गुरुवार, 29 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट

बारीक लोकांनाही फॅटी लिव्हरचा धोका, दिल्लीतील 6,200 जणांच्या सर्व्हेचा डॉ. सरीन यांचा दाखला

बारीक लोकांनाही फॅटी लिव्हरचा धोका, दिल्लीतील 6,200 जणांच्या सर्व्हेचा डॉ. सरीन यांचा दाखला छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
तब्येत PT24 टीम

फॅटी लिव्हर फक्त जाड लोकांनाच होतो हा गैरसमज आहे, असे ILBS चे संचालक डॉ. एस. के. सरीन यांनी नवी दिल्लीतील कार्यक्रमात सांगितले.

फॅटी लिव्हरचा आजार फक्त लठ्ठ किंवा जाड लोकांनाच होतो, असा अनेकांचा समज असतो. पण दिसायला अगदी सडपातळ आणि बारीक असलेल्या लोकांनाही या आजाराचा गंभीर धोका असू शकतो, असे 'इन्स्टिट्यूट ऑफ लिव्हर अँड बिलियरी सायन्सेस'चे (ILBS) संचालक डॉ. एस. के. सरीन यांनी म्हटले आहे. नवी दिल्लीत झालेल्या India Health Summit & Awards 2026 मध्ये ते बोलत होते. लिव्हरच्या आरोग्याबद्दल त्यांनी अनेक मुद्दे मांडले.

डॉ. सरीन यांनी दिलेल्या माहितीनुसार, 2024 मध्ये दिल्लीत 6,200 लोकांवर एक विशेष सर्व्हे करण्यात आला होता. या तपासणीत जे लोक दिसायला अत्यंत सडपातळ होते, त्यांच्याही लिव्हरमध्ये चरबी जमा झालेली आढळली. म्हणजेच वजन सामान्य किंवा कमी असले, तरी लिव्हर पूर्णपणे निरोगी आहे असा अर्थ होत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

भारतातील सुमारे 40 टक्के लोकांच्या लिव्हरमध्ये फॅट जमा असण्याची शक्यता आहे, असेही डॉ. सरीन यांनी सांगितले. त्यामुळे प्रत्येकाने वर्षातून किमान एकदा, उदाहरणार्थ वाढदिवसाच्या दिवशी, आपल्या लिव्हरची तपासणी करून घ्यावी, असा सल्ला त्यांनी दिला.

लिव्हरचे आरोग्य बिघडण्यामागे खाण्यापिण्याच्या सवयींची भूमिका महत्त्वाची असल्याचे डॉ. सरीन म्हणाले. कॅलरी, साखर आणि कार्बोहायड्रेट्स जास्त प्रमाणात खाल्ल्यामुळे लिव्हरमध्ये फॅट वाढू लागते, असे त्यांनी सांगितले. गोड पदार्थ आणि गरजेपेक्षा जास्त खाण्याच्या सवयीमुळे आरोग्याच्या समस्या गंभीर होतात. फक्त वजन कमी करणे पुरेसे नाही, तर रोजच्या आहारात आणि जीवनशैलीत मोठे बदल करणे गरजेचे आहे, असे त्यांचे म्हणणे होते.

चहा आणि कॉफीबद्दलही डॉ. सरीन यांनी भाष्य केले. कामाचा ताण आणि थकवा घालवण्यासाठी आजकाल अनेक जण चहा किंवा कॉफी खूप पितात. यावर ते म्हणाले की कॉफी लिव्हरसाठी काही प्रमाणात फायदेशीर ठरू शकते, पण तिला औषध किंवा थकवा घालवण्याचे साधन मानू नये. कॉफी तिच्या चवीचा आनंद घेण्यासाठीच प्यावी, असे त्यांनी सांगितले. कामाच्या वेळेत सतत बसून राहण्यापेक्षा थोडा वेळ चालणे हा ताण कमी करण्यासाठी चांगला उपाय आहे, असेही त्यांनी म्हटले.

रात्री उशिरा जेवण्याच्या सवयीबद्दल डॉ. सरीन यांनी तीव्र चिंता व्यक्त केली. रात्री उशिरा केलेले जड जेवण लिव्हरसाठी आणि संपूर्ण शरीरासाठी अत्यंत घातक ठरते, असे ते म्हणाले. रात्रीचे जेवण नेहमी हलके असावे आणि झोपण्यापूर्वी अन्न पचण्यासाठी शरीराला पुरेसा वेळ मिळाला पाहिजे, असा सल्ला त्यांनी दिला.

#नागपूर#सेहत#PT24#Health#Nagpur

जाहिरात

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही 'तुम्ही' वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ