नागपुरात गणेश विसर्जनासाठी 6400 पोलीस, लेझर-डीजेवर बंदी, सगळीकडे सीसीटीव्हीची नजर
अनंत चतुर्दशीला नागपुरातील गणेश विसर्जनासाठी पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त लावलाय. सीसीटीव्ही, ड्रोन आणि सोशल मीडियावरही करडी नजर असणार आहे.
नागपूर जिल्ह्यात शुक्रवारी अनंत चतुर्दशीला होणाऱ्या गणेश विसर्जनासाठी नागपूर पोलिसांनी मोठा बंदोबस्त उभा केलाय. सीपी विश्वास नांगरे पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना पोलीस खात्याने केलेल्या तयारीची माहिती दिली.
शहरात 1,702 सार्वजनिक गणेश मंडळे आणि जवळपास 2 लाखांहून अधिक घरगुती गणेश मूर्तींचं विसर्जन होणार आहे. त्यासाठी तब्बल 6,400 पोलीस अधिकारी आणि जवान बंदोबस्तात असणार आहेत. फक्त माणसंच नाही, तर सगळ्या विसर्जन स्थळांवर सीसीटीव्ही आणि ड्रोनच्या मदतीनं पोलीस नजर ठेवणार आहेत. गर्दी होणाऱ्या मुख्य ठिकाणी बसवलेल्या 2,958 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमधून कमांड कंट्रोल सेंटरमधून सतत निगराणी केली जाणार आहे.
म्हणजे शहरात अगदी चप्पे चप्पे वर पोलिसांची नजर असणार आहे. या पत्रकार परिषदेला जॉइंट सीपी नवीनचंद्र रेड्डी, डीआयजी विनिता साहू, बसंत परदेशी, राजेंद्र दाभाडे आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. सीपींनी सांगितलं की लेझर साउंड सिस्टीम आणि लेझर बीम लाइटवर बंदी कायम राहणार आहे. मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठानं दिलेल्या सूचनांनुसार ही कडक अंमलबजावणी केली जातेय. कायद्याचं पालन करणं ही प्रत्येक संघटनेची आणि नागरिकाची जबाबदारी असल्याचंही त्यांनी नमूद केलं.
25 आणि 26 सप्टेंबरला संध्याकाळी 6 ते रात्री 12 या वेळेत विसर्जन मिरवणुकीमुळे सगळ्या रस्त्यांवर जड वाहनांना बंदी असणार आहे. जड वाहनांची वाहतूक पर्यायी मार्गांवरून वळवली जाणार आहे. मॉडेल मिल चौकातून वाहतूक रामकुवर आणि जाधव चौकाकडे, आयाचित मंदिर चौकातून जाधव चौक आणि रमण सायन्स पार्ककडे, तर मौलाना आझाद चौक आणि टिळक पुतळा चौकातून वाहतूक रमण सायन्सकडे वळवली जाणार आहे.
जॉइंट सीपी नवीनचंद्र रेड्डी यांनी सांगितलं की गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा सार्वजनिक गणेश मंडळांची संख्या 140 नं वाढलीय. कोराडी आणि गोरेवाडा तलावात सगळ्यात जास्त विसर्जन होणार आहे. सीताबर्डी, फुटाळा, कोराडी, इतवारी, महाल, जाफरनगर, कॉटन मार्केट, गांधी नगर जाफरनगर आणि भांडेवाडी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होण्याची शक्यता आहे.
हे लक्षात घेऊन वाहतूक विभागानं खास व्यवस्था केलीय. यंदा काही गणेश मंडळांनी त्यांचा नेहमीचा विसर्जन मार्ग बदललाय. काही मंडळं कोराडी तलावाऐवजी गोरेवाडा तलाव आणि पोलीस लाइन टाकळी तलावात मूर्तींचं विसर्जन करणार आहेत.
नागपूर पोलिसांचं जवळपास 70 टक्के बळ विसर्जन बंदोबस्तात तैनात राहणार आहे. यात पोलीस आयुक्तांपासून सगळे अधिकारी आणि कर्मचारी सामील असणार आहेत. विसर्जनादरम्यान कुठल्याही आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी अग्निशमन विभागानंही तयारी केलीय. शहरातील 11 फायर स्टेशन, 31 अग्निशमन वाहनं आणि 13 आपत्ती व्यवस्थापन पथकं सज्ज ठेवली जाणार आहेत. चार मोबाइल सर्व्हेलन्स व्हॅनच्या मदतीनं गर्दी आणि संवेदनशील ठिकाणांवर लक्ष ठेवलं जाणार आहे.
गणेशोत्सवादरम्यान पोलिसांनी सोशल मीडियावरही निगराणी वाढवलीय. आतापर्यंत 771 पोस्ट आणि व्हिडिओंची मॉनिटरिंग करण्यात आलीय, त्यापैकी आक्षेपार्ह आढळलेल्या 13 पोस्टविरोधात कारवाई करण्यात आलीय. विसर्जनादरम्यान सोशल मीडियावर सतत नजर ठेवली जाणार असल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलंय.
ही बातमी प्रकाशित झाली आहे पण थेट मालिका सुरू झालेली नाही. डेस्कने अपडेट दाखल करताच तो इथे दिसेल.