शनिवार, 7 नोव्हेंबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट

दिवाळीच्या अभ्यंग स्नानासाठी घरीच बनवा सुगंधी उटणं

दिवाळीच्या अभ्यंग स्नानासाठी घरीच बनवा सुगंधी उटणं छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
कल्चर PT24 टीम

बाजारातून विकतचं उटणं आणण्यापेक्षा डाळी, तांदूळ, जवस, बदाम आणि कडुलिंबाची पानं वापरून घरीच उटणं बनवता येतं.

दिवाळी सणाची सुरुवात वसुबारसपासून होते. सणावारांच्या या दिवसांत घराघरांत आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण असतं. घराची स्वच्छता करण्यापासून ते फराळ करण्यापर्यंत सगळ्या गोष्टींची तयारी सुरू असते. या धावपळीतही स्वतःचं सौंदर्य खुलवण्याकडे विशेष लक्ष दिलं जातं.

चेहऱ्यावरचा ग्लो वाढवण्यासाठी अनेकजणी पार्लरमध्ये जाऊन महागडं फेशियल आणि वेगवेगळे ब्युटी ट्रीटमेंट करून घेतात. मात्र त्वचेची काळजी घेण्यासाठी वारंवार केमिकल प्रॉडक्टचा वापर करणं टाळावं, असं सांगितलं जातं.

दिवाळीच्या दिवशी अभ्यंग स्नान केलं जातं. अभ्यंग स्नान करताना उटणं लावण्याची परंपरा पूर्वीच्या काळापासून चालत आलेली आहे. अभ्यंग स्नानाशिवाय दिवाळी सण पूर्ण झाल्यासारखा वाटत नाही. त्यामुळे बाजारातून विकतचं उटणं आणून लावण्यापेक्षा घरीच काही पदार्थ वापरून सुगंधी उटणं बनवता येतं.

उटणं बनवण्यासाठी हरभऱ्याची डाळ, मसूर डाळ, तांदूळ, जवस, बदाम आणि कडुलिंबाची पानं लागतात. याशिवाय चंदन पावडर, आंबे हळद, दूध, गायीचं तूप, मध आणि गुलाबपाणी हेही साहित्य लागतं.

कृती अशी आहे. सर्वात आधी कढईत हरभऱ्याची डाळ, मसूर डाळ, तांदूळ, जवस, बदाम आणि कडुलिंबाची पानं वेगवेगळी भाजून घ्यावीत. हे सगळं साहित्य मंद आचेवर भाजायचं आहे. भाजून झाल्यावर ते पदार्थ थंड होण्यासाठी बाजूला ठेवावेत.

थंड झालेले पदार्थ मिक्सरच्या भांड्यात घालून त्यांची बारीक पावडर करावी. तयार झालेली ही पावडर गाळणीच्या मदतीने चाळून घ्यावी. त्यानंतर एका मोठ्या वाटीत ही पावडर घेऊन त्यात चंदन पावडर आणि आंबे हळद घालावी. अशा प्रकारे उटणं तयार होतं.

अभ्यंग स्नान करण्याआधी वाटीत तयार केलेली पावडर घ्यावी. त्यात चमचाभर दूध, गायीचं तूप, मध आणि गुलाबपाणी घालून सगळं नीट मिसळावं. तयार झालेली पेस्ट त्वचेवर लावून हलक्या हाताने मसाज करावा आणि त्यानंतर पाण्याने स्वच्छ धुवून टाकावं.

यातल्या हरभऱ्याच्या डाळीमुळे त्वचेवर आलेले काळे डाग कमी होण्यास मदत होते. शिवाय त्वचेचं एक्सफोलिएशन होऊन त्वचा उजळ आणि स्वच्छ होते. चेहऱ्यावर वाढलेलं टॅनिंग कमी करण्यासाठी आणि त्वचेचा रंग उजळवण्यासाठी मसूर डाळ वापरली जाते. तांदळामध्ये अँटी-ऑक्सिडंट्स खूप जास्त प्रमाणात असतात, त्यामुळे लूज पडलेली त्वचा टाईट होण्यास मदत होते.

ही माहिती केवळ सामान्य माहितीसाठी आहे आणि यात कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

#नागपूर#कल्चर#PT24#Culture#Nagpur

जाहिरात

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही 'तुम्ही' वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ