सोमवार, 26 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
AQI 319 | Very Poor 10:11 IST

खराशीत महाप्रसादानंतर उलटी-जुलाबाचा त्रास, आरोग्य विभागाकडून १२० रुग्णांवर उपचार

भंडारा जिल्ह्यातील खराशी गावात महाप्रसादानंतर अनेकांना उलटी व जुलाब सुरू झाले. आरोग्य विभागाने गावात शिबिर घेऊन उपचार सुरू केले आहेत.

खराशीत महाप्रसादानंतर उलटी-जुलाबाचा त्रास, आरोग्य विभागाकडून १२० रुग्णांवर उपचार छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत

भंडारा जिल्ह्यातील खराशी गावात महाप्रसाद झाल्यानंतर काही गावकऱ्यांना उलटी आणि जुलाबाचा त्रास सुरू झाला. खराशी हे उपकेंद्र प्राथमिक आरोग्य केंद्र मुरमाडी अंतर्गत येते. आरोग्य विभागाने तातडीने उपाययोजना सुरू केल्या असून, गावात विशेष आरोग्य शिबिर घेऊन बाधित रुग्णांवर उपचार केले जात आहेत. आरोग्य यंत्रणा परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे, असे आरोग्य विभागाने सांगितले.

२० ऑक्टोबर रोजी खराशी येथील गायत्री माता मंदिरात गावकऱ्यांसाठी महाप्रसादाचे आयोजन केले होते. सायंकाळी ५ ते रात्री ९ वाजेपर्यंत सुमारे ७०० ते ८०० लोकांसाठी जेवणाची व्यवस्था होती. त्यानंतर सकाळच्या सुमारास काही जणांना उलटी व जुलाब सुरू झाले आणि त्यांनी उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्राकडे धाव घेतली.

मुरमाडी प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी, तसेच जवळच्या आरोग्य केंद्रांतील वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका आणि आशा स्वयंसेविका लगेच खराशी गावात पोहोचले. तिथे शिबिर सुरू करून रुग्णांची तपासणी करण्यात आली आणि उपचार देण्यात आले. २१ ऑक्टोबरला दुपारी १ वाजेपर्यंत सुमारे १२० रुग्णांवर उपचार झाले.

या रुग्णांपैकी २१ जणांना ग्रामपंचायत कार्यालयातील आरोग्य शिबिरात दाखल करून आवश्यक उपचार देण्यात आले. ९ रुग्णांना ग्रामीण रुग्णालय पालांदूर येथे पाठवण्यात आले. बाकीच्या रुग्णांना औषधोपचार करून घरी सोडण्यात आले.

दरम्यान, सुमारे ५० रुग्णांना ग्रामीण रुग्णालय, पालांदूर येथे दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांच्यात तीन गर्भवती महिलांचा समावेश आहे. पुढील उपचारांसाठी त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालय, भंडारा येथे पाठवण्यात आले आहे.

जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नितीन कापसे आणि जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संदीपकुमार गजभिये यांनी खराशी गाव आणि ग्रामीण रुग्णालय, पालांदूर इथे जाऊन पाहणी केली. रुग्णांना कोणते उपचार दिले जात आहेत, याची माहिती घेऊन त्यांनी संबंधित वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या. रुग्णांना वेळेवर आणि योग्य उपचार मिळावेत आणि परिस्थितीवर सतत लक्ष ठेवावे, असे मार्गदर्शन त्यांनी केले. जिल्हा साथरोग अधिकारी डॉ. श्रीकांत अंबेकर आणि जिल्हा विस्तार व मध्यम अधिकारी अनिल बनकर हे गावात परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.

घटनेचे कारण शोधण्यासाठी ७ अन्नाचे नमुने, ३ पाण्याचे नमुने आणि ५ रुग्णांचे शौचाचे नमुने गोळा करण्यात आले आहेत. ते तपासणीसाठी पाठवण्याची कार्यवाही सुरू आहे. आरोग्य कर्मचारी आणि आशा स्वयंसेविका गावात घरोघरी जाऊन सर्वेक्षण करत आहेत. उलटी-जुलाबाची लक्षणे असलेल्या लोकांना शोधणे, त्यांची आरोग्य तपासणी करणे आणि गरज असेल तर उपचारासाठी आरोग्य संस्थेत पाठवणे, यावर भर दिला जात आहे.

सार्वजनिक आरोग्य विभाग, भंडारा यांच्यामार्फत उपचार, रुग्णांना इतर रुग्णालयात पाठवणे, सर्वेक्षण आणि नमुने तपासणी अशा उपाययोजना राबवल्या जात आहेत. वैद्यकीय अधिकारी, आरोग्य कर्मचारी आणि आशा स्वयंसेविका एकत्र काम करत असून परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आरोग्य विभाग आवश्यक ती काळजी घेत आहे. या कामात खराशी ग्रामपंचायतीचे सरपंच आणि सर्व पदाधिकारी यांचे मोलाचे सहकार्य मिळत आहे.

याच दरम्यान साकोली विधानसभा क्षेत्राचे आमदार नानाभाऊ पटोले आणि भंडारा-गोंदिया विधानपरिषदेचे आमदार अविनाश ब्राम्हणकर यांनी खराशी गावाला आणि ग्रामीण रुग्णालय पालांदूर इथे भेट दिली. त्यांनी परिस्थितीचा आढावा घेतला.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ