वाशिममध्ये सपकाळ यांची हेक्टरी १ लाख रुपये मदत आणि संपूर्ण कर्जमाफीची मागणी
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी वाशिम जिल्ह्यात शिवाराची पाहणी केली आणि सरकारकडे हेक्टरी १ लाख रुपये मदत, संपूर्ण कर्जमाफी व चारा छावण्यांची मागणी केली.
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
राज्यातील शेतकरी सध्या दुष्काळाचे चटके सोसत आहेत. राज्य सरकारने अनेक भागांत दुष्काळ जाहीर केला असून बांधावर जाऊन पाहणी सुरू आहे. सर्वच राजकीय पक्षांचे नेते दुष्काळग्रस्त भागांना भेटी देऊन परिस्थितीचा आढावा घेत आहेत. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळही दुष्काळग्रस्त भागांना भेट देऊन शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेत आहेत.
शुक्रवारी, १५ ऑक्टोबर रोजी सपकाळ यांनी वाशिम जिल्ह्याला भेट देऊन शिवाराची पाहणी केली. त्यांनी राज्य सरकारवर टीका केली आणि शेतकऱ्यांना भरीव मदत करण्याचे आवाहन सरकारला केले. आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर पोस्ट करून त्यांनी ही माहिती दिली.
सपकाळ म्हणाले, "पांडव उमरा, तांदळी (ता. जि. वाशिम) येथे दुष्काळाची पाहणी करताना एका युवा शेतकऱ्याच्या भावनांचा बांध फुटला... डोळ्यांत अश्रू, समोर वाळत चाललेली तूर, चाऱ्याची टंचाई, बहिणीच्या लग्नाची जबाबदारी आणि डोक्यावर कर्जाचा डोंगर! पोटच्या लेकरासारखं जपलेलं पीक डोळ्यांदेखत उद्ध्वस्त होताना पाहणाऱ्या बळीराजाची ही व्यथा काळीज पिळवटून टाकणारी आहे."
मुख्यमंत्र्यांना उद्देशून ते म्हणाले, "मुख्यमंत्री महोदय, शेतकऱ्यांच्या हातावर ५ हजार रुपये ठेवून त्यांच्या वेदना संपणार नाहीत! बियाणं, खतं, औषधं, मजुरी आणि कर्जाचा डोंगर यांचा हिशेब या तुटपुंज्या मदतीत कसा बसणार? बांधावर जाऊन फोटो काढण्यापलीकडे आता ठोस निर्णय घ्या. शेतकऱ्यांना भाषणं नकोत, आश्वासनं नकोत; त्यांना हक्काची मदत हवी आहे. शेतकऱ्यांच्या डोळ्यांतील अश्रू पुसता येत नसतील, तर निदान त्यांच्या दुःखाची थट्टा तरी करू नका!"
सपकाळ पुढे म्हणाले, "वाशिम जिल्ह्यातील मालेगाव शिवारात थेट बांधावर जाऊन दुष्काळाची दाहकता अनुभवली. ७५ दिवसांहून अधिक काळ पावसाने दडी मारल्याने खरीप हंगाम उद्ध्वस्त झाला आहे. पिकं करपली, उत्पादन घटलं आणि शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला. अशा संकटात शेतकऱ्यांना भक्कम आधार देण्याची जबाबदारी सरकारची आहे."
त्यांनी असेही म्हटले, "मात्र, दिवाळी गोड करण्याच्या घोषणा करणाऱ्या देवेंद्र फडणवीस सरकारने ५ हजार रुपयांची तुटपुंजी अग्रीम मदत जाहीर करून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळलं आहे. ही मदत आहे की शेतकऱ्यांची क्रूर थट्टा?"
मागण्या मांडताना सपकाळ म्हणाले, "शेतकऱ्यांना घोषणांची मलमपट्टी नको, त्यांच्या नुकसानीची भरपाई हवी! हेक्टरी १ लाख रुपये सरसकट मदत, संपूर्ण कर्जमाफी आणि जनावरांसाठी तातडीने चारा छावण्या सुरू करा. सर्वेक्षण आणि बैठकांचे सत्र थांबवून शेतकऱ्यांच्या खात्यात प्रत्यक्ष मदत जमा करा. शेतकऱ्यांच्या संकटाची थट्टा खपवून घेतली जाणार नाही. शेतकऱ्यांना न्याय मिळेपर्यंत काँग्रेसचा संघर्ष अधिक तीव्रतेने सुरू राहील."
या दौऱ्यात आमदार अमित झनक, वाशिम जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष विठ्ठल चौधरी, प्रदेश सरचिटणीस दिलीप सरनाईक यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.