गेवराईत बनावट आधार कार्डवर अल्पवयीन मुलीचे लग्न; अडीच लाख उकळणारी टोळी उघड
बीड जिल्ह्यातील गेवराईत लग्न जुळवून देण्याच्या नावाखाली अडीच लाख रुपये घेऊन अल्पवयीन मुलीचे बनावट कागदपत्रांवर लग्न लावण्यात आले. मुलीने पोलिसांत हजर होऊन सगळे सांगितल्याने प्रकार समोर आला.
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
बीड जिल्ह्यातील गेवराई येथे लग्नाच्या नावाखाली कुटुंबांना फसवणाऱ्या एका टोळीचा भांडाफोड झाला आहे. पैसे आणि सोन्या-चांदीचे दागिने लाटण्यासाठी एका अल्पवयीन मुलीचे बनावट आधार कार्ड तयार करून तिचे खोटे लग्न लावून देण्यात आले, असा संतापजनक प्रकार समोर आला आहे.
सध्या ग्रामीण भागातल्या तरुणांची लग्ने जुळवणे खूप अवघड झाले आहे. शेतीकाम किंवा ऊसतोडीवर जगणाऱ्या कुटुंबांतील मुलांच्या लग्नाचा प्रश्न तर जास्तच गंभीर आहे. याच हतबलतेचा फायदा घेऊन ही टोळी निष्पाप कुटुंबांना जाळ्यात ओढत होती.
गेवराईतील एका तरुणाचे वय वाढत चालले होते, म्हणून घरचे लोक त्याच्यासाठी मुलगी शोधत होते. त्यांची चिंता पाहून जालन्यातील जाफ्राबाद येथील काही संशयित दलालांनी त्यांच्याशी संपर्क साधला. व्हॉट्सॲपवर मुलीचा बायोडाटा आणि फोटो पाठवण्यात आला. त्यानंतर १ ऑक्टोबर रोजी मुलगी दाखवण्याचा कार्यक्रम झाला.
त्यानंतर दलालांनी अट घातली, "मुलीच्या डोक्यावर वडिलांचे छत्र नाही, त्यामुळे लग्नाचा सर्व खर्च अडीच लाख रुपये तुम्हालाच करावा लागेल." मुलाच्या कुटुंबाची आर्थिक स्थिती बिकट होती. तरीही त्यांनी ऊसतोडणी मुकादमाकडून येत्या २०२६-२७ च्या हंगामाची उचल (ॲडव्हान्स) घेऊन कशीतरी पैशांची सोय केली.
५ ऑक्टोबर रोजी दलालांची टोळी कारने गेवराईत आली. ठरल्याप्रमाणे दोन वेगवेगळ्या फोन-पे खात्यांवर ५० हजार रुपये घेण्यात आले आणि उरलेले २ लाख रुपये रोख स्वरूपात स्वीकारले गेले. एका स्थानिक ब्राह्मणाला बोलावून वैदिक पद्धतीने लग्न लावण्यात आले. मुलाचे घर वसले म्हणून कुटुंब आनंदात होते, पण तो आनंद फक्त दोन दिवस टिकला.
लग्नानंतर अवघ्या दोन दिवसांतच नववधूने माहेरी जाण्यासाठी तगादा लावला. कुटुंबाला संशय आला आणि त्यांनी दलालांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, तेव्हा दलालांनी टाळाटाळ सुरू केली. हा सगळा प्रकार फक्त पैसे उकळण्यासाठी रचलेला बनाव होता, हे तेव्हा स्पष्ट झाले.
१९ ऑक्टोबर रोजी त्या मुलीने स्वतः पोलिसांत हजर होऊन धक्कादायक माहिती दिली. तिचे वय २० वर्षे दाखवणारे बनावट आधार कार्ड दलालांनी तयार केले होते, पण प्रत्यक्षात ती अजून अल्पवयीन आहे. "मला धाक दाखवून जबरदस्तीने गेवराईत आणले आणि माझे लग्न लावून दिले," अशी कबुली तिने दिली.
या प्रकरणी गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बाल कल्याण समितीच्या आदेशाने या अल्पवयीन मुलीची बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे. या फसवणूक रॅकेटमधील मुख्य सूत्रधारांना पकडण्यासाठी पोलीस सध्या वेगाने तपास करत आहेत.
कमेंट
अजून कमेंट नाही. पहिली तुम्ही लिहा.