चंद्रपूर जिल्ह्यात 27 ऑक्टोबरला जंतनाशक दिन, 4.89 लाख बालकांना गोळी देण्याचे नियोजन
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
चंद्रपूर जिल्ह्यात 27 ऑक्टोबर 2026 रोजी राष्ट्रीय जंतनाशक दिन मोहीम राबवली जाणार आहे. त्यानंतर 3 नोव्हेंबर रोजी मॉप-अप दिन असेल. बालकांचे आरोग्य व पोषण सुधारावे, कृमी संसर्ग कमी व्हावा आणि मुलांचा शारीरिक व बौद्धिक विकास व्हावा, या उद्देशाने ही मोहीम आहे.
मोहिमेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हा कृतीदल समितीची बैठक नुकतीच झाली. जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी बैठकीचे अध्यक्षपद भूषवले. मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंग, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अशोक कटारे, शल्य चिकित्सक डॉ. भास्कर सोनारकर, वैद्यकीय अधिकारी डॉ. नयना उत्तरवार, शिक्षणाधिकारी अश्विनी सोनावणे आणि जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ. स्नेहल कासारे बैठकीला हजर होते.
जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भाग आणि चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रातील एकूण 4 लाख 89 हजार 926 पात्र लाभार्थ्यांना जंतनाशक औषध देण्याचे नियोजन आहे. यात ग्रामीण भागातील 3 लाख 55 हजार 995, शहरी भागातील 52 हजार 487 आणि महानगरपालिका क्षेत्रातील 81 हजार 444 लाभार्थी आहेत. जिल्ह्यातील सर्व 15 तालुक्यांत आणि महानगरपालिका क्षेत्रात मोहीम चालेल. 1 ते 19 वर्षे वयोगटातील बालके आणि किशोरवयीन मुला-मुलींना तिचा लाभ मिळेल.
शासकीय, शासकीय अनुदानित आणि खासगी शाळा, आश्रमशाळा, महाविद्यालये तसेच ग्रामीण व शहरी भागातील अंगणवाडी आणि मिनी अंगणवाडी केंद्रांमधून औषध दिले जाईल. शाळेत न जाणाऱ्या बालकांपर्यंत पोहोचण्यासाठी आरोग्य विभाग, शिक्षण विभाग आणि महिला व बालविकास विभाग मिळून काम करणार आहेत.
मोहिमेसाठी लागणारा अल्बेंडाझोलच्या 11 लाख 41 हजार गोळ्यांचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. आरोग्य सेवक व सेविका, आशा कार्यकर्ती, अंगणवाडी सेविका, शिक्षक आणि संबंधित विभागांच्या कर्मचाऱ्यांनी समन्वयाने काम करावे, असे नियोजनात म्हटले आहे. लाभार्थ्यांची यादी अद्ययावत ठेवणे, औषध घेतल्याची नोंद करणे, रोजचा अहवाल देणे आणि औषध न घेतलेल्या पात्र बालकांना मॉप-अप दिनी गोळी देणे, याचेही नियोजन झाले आहे.
आरोग्य विभागाच्या महत्त्वाच्या सूचना अशा : 27 ऑक्टोबरला गोळी न घेतलेल्या पात्र बालकांना 3 नोव्हेंबर 2026 रोजी मॉप-अप दिनी गोळी दिली जाईल. गोळी देताना संबंधित आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सूचना पाळाव्यात. गोळी दिल्यानंतर बालकाला स्वच्छ पिण्याचे पाणी द्यावे. मळमळ, उलटी, पोटदुखी किंवा इतर त्रास जाणवल्यास संबंधित आरोग्य कर्मचारी किंवा वैद्यकीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा. आजारी बालकांना औषध द्यायचे असल्यास वैद्यकीय अधिकाऱ्यांचा सल्ला घ्यावा.
जिल्ह्यातील सर्व पालक, शिक्षक, अंगणवाडी सेविका, आशा कार्यकर्ती, आरोग्य कर्मचारी आणि संबंधित विभागांनी मोहिमेत सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे. एकही पात्र बालक औषधाच्या लाभापासून वंचित राहू नये, यासाठी सहकार्य करावे, असेही विभागाने म्हटले आहे.
कमेंट
अजून कमेंट नाही. पहिली तुम्ही लिहा.