कोजागिरीच्या चांदण्यात घ्या मसाला दुधाचा आस्वाद, घरच्या घरी बनवा चविष्ट मसाला दूध
यंदा कोजागिरी पौर्णिमा २५ ऑक्टोबरला आहे. या दिवशी घरोघरी मसाला दूध बनतं, त्याची सोपी कृती इथे दिली आहे.
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
यंदाच्या वर्षी कोजागिरी पौर्णिमा २५ ऑक्टोबरला आहे. हिंदू धर्मात या पौर्णिमेला खूप महत्त्व दिलं जातं. या दिवशी केलेला उपवास मानसिक आरोग्यासाठी चांगला मानला जातो. अश्विन महिन्यातल्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला कोजागिरी साजरी केली जाते.
मध्यरात्री देवी लक्ष्मी आणि इंद्र यांची पूजा करून त्यांना मसाला दुधाचा नैवेद्य दाखवण्याची प्रथा आहे. या रात्री चंद्र सोळा कलांनी परिपूर्ण असतो आणि चंद्राच्या किरणांमधून अमृताचा वर्षाव होतो, असा समज आहे. म्हणूनच चांदण्यात ठेवलेलं आटवलेलं दूध आरोग्यासाठी गुणकारी समजलं जातं.
कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी प्रत्येक घरात मसाला दूध बनतंच. पण बऱ्याचदा ते मनासारखं जमत नाही. अशा वेळी खाली दिलेली सोपी कृती पाळली तर घरी बनवलेलं मसाला दूध चवीला तर छान लागतंच, शिवाय शरीरालाही फायदेशीर ठरतं. चला तर मग, ही कृती एकदा पाहूया.
साहित्य असं लागेल: दूध, काजू, बदाम, साखर, चारोळी, केशर, वेलची पावडर, जायफळ पावडर आणि दूध मसाला.
मसाला दूध बनवण्यासाठी सुरुवातीला कढईत १ लीटर दूध ओता आणि त्याला एक उकळी येऊ द्या. त्यानंतर गॅस मंद आचेवर ठेवा आणि दूध चमच्याने सतत हलवत राहा.
दुसरीकडे काजू, बदाम आणि चारोळी थोडी गरम करून घ्या. ती मिक्सरच्या भांड्यात घालून जाडसर वाटा. दूध नीट उकळलं की त्यात वेलची पावडर, जायफळ पावडर आणि दूध मसाला घालून सगळं एकत्र करा.
मग आवडीनुसार साखर घाला आणि चमच्याने ढवळा. मंद आचेवर ५ ते १० मिनिटं नीट ढवळत राहिलात तर दूध घट्टसर होईल.
सगळ्यात शेवटी वाटून ठेवलेला सुका मेवा दुधात घालून पुन्हा एकदा मिसळा. कोजागिरी पौर्णिमेनिमित्त चविष्ट मसाला दूध तयार आहे. अशा पद्धतीने बनवलेलं दूध घरातल्या प्रत्येकाला खूप आवडेल.
कमेंट
अजून कमेंट नाही. पहिली तुम्ही लिहा.