सोमवार, 26 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
AQI 319 | Very Poor 10:11 IST

भंडाऱ्यात नऊ महिन्यांत ९,१२४ जणांना प्राण्यांचा चावा, त्यातले ७,२९६ कुत्र्यांचे

जानेवारी ते सप्टेंबर २०२६ या काळात भंडारा जिल्ह्यात प्राणिदंशाच्या घटना गेल्या वर्षीपेक्षा ५२९ ने वाढल्या आहेत.

भंडाऱ्यात नऊ महिन्यांत ९,१२४ जणांना प्राण्यांचा चावा, त्यातले ७,२९६ कुत्र्यांचे छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत

भंडारा जिल्ह्यात प्राणी चावण्याच्या घटना वाढल्या आहेत. त्यातही कुत्र्यांच्या चाव्याचा प्रश्न जास्त गंभीर झाला आहे. जानेवारी ते सप्टेंबर २०२६ या नऊ महिन्यांत जिल्ह्यात कुत्रा, मांजर, माकड आणि इतर प्राण्यांच्या चाव्याच्या एकूण ९,१२४ घटनांची नोंद झाली. त्यापैकी ७,२९६ घटना कुत्र्यांनी चावल्याच्या आहेत. एकूण घटनांपैकी सुमारे ८० टक्के घटना कुत्र्यांच्या चाव्याच्या आहेत.

मागच्या वर्षी याच काळात ८,५९५ घटनांची नोंद झाली होती. यंदा त्यात ५२९ घटनांची वाढ झाली आहे, म्हणजे सुमारे ६.१५ टक्के. त्यामुळे रेबीज प्रतिबंधक उपचार मिळणे, भटक्या कुत्र्यांवर नियंत्रण आणि लोकांमध्ये जागृती या गोष्टींना महत्त्व आले आहे.

महिनावार पाहिले तर कुत्र्यांच्या चाव्याच्या घटना जानेवारीत १,०९०, फेब्रुवारीत ९७९ आणि मार्चमध्ये १,०११ नोंदल्या गेल्या. एप्रिलमध्ये ८८२, मेमध्ये ८८४ आणि जूनमध्ये ७९७ घटना झाल्या. जुलैमध्ये ५५७ आणि ऑगस्टमध्ये ५३५ घटनांची नोंद झाली.

सर्व प्राण्यांच्या चाव्यांचा एकत्र विचार केला तर जानेवारीत सर्वाधिक १,२७८ घटना नोंदल्या गेल्या. त्यानंतर मार्चमध्ये १,१९५, फेब्रुवारीत १,१४९, मेमध्ये १,०९७, एप्रिलमध्ये १,०५३ आणि जूनमध्ये १,०२८ घटना झाल्या. जुलैमध्ये ७९३, ऑगस्टमध्ये ७७५ आणि सप्टेंबरमध्ये ७५६ घटनांची नोंद झाली. मांजरांच्या चाव्याच्या ९९१, इतर प्राण्यांच्या ४६१ आणि माकडांच्या चाव्याच्या ३७६ घटना नोंदल्या गेल्या.

जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नितीन कापसे यांच्या माहितीनुसार, जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये रेबीज प्रतिबंधक लस (एआरव्ही) उपलब्ध आहे. ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय आणि जिल्हा रुग्णालय या पातळ्यांवर एआरव्हीसोबत रेबीज इम्युनोग्लोब्युलिनचाही साठा ठेवला आहे. शासकीय आरोग्य संस्थांमध्ये लसींचा साठा उपलब्ध ठेवण्याचे नियोजन आहे, असे त्यांनी सांगितले. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार लसीचे वेळापत्रक पूर्ण करावे आणि गरजेनुसार इम्युनोग्लोब्युलिन घ्यावे, असेही या माहितीत म्हटले आहे.

प्राणी चावल्यास जखम साबण आणि वाहत्या पाण्याने किमान १५ मिनिटे धुवावी आणि लगेच डॉक्टरांकडे जाऊन तपासणी करून घ्यावी, असे सांगण्यात आले आहे. जखमेवर माती, तेल, हळद, मिरची पावडर, लिंबू किंवा इतर घरगुती पदार्थ लावू नयेत. जखमेवर घट्ट पट्टी बांधू नये आणि उपचारांना उशीर करू नये, असेही सांगितले आहे.

भटक्या प्राण्यांपासून सुरक्षित अंतर ठेवावे आणि लहान मुलांना कुत्र्यांजवळ किंवा इतर प्राण्यांजवळ एकटे सोडू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. जखम लहान असली तरी दुर्लक्ष न करता लगेच उपचार घ्यावेत, असे त्यात म्हटले आहे.

शहरांसह ग्रामीण भागातही भटक्या कुत्र्यांचा प्रश्न चावण्याच्या घटनांशी जोडलेला आहे. कुत्र्यांची संख्या नियंत्रित करणे, त्यांचे लसीकरण करणे आणि चावण्याच्या घटना कमी करणे यासाठी पशुसंवर्धन विभाग आणि स्थानिक स्वराज्य संस्था यांच्याशी समन्वय साधण्यासाठी पत्रव्यवहार करण्यात आला आहे. नगर परिषदांनाही आवश्यक उपाययोजना करण्याबाबत कळवले आहे.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ