एनएचएम कंत्राटी कर्मचाऱ्यांना अधिसंख्य पदांवर नियुक्ती, १० वर्षे सेवा पूर्ण केलेल्यांना दिलासा
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
राष्ट्रीय आरोग्य अभियानात १० वर्षे किंवा जास्त काळ काम केलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी राज्य शासनाने अधिसंख्य पदे निर्माण करून नियुक्ती देण्याचा निर्णय घेतला आहे.
चंद्रपूर : राष्ट्रीय आरोग्य अभियानात (एनएचएम) कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी महाराष्ट्र शासनाने एक महत्त्वाचा आणि ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. या कर्मचाऱ्यांसाठी अधिसंख्य पदे निर्माण करून त्यांना त्या पदांवर नियुक्ती दिली जाणार आहे.
या अभियानात १० वर्षे किंवा त्याहून जास्त काळ सेवा केलेल्या पात्र कंत्राटी कर्मचाऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे. राज्यभरात काम करणाऱ्या या कर्मचाऱ्यांना एक वेळची विशेष बाब म्हणून समकक्ष वेतनश्रेणीत नियुक्ती दिली जाईल. अनेक वर्षे आपल्या हक्कासाठी संघर्ष करणाऱ्या या कर्मचाऱ्यांना यामुळे मोठा दिलासा मिळाला असून त्यांच्या सेवेला स्थैर्य लाभले आहे.
पात्रतेचा मुद्दा शासनाने स्पष्ट केला आहे. २५ जून २०२६ पर्यंत तांत्रिक खंड वगळून १० वर्षे किंवा त्याहून अधिक सेवाकाळ पूर्ण करणारे कंत्राटी कर्मचारी या निर्णयासाठी पात्र ठरतील. म्हणजेच ही अट पूर्ण करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाच या योजनेचा फायदा मिळणार आहे.
कर्मचाऱ्यांच्या हिताचा विचार करून त्यांच्या सध्याच्या वेतनाला पूर्ण संरक्षण देण्यात आले आहे. म्हणजेच नियुक्तीनंतरही त्यांचे सध्याचे वेतन सुरक्षित राहील. मूळ वेतनासोबत महागाई भत्ता आणि प्रवास भत्ताही पूर्वीप्रमाणेच सुरू राहील.
अधिसंख्य पदावरील कर्मचाऱ्यांच्या सेवेसाठी कमाल वयोमर्यादा ५८ वर्षे निश्चित करण्यात आली आहे. संबंधित कर्मचारी सेवेत असेपर्यंतच ते पद अस्तित्वात राहील, आणि त्यांच्या सेवानिवृत्तीनंतर ते पद आपोआप व्यपगत होईल, असेही या निर्णयात म्हटले आहे.
खासदार प्रतिभा धानोरकर यांनी या प्रश्नासाठी पाठपुरावा केला, असे त्यांच्या कार्यालयाने सांगितले. आमदार असल्यापासून खासदार होईपर्यंत त्यांनी हा प्रश्न सातत्याने लावून धरला. विधानसभेचे सत्र, तारांकित प्रश्न तसेच विविध संसदीय आणि वैधानिक आयुधे वापरून त्यांनी शासनाचे लक्ष या प्रश्नाकडे वेधले होते. केवळ मागणी करून त्या थांबल्या नाहीत, तर शासनस्तरावर वारंवार बैठका घेऊन आणि वैधानिक मार्गाने पाठपुरावा करून त्यांनी हा लढा पुढे नेला. या अथक प्रयत्नांना यश येऊन शासनाने या निर्णयावर शिक्कामोर्तब केले आहे.
हा बिकट प्रश्न धानोरकर यांच्या पाठपुराव्यामुळेच सुटू शकला, असे म्हटले जात आहे. या न्याय्य निर्णयामुळे राज्यभरातील एन.एच.एम. कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. अनेक वर्षे रखडलेला हा प्रश्न मार्गी लागल्याबद्दल सर्वांनी खासदार प्रतिभा धानोरकर यांचे मनापासून आभार मानले आहेत.
कमेंट
अजून कमेंट नाही. पहिली तुम्ही लिहा.