खैबर पख्तुनख्वात आणीबाणी लागू होताच पेशावरमध्ये गव्हर्नर हाऊसला आग, प्रांतात तणाव
शाहबाज शरीफ यांच्या केंद्र सरकारने खैबर पख्तुनख्वामध्ये आणीबाणी जाहीर केल्यानंतर प्रांतात हिंसाचार उफाळला असून आंदोलकांनी पेशावरमधील गव्हर्नर हाऊसला आग लावल्याचे वृत्त आहे.
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
पाकिस्तानमधील राजकीय अस्थिरता काही केल्या थांबायला तयार नाही. शाहबाज शरीफ यांच्या केंद्र सरकारने खैबर पख्तुनख्वा (KP) प्रांतात आणीबाणी, म्हणजेच राज्यपाल राजवट, जाहीर केली आणि त्यानंतर संपूर्ण प्रांतात मोठा हिंसाचार उफाळून आला. संतप्त आंदोलकांनी पेशावरमधील गव्हर्नर हाऊसला आग लावल्याचे वृत्त समोर आले आहे. सोशल मीडियावर फिरत असलेल्या व्हिडिओंमध्ये गव्हर्नर हाऊसचा परिसर आगीच्या मोठ्या ज्वालांनी वेढलेला दिसतो. प्रांतातील अनेक शहरांत कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे.
केंद्र सरकारने पीटीआय (पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफ) पक्षाचे प्रांतीय सरकार बरखास्त करून आणीबाणी लादली, त्यामुळे हा भडका उडाला. तुरुंगात असलेले माजी पंतप्रधान इम्रान खान यांचे समर्थक आणि पीटीआयचे कार्यकर्ते रविवारी प्रांतातील प्रमुख शहरांत रस्त्यावर उतरले आणि त्यांनी महामार्ग अडवून धरले. आंदोलन पांगवण्यासाठी सुरक्षा दलांनी थेट गोळीबार केला आणि अश्रूधुराचाही वापर केला, त्यामुळे परिस्थिती आणखी बिघडली.
आणीबाणी लागू होताच पीटीआयच्या नेतृत्वावर कारवाई सुरू झाली. पक्षाचा इस्लामाबादमधील नियोजित मोठा मोर्चा विस्कळीत करण्यात आला. स्वाबी जिल्ह्यातून ५९ आणि खैबर जिल्ह्यातून ६ कार्यकर्त्यांना अटक झाली आहे. प्रांताचे पदच्युत मुख्यमंत्री सोहेल आफ्रिदी आणि पीटीआयचे प्रांतीय प्रमुख जुनैद अकबर यांना सुरक्षा दलांनी ताब्यात घेतल्याचे वृत्त आहे.
माजी मुख्यमंत्री अली अमीन खान गंडापूर यांनी आपल्याला डेरा इस्माईल खान येथील निवासस्थानी बेकायदेशीरपणे नजरकैदेत ठेवल्याचा गंभीर आरोप केला आहे. आंदोलकांना एकत्र येता येऊ नये म्हणून संपूर्ण प्रांतातील इंटरनेट सेवा, मोबाईल नेटवर्क आणि पीटीसीएल ब्रॉडबँड बंद करण्यात आले आहे. यामुळे सामान्य नागरिकांचे रोजचे जीवन विस्कळीत झाले असून सगळीकडे भीतीचे वातावरण आहे.
सरकारच्या या निर्णयावर पाकिस्तानमधील सर्व प्रमुख विरोधी पक्ष आणि मानवाधिकार संघटनांनी कडक शब्दांत टीका केली आहे. पीटीआयने जारी केलेल्या अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, निवडून आलेले लोकशाही सरकार पाडणे आणि राज्यपालांच्या माध्यमातून सत्ता हातात घेणे हा लोकशाहीवरील थेट दरोडा आहे. हा निर्णय अत्यंत धोकादायक पायंडा पाडणारा असून प्रांतातील जनतेचा कौल दडपण्याचा प्रयत्न केला जात आहे, असेही पक्षाचे म्हणणे आहे.
पीटीआयचे समर्थक आणि नेते यांनी आफ्रिदी आणि अकबर यांच्या तातडीने सुटकेची मागणी केली आहे. त्यांच्या अटकेची कायदेशीर कारणे, नेमके आरोप आणि त्यांना न्यायालयात हजर करण्याची प्रक्रिया केंद्र सरकारने लगेच जाहीर करावी, असे आवाहन पक्षाने केले आहे. या अन्यायाविरोधात कायदेशीर मार्गाने आणि सार्वजनिक व्यासपीठांवरून तीव्र लढा देण्याची शपथही पीटीआयने घेतली आहे.
गव्हर्नर हाऊसमधील आगीमुळे इमारतीचे नेमके किती नुकसान झाले आणि कुणाचा जीव गेला आहे का, याबाबत प्रशासनाने अजून अधिकृत माहिती दिलेली नाही. सुरक्षा दलांनी संपूर्ण परिसराला वेढा घातला असून प्रसारमाध्यमांवरही अनेक निर्बंध घालण्यात आले आहेत. पाकिस्तान आधीच आर्थिक संकटाचा सामना करत असताना खैबर पख्तुनख्वामधील हा उद्रेक देशात गृहयुद्धासारखी स्थिती निर्माण करू शकतो, अशी भीती राजकीय विश्लेषक व्यक्त करत आहेत. येत्या दिवसांत परिस्थिती आणखी गंभीर होण्याची चिन्हे आहेत.