वर्सोवा समुद्रकिनारी पोत्यात बांधलेला पुरुषाचा मृतदेह सापडला; अज्ञात आरोपीविरोधात खुनाचा गुन्हा
वर्सोवा समुद्रकिनारी पोत्यात बांधलेला पुरुषाचा मृतदेह सापडला; वर्सोवा पोलिसांनी अज्ञात आरोपीविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
मुंबई उपनगरातील अंधेरी पश्चिम भागात असलेल्या वर्सोवा समुद्रकिनारी गुरुवारी सकाळी पोत्यात बांधलेला एका पुरुषाचा मृतदेह सापडला. या धक्कादायक घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. देवाची वाडी, जेपी रोड येथील हिंदू स्मशानभूमीच्या मागच्या बाजूला हा प्रकार समोर आला, अशी माहिती मिळत आहे.
समुद्रकिनारी फेरफटका मारायला आलेल्या नागरिकांना पाण्यातून वाहून आलेले, काहीतरी बांधलेले एक पोते दिसले. त्यांनी लगेच ही माहिती पोलिसांना दिली. पोलीस तातडीने घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी ब्लेडने पोते उघडले. तेव्हा आत पुरुषाचा मृतदेह असल्याचे दिसून आले.
मिळालेल्या माहितीनुसार, मृत व्यक्तीचे वय साधारण 35 ते 40 वर्षे असावे. मृतदेह फुगलेल्या अवस्थेत सापडला. पोलिसांनी तो कूपर रुग्णालयात पाठवला. तिथल्या डॉक्टरांनी तपासणी करून त्याला मृत घोषित केले. शवविच्छेदनासाठीही मृतदेह कूपर रुग्णालयातच पाठवण्यात आला आहे.
कोणीतरी अज्ञात व्यक्तीची हत्या केली आणि पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह पोत्यात बांधून समुद्रात फेकला, असा पोलिसांचा प्राथमिक संशय आहे. हा प्राथमिक अंदाज असून, त्याबाबत अधिक तपास सुरू आहे.
याप्रकरणी वर्सोवा पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात आरोपीविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारतीय न्याय संहितेच्या कलम 103 (1) आणि 238 अंतर्गत हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
आरोपीचा शोध घेण्यासाठी वर्सोवा पोलीस परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत. त्यासोबतच गुप्त माहितीच्या आधारेही आरोपीचा शोध घेतला जात आहे. अजून कोणाला अटक झाल्याचे सांगण्यात आलेले नाही.
सुरुवातीला पोलिसांसमोर मृत व्यक्तीची ओळख पटवण्याचे मोठे आव्हान असेल. ओळख पटल्यानंतरच पुढच्या तपासाला वेग येण्याची शक्यता आहे.
दरम्यान, गुरुवारी रायगड येथेही एक दुःखद घटना घडली. पुण्याहून आलेल्या सहलीतील 8 जणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. पाण्याचा अंदाज न आल्याने आठही जण पाण्यात बुडाल्याची प्राथमिक माहिती आहे. पुण्यातील आळंदी येथून एका खासगी क्लासची सहल पर्यटनासाठी तिथे आली होती. या दुर्घटनेतील सर्व आठही जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत.