जंतरमंतरवर तिरंगा फडकवणे गुन्हा नाही, CJP नेत्यांच्या कोठडीवर राहुल गांधींचा सरकारवर हल्ला
कॉकरोच जनता पार्टीचे नेते सौरभ दास आणि आशुतोष रांका यांना पाच दिवसांची न्यायालयीन कोठडी मिळाल्यानंतर राहुल गांधी यांनी भाजप आणि मोदी सरकारवर टीका केली.
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
जंतरमंतरवर तिरंगा फडकवणे हा गुन्हा नाही आणि त्यासाठी तरुणांना तुरुंगात टाकणे हा भ्याडपणा आहे, अशी टीका लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी केली आहे. भाजप आणि मोदी सरकारवर त्यांनी जोरदार हल्ला चढवला.
जंतरमंतर मैदानात तिरंगा फडकावून घोषणाबाजी केल्याप्रकरणी कॉकरोच जनता पार्टीचे नेते सौरभ दास आणि आशुतोष रांका यांना बुधवारी पाच दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. त्यानंतर राहुल गांधी यांनी ही प्रतिक्रिया दिली.
राहुल गांधी यांनी 'एक्स' या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करून म्हटले की, शांततापूर्ण आंदोलनादरम्यान तिरंगा फडकवणे हा काही गुन्हा नाही. विद्यार्थी, तरुण, पत्रकार आणि 'इंडिया' आघाडी यांच्या संघटना वेगळ्या असल्या, तरी उद्दिष्ट एकच आहे. सर्व आंदोलनांचा सूर एकच आहे, देशवासी आपल्या घटनात्मक हक्कांची मागणी करत आहेत. जंतरमंतर भारताच्या जनतेचे आहे आणि आपण ते पुन्हा मिळवूनच राहू, असेही त्यांनी म्हटले आहे. झेंडे वेगवेगळे आहेत, पण उद्देश एकच आहे, असे ते म्हणाले.
गेल्या १०-१२ दिवसांत विरोधी इंडिया आघाडी आणि कॉकरोच जनता पार्टीने दिल्लीत मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात निदर्शने केली. केंद्र सरकारने दोन दिवसांपूर्वी जंतरमंतर मैदान आंदोलनाचे ठिकाण म्हणून रद्द करत असल्याचे जाहीर केले होते. तरीही सीजेपीच्या नेत्यांनी जंतरमंतरवरच आंदोलन करण्याचा पवित्रा घेतला आणि दुपारी गनिमी काव्याने आत प्रवेश करून तिरंगा फडकावला आणि घोषणाबाजी केली.
परवानगीशिवाय परिसरात प्रवेश केल्याबद्दल आशुतोष रांका, सौरव दास आणि अजिंक्य शिंदे यांना मंगळवारी प्रतिबंधात्मक कोठडीत घेण्यात आले. बुधवारी सकाळी त्यांना मंदिर मार्ग पोलीस ठाण्यात विशेष कार्यकारी दंडाधिकारी (एसईएम) यांच्यासमोर हजर करण्यात आले. दंडाधिकाऱ्यांनी रांका आणि दास यांना शांतता कराराचे उल्लंघन करून प्रवेश केल्याबद्दल दोषी ठरवले आणि पाच दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत तिहार तुरुंगात पाठवले. अजिंक्य शिंदे यांची ५,००० रुपयांच्या जामिनावर सुटका करण्यात आली. जंतर मंतर आता आंदोलनाचे ठिकाण म्हणून ओळखले जात नाही.
अभिजीत दिपके म्हणाले की, मोदींना आणीबाणी लावायचीच असेल तर ती अधिकृतपणे जाहीर करावी. फक्त तिरंगा फडकवल्यामुळे सीजेपीच्या नेत्यांना पाच दिवस तुरुंगात टाकले जात आहे, असे तर आणीबाणीच्या काळातही झाले नव्हते, असे ते म्हणाले. तुमच्यात दम असेल तर आणीबाणीची अधिकृत घोषणा करा, असे आव्हानही त्यांनी दिले.
मंगळवारी सकाळी सीजेपीच्या नेत्यांसह १४ जणांनी गेट आणि बॅरिकेड्स ओलांडून परिसरात प्रवेश केला, तिरंगा फडकावला आणि घोषणाबाजी केली. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आणि नंतर अटक केली. परवानगीशिवाय प्रवेश करणे आणि जामिनाच्या अटींचे उल्लंघन करणे, असे आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आल्याचे वृत्त आहे. १० ऑक्टोबरच्या आंदोलनाचे नेतृत्व करण्यासाठी हे नेते दिल्लीत आले होते आणि तेव्हा त्यांना विमानातूनच ताब्यात घेतले होते.
ताब्यातील नेत्यांना राहुल गांधी यांनी उघडपणे पाठिंबा दिल्याने काँग्रेसच्या भूमिकेत बदल झाल्याची चर्चा सुरू झाली आहे. आंदोलन सुरू असताना सीजेपीपासून अंतर ठेवल्याबद्दल काँग्रेसवर टीका होत होती, त्यामुळे हा पाठिंबा महत्त्वाचा मानला जात आहे.