विसापूरच्या सैनिक स्कूलमधील १२ वर्षीय मुलाच्या मृत्यूमागचे कारण पोलीस तपासात समोर
रामनगर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक प्रभावती एकुरके यांनी दिलेल्या माहितीनुसार, शाळेतील कॅमेऱ्यात कैद झालेल्या फुटेजमुळे घटनेचा क्रम स्पष्ट झाला आहे.
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
चंद्रपूर जिल्ह्यातील विसापूर येथील सन्मित्र सैनिक स्कूलमध्ये शिकणाऱ्या १२ वर्षीय विद्यार्थ्याच्या संशयास्पद मृत्यूच्या प्रकरणात आता नवी माहिती समोर आली आहे. सुरुवातीला पालकांकडून शाळा व्यवस्थापनावर निष्काळजीपणाचे आरोप केले जात होते. मात्र रामनगर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक प्रभावती एकुरके यांनी दिलेल्या अधिकृत माहितीनुसार, वडिलांच्या एका निर्णयानंतर या मुलाने टोकाचे पाऊल उचलले, असे पोलीस तपासात स्पष्ट झाले आहे.
एकुरके यांच्या माहितीनुसार, सैनिकी शाळेतले या मुलाचे हे पहिलेच वर्ष होते. ८ ऑक्टोबर रोजी त्याला त्वचेशी संबंधित, म्हणजे खाजेचा त्रास सुरू झाला. त्यानंतर शाळा व्यवस्थापनाने त्याच्या वडिलांना तातडीने बोलावून घेतले आणि मुलगा पूर्ण बरा होईपर्यंत त्याला गावी घेऊन जावे, असा सल्ला दिला होता, अशी माहिती आहे.
पण वडिलांनी मुलाला बाहेर डॉक्टरांकडे नेऊन प्राथमिक उपचार करून घेतले आणि अवघ्या दोन तासांतच त्याला पुन्हा सैनिकी शाळेत आणून सोडले. आपल्याला गावी जाता येणार नाही आणि पुन्हा त्याच वातावरणात राहावे लागणार, हे समजताच तो खूप निराश झाला आणि सतत रडू लागला. याच उद्वेगातून त्याने वसतिगृहात कॉटजवळ कपडे वाळत घालण्यासाठी बांधलेल्या नायलॉनच्या दोरीने गळफास घेऊन आपला जीव गमावला, असे पोलीस तपासात स्पष्ट झाले आहे.
घटनेच्या दिवशी वडिलांनी त्याला शाळेजवळ आणले आणि खाऊ घेऊन दिला. पण गावी न जाता शाळेत परतावे लागल्याने तो दुःखी झाला होता आणि सतत रडत होता. वडील त्याला सोडून गावी निघाले, तेव्हा तो आपल्या बेडजवळ गेला. त्यावेळी बाकीची सर्व मुले बाहेर मैदानात होती. सात ते आठ मिनिटे तो रडतच होता आणि त्यानंतर बेडजवळच्या नायलॉन दोरीने त्याने गळफास घेतला. थोड्या वेळाने एक मुलगा तिथे आला. समोरचे दृश्य पाहताच त्याने थेट शिक्षकांना याची माहिती दिली, पण तोपर्यंत वेळ निघून गेली होती.
या सगळ्या घडामोडींवर सन्मित्र सैनिक शाळेचे प्राचार्य मोहन पाठक यांनी शाळेची भूमिका मांडली. हा मृत्यू अत्यंत दुर्दैवी आणि वेदनादायी घटना आहे, असे ते म्हणाले. शाळा प्रशासनावरील निष्काळजीपणाचे आरोप पूर्णपणे चुकीचे आहेत, असे त्यांचे म्हणणे आहे. ८ ऑक्टोबर रोजी त्रास सुरू झाल्यावर शाळेनेच आधी त्याला डॉक्टरांकडे दाखवले होते. वडील आल्यावर त्यांना "आउटपास" देऊन मुलगा बरा होईपर्यंत गावी घेऊन जाण्यास सांगितले होते, पण उपचारांनंतर दोन तासांतच वडील त्याला परत सोडून गेले, असे पाठक यांनी सांगितले. गावी जाता न आल्याने तो नाराज होऊन रडत होता, असेही ते म्हणाले. तो अत्यंत हुशार विद्यार्थी होता आणि शाळा पोलिसांना तपासात पूर्ण सहकार्य करत आहे, असेही प्राचार्य पाठक यांनी स्पष्ट केले.
ही संपूर्ण घटना शाळेतील कॅमेऱ्यात कैद झाली आहे. पोलीस आणि शाळा प्रशासनाने हे सर्व फुटेज मृत मुलाच्या वडिलांना प्रत्यक्ष दाखवले आहे. पोलिसांच्या या तपासामुळे शाळा प्रशासनावरील संशय दूर झाला आहे. एका बाजूला मुलाला गावी न नेण्याचा वडिलांचा निर्णय आणि दुसरीकडे नव्या वातावरणाचा बालमनावर आलेला ताण, यातून या १२ वर्षांच्या चिमुकल्याचा अंत झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे आणि रामनगर पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.