दिवाळीच्या तोंडावर खम्मममध्ये दुर्घटना, बचाव पथकाच्या दोन बोट उलटल्या; 10 जवान बेपत्ता
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
तेलंगणातील खम्मम जिल्ह्यात पुरात अडकलेल्या मच्छिमारांना वाचवायला गेलेल्या एसडीआरएफ आणि अग्निशमन दलाच्या जवानांच्या दोन बोट उलटल्या असून 10 जवान बेपत्ता आहेत.
दिवाळी तोंडावर आलेली असताना तेलंगणातील खम्मम जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी आली आहे. पुराच्या पाण्यात अडकलेल्या मच्छिमारांचा जीव वाचवण्यासाठी गेलेल्या एसडीआरएफ (SDRF) आणि अग्निशमन दलाच्या जवानांच्या बचाव पथकावर मोठे संकट कोसळले. मदतकार्य सुरू असताना पुराच्या भीषण प्रवाहात या पथकाच्या दोन बोट उलटल्या. प्राथमिक माहितीनुसार 10 जवान बेपत्ता आहेत आणि रेस्क्यू ऑपरेशन युद्धपातळीवर चालू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, खम्मम जिल्ह्यातील एका तलावात पुराच्या पाण्यात काही मच्छिमार अडकले होते. त्यांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी एसडीआरएफ आणि अग्निशमन दलाचे जवान तातडीने घटनास्थळी पोहोचले होते.
जवान मोठ्या धाडसाने मच्छिमारांना वाचवण्याचा प्रयत्न करत असतानाच तलावातील पाण्याची पातळी अचानक खूप वाढली. पाण्याचा प्रवाह तीव्र झाल्यामुळे जवानांची बोट पाण्यात उलटली. बोट उलटण्यापूर्वी काही जवान आधीच पाण्यात उतरून मच्छिमारांचा शोध घेत होते, तर काही जण बोटीत होते. या दुर्दैवी घटनेत 10 कर्मचारी पाण्यात वाहून गेल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
दुर्घटना घडल्यानंतर प्रशासनाने स्थानिक नागरिकांच्या मदतीने लगेच बचावकार्य सुरू केले. तलावातील या रेस्क्यू ऑपरेशनमध्ये अग्निशमन दलाच्या तीन जवानांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात यश आले आहे. पण अजूनही 10 जवान बेपत्ता आहेत आणि त्यांना शोधण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न चालू आहेत.
बेपत्ता जवानांच्या शोधासाठी एसडीआरएफचे 6 अतिरिक्त कर्मचारी आणि अग्निशमन दलाचे 4 जवान घटनास्थळी आले आहेत. याशिवाय त्या भागाची चांगली माहिती असलेले लोकल गाईड्सही या शोधकामात सक्रिय आहेत.
घटनेची तीव्रता लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी आणि स्थानिक आमदार तातडीने घटनास्थळी पोहोचले असून ते स्वतः संपूर्ण परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. बेपत्ता जवानांना लवकरात लवकर बाहेर काढण्यासाठी एनडीआरएफची (NDRF) अतिरिक्त टीमही बोलावण्यात आली आहे. हेलिकॉप्टर आणि मोटर बोटींच्या मदतीने तलावाच्या परिसरात कसून शोधमोहीम राबवली जात आहे.
सतत सुरू असलेला मुसळधार पाऊस आणि पुराचे पाणी यामुळे बचावकार्यात काही तांत्रिक अडचणी येत आहेत. तरीही जवान आणि प्रशासनाचे अधिकारी बेपत्ता सहकाऱ्यांना शोधण्यासाठी जिद्दीने प्रयत्न करत आहेत. या दुर्दैवी घटनेमुळे तेलंगणासह देशभरातील सुरक्षा यंत्रणांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे आणि बेपत्ता जवान सुखरूप बाहेर यावेत, यासाठी प्रार्थना केली जात आहे.
कमेंट
अजून कमेंट नाही. पहिली तुम्ही लिहा.