत, परंपरा आणि सामूहिक सहभाग यांमुळे ग्रामीण समाजाचे सांस्कृतिक जीवन समृद्ध होत असते, असे त्यांनी सांगितले. या परंपरांचे जतन करतानाच गावांचा सर्वांगीण विकास आणि आधुनिक व्यवस्थांचे बळकटीकरण करणे आवश्यक आहे, असेही ते म्हणाले.

यात्रा आणि उत्सव हे गावाच्या सांस्कृतिक ओळखीचे अविभाज्य अंग असतात, असे शेलार यांनी नमूद केले. या उत्सवांतून पारंपरिक कला, नृत्य, संगीत आणि लोकजीवनाचे विविध पैलू पुढच्या पिढीपर्यंत पोहोचतात. यात्रांमुळे गावातील नागरिक एकत्र येतात, सामाजिक संबंध घट्ट होतात आणि सामूहिक सहभागाची भावना वाढते. या परंपरांचे दस्तऐवजीकरण आणि अभ्यास झाला, तर महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशाचे जतन अधिक प्रभावीपणे करता येईल, असेही त्यांनी सांगितले.

यात्रा-उत्सवांचा संबंध केवळ श्रद्धा आणि परंपरेपुरता मर्यादित नाही, असे मत शेलार यांनी व्यक्त केले. त्यातून स्थानिक कलाकार, कारागीर, लघुव्यावसायिक आणि विविध सेवा पुरवणाऱ्यांना रोजगाराच्या संधी मिळतात. त्यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेलाही चालना मिळते. स्थानिक कला आणि कलाकृतींना प्रोत्साहन देत या परंपरांचे संवर्धन करणे ही काळाची गरज आहे, असे त्यांनी म्हटले.

महाराष्ट्राच्या विविध भागांतील यात्रा, उत्सव आणि सांस्कृतिक परंपरांची माहिती या ग्रंथांमध्ये संकलित केली आहे. त्यामुळे ते संशोधक, अभ्यासक, विद्यार्थी आणि सांस्कृतिक क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी उपयुक्त ठरतील. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाचे दस्तऐवजीकरण करून ते पुढच्या पिढ्यांपर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने या प्रकाशनाला विशेष महत्त्व आहे.

कार्यक्रमाला दर्शनिका विभागाच्या कार्यकारी संपादक व सचिव डॉ. सायली पिंपळे उपस्थित होत्या. त्यांच्यासह संशोधक लेखिका डॉ अनिता राणे, डॉ सुवर्णा चवरे, डॉ. बलसेकर, डॉ. प्राची मोघे, महाराष्ट्र राज्य साहित्य अकादमीचे सचिव सचिन निंबाळकर, संबंधित अधिकारी, अभ्यासक आणि निमंत्रित हजर होते.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ