बुधवार, 14 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
21:13 IST

ऊस परिषदेत ठरलेला दर मिळेपर्यंत खटावमध्ये ऊसतोड बंद; स्वाभिमानी संघटनेचा इशारा

खटाव तालुक्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने ऊसतोड आणि ऊस वाहतूक रोखण्यासाठी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर मोहीम सुरू केली आहे.

ऊस परिषदेत ठरलेला दर मिळेपर्यंत खटावमध्ये ऊसतोड बंद; स्वाभिमानी संघटनेचा इशारा छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत

ऊस परिषदेत जाहीर झालेला ऊसदर मिळाल्याशिवाय खटाव तालुक्यातील कोणत्याही साखर कारखान्याची ऊसतोड आणि ऊस वाहतूक सुरू होऊ देणार नाही, अशी आक्रमक भूमिका स्वाभिमानी शेतकरी संघटनेने घेतली आहे. संघटनेचे प्रदेश कार्याध्यक्ष अनिल पवार आणि खटाव तालुकाध्यक्ष दत्तू काका घार्गे यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यातील विविध गावांत पदाधिकारी थेट शेतकऱ्यांच्या ऊस फडात उतरले आणि त्यांनी वाहतूक रोखण्याची मोहीम हाती घेतली. त्यामुळे अनेक ठिकाणी ऊसतोड आणि ऊस वाहतूक बंद पडली आहे.

गोपुज, वाकळवाडी, नायकाची वाडी, निमसोड, आंबवडे, हिंगणे, डाळमोडी, चितळी आणि मायणी या भागांत संघटनेचे पदाधिकारी शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले. ऊस परिषदेत जाहीर झालेला दर मिळणे हा शेतकऱ्यांचा हक्क आहे आणि दराचा प्रश्न मार्गी लागल्याशिवाय ऊस कारखान्याला पाठवू नये, अशी भूमिका संघटनेने मांडली.

यावेळी ऊस वाहतूकदारांना फक्त समज देऊन वाहतूक थांबवण्याचे आवाहन करण्यात आले. मात्र शेतकऱ्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष करून वाहतूक सुरू ठेवली, तर आंदोलन अधिक तीव्र केले जाईल, असा इशारा तालुकाध्यक्ष दत्तू काका घार्गे यांनी दिला.

घार्गे म्हणाले, "आज आम्ही ऊस वाहतूकदारांना समज देत आहोत. मात्र, उद्या आंदोलन तीव्र झाले तर त्याची जबाबदारी संबंधित कारखाना प्रशासनाची असेल. ऊसदराचा प्रश्न मार्गी लागेपर्यंत ऊस वाहतूक करू नका. शेतकऱ्यांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका."

सोनहिरा, अजिंक्यतारा, शिवनेरी, वर्धन (पडळ), खटाव, जरंडेश्वर यांसह संबंधित साखर कारखान्यांच्या प्रशासनाने ऊस परिषदेत जाहीर झालेल्या दराच्या प्रश्नावर तातडीने भूमिका स्पष्ट करावी, अशी संघटनेची मागणी आहे. दराचा प्रश्न सुटेपर्यंत वाहतूक सुरू ठेवण्याचा प्रयत्न झाला, तर आंदोलन कारखान्यांच्या गव्हाण बंद पाडण्यापर्यंत नेण्याचा इशाराही पदाधिकाऱ्यांनी दिला. शेतकऱ्यांच्या उसाला योग्य दर मिळालाच पाहिजे, या मागणीवर संघटना ठाम आहे आणि दराबाबत तोडगा निघेपर्यंत आंदोलन मागे घेतले जाणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले.

संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांनाही आंदोलनाला साथ देण्याचे आवाहन केले. त्यांनी म्हटले, "स्वाभिमानी शेतकरी संघटना तुमच्या हक्कासाठी रस्त्यावर उतरली आहे. मग आपल्या हक्काच्या दरासाठी दोन-चार दिवस ऊसतोड थांबली, तर त्यात बिघडणार काय? तात्पुरत्या अडचणींपेक्षा उसाला योग्य दर मिळणे महत्त्वाचे आहे. शेतकऱ्यांनी आपापसातील मतभेद बाजूला ठेवून एकजूट दाखवावी."

गावोगावी झालेल्या या मोहिमेत हिंगणे परिसरात संतोष निकम, चितळी परिसरात अनिल कचरे, तर बनपुरी आणि येरळवाडी परिसरात युवक तालुकाध्यक्ष विजय देवकर यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. त्यांनी ऊसदराच्या प्रश्नावर संघटनेची भूमिका समजावून सांगितली आणि ऊसतोडी थांबवण्याचे आवाहन केले. खटाव तालुक्यातील ऊसदराचा प्रश्न निकाली निघेपर्यंत आंदोलनाची धग कायम ठेवण्याचा निर्धार संघटनेने व्यक्त केला आहे. खातगुण, येळीव, उंबर्डे, गोपूज आणि बनपुरी येथील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आंदोलनाला एकमुखी पाठिंबा दिला आहे.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ